महाशिवरात्री २०२६ व्रत: शिव पूजन करायची सोपी-योग्य पद्धत; पाहा, पूजा साहित्य अन् निशीथकाल मुहूर्त
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 13, 2026 14:59 IST2026-02-13T14:58:46+5:302026-02-13T14:59:23+5:30
Maha Shivratri 2026 Puja Vidhi In Marathi: महाशिवरात्रीचे व्रत कोणीही करू शकतो. शिव पूजनाची सोपी पद्धत जाणून घ्या...

महाशिवरात्री २०२६ व्रत: शिव पूजन करायची सोपी-योग्य पद्धत; पाहा, पूजा साहित्य अन् निशीथकाल मुहूर्त
Maha Shivratri 2026 Shubh Muhurat Puja Vidhi: रविवार, १५ फेब्रुवारी २०२६ रोजी महाशिवरात्री आहे. संपूर्ण देशभरात महाशिवरात्रीचे पावन पर्व मोठ्या उत्साहात साजरे केले जाते. संपूर्ण देशात महादेव शिवशंकरांना समर्पित शेकडो मंदिरे आहेत. या मंदिरांमध्ये जाऊन लाखो शिवभक्त महादेवांचे दर्शन घेतात. शिव पिंडीवर जलाभिषेक, रुद्राभिषेक करतात. ज्यांना मंदिरात जाणे शक्य होत नाही, ते घरीच शिवोपासना करतात. शिवाचे अत्यंत प्रभावी मंत्रांचे जप केले जातात. महाशिवरात्री हा दिवस शिवभक्तांच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. या दिवशी शिवपूजन कसे करावे? पूजनात कोणत्या गोष्टी अवश्य असाव्यात? निशीथकालाची वेळ कधी आहे? जाणून घेऊया...
महाशिवरात्री २०२६: शिवपूजन करताना चुका होऊ देऊ नका; ‘या’ गोष्टी आवश्यक, आताच तयारीला लागा!
चतुर्दशी दोन दिवसांत विभागलेली असेल, तर ज्या मध्यरात्री चतुर्दशी येत असेल, ती शिवरात्र मानली जाते. काही पुराणांनुसार, माघ वद्य चतुर्दशीला भगवान शंकर आणि देवी पार्वती यांचा विवाह झाला होता. म्हणून या दिवशी महाशिवरात्री साजरी करण्यात येते, अशी मान्यता असल्याचे सांगितले जाते. काही ठिकाणी महाशिवरात्रीला महादेवांसह गणपती, कार्तिकेय, पार्वती देवी यांचे पूजन केले जाते. महाशिवरात्रीचे व्रत कोणालाही करता येते. महाशिवरात्रीचे व्रत कसे करावे, याविषयी तपशीलवार विवेचन विविध ग्रंथांतून आढळते.
महाशिवरात्री व्रताची तीन प्रमुख अंगे
उपवास, पूजा व जागरण ही या व्रताची तीन प्रमुख अंगे आहेत. पूजा करताना शिवाला विशेष प्रिय म्हणून बेलपत्र आवर्जून वाहिले जाते. रात्री शंकराची पूजा केली असता सर्व प्रकारच्या पापांचा नाश होऊन शिवलोकाची प्राप्ती, शिवाशी तादात्म्य, मोक्ष अशी फळे मिळतात, अशी शिवभक्तांची श्रद्धा असते. नित्यशिवरात्र, पक्षशिवरात्र, मासशिवरात्र, योगशिवरात्र व महाशिवरात्र असे शिवरात्रीचे पाच प्रकार आहेत. पैकी महाशिवरात्री ही सर्वश्रेष्ठ मानली जाते. महाशिवरात्रीला शिवपूजन करताना पंचामृत, बेलपत्र, विविध पत्री, नैवेद्य असे साहित्य अवश्य घ्यावे. तसेच आपापले कुळाचार, कुळधर्म, परंपरा यांप्रमाणे अन्य पूजा साहित्य घ्यावे.
महाशिवरात्री व्रताचरण, महत्त्व, महात्म्य अन् मान्यता
महाशिवरात्री व्रताचा शिव पूजन विधी
महाशिवरात्रीला विशेष शिव पूजन करावे. महाशिवरात्रीला दिवशी संपूर्ण दिवस उपवास करावा. भगवान शंकराचे ध्यान करावे. सकाळी संध्यादी विधी पार पाडून कपाळावर भस्माचा त्रिपुंड लावावा. गळ्यात रुद्राक्षाची माळ घालावी. हातात पाणी घेऊन `शिवरात्रिव्रतं ह्येतत्करिष्येऽहं महाफलम् निर्विघ्नमस्तु मे चात्र त्वत्प्रसादाज्जगत्पते। असा संकल्प करावा. ज्यांना हे संस्कृत उच्चारण नीट जमत नसेल, त्यांनी `हे जगत्पतये, मी हे महाफलदायी महाशिवरात्री व्रत करत आहे. ते निर्विघ्नपणे पूर्णत्वास जावो. त्याचे चांगले फळ मला मिळो' असे मनोभावे म्हटले तरी चालेल. संकल्पाचे अर्घ्य देऊन झाल्यावर पूजा आणि जप होईपर्यंत मौन पाळावे. पूजा करताना खालील मंत्र म्हणावा,
ध्यायेनित्यं महेशं रजतगिरिनिभं चारुचन्द्रावतंसम् ।
रत्नाकल्पोज्वलांगं परशुमृगवरा भीतीहस्तं प्रसन्नम् ।।
पद्मासीनं समन्तात्सु तममरगणैव्याघ्रकृत्तिं वसानम्।
विश्वाद्यं विश्ववंद्यम् निखिलभयहरं पन्चवक्त्रं त्रिनेत्रम् ।।
यानंतर शंकराला पंचामृत अर्पण करावे. पंचामृतानंतर शिवलिंगावर रुद्राभिषेक करावा. ऋतुकालोद्भव सुगंधी फुले, बेलाची पाने, धोतऱ्याची फुले, धूप, दीप यांनी अर्पण करून मनोभावे पूजा करावी. नैवेद्य दाखवून निरांजन ओवाळावे. आरती करावी. पूजेच्या शेवटी प्रार्थना करून महादेवाची करुणा भाकावी. हे झाल्यानंतर प्रदक्षिणा आणि नमस्कार करावा. ॐ शिवाय नमः या मूलमंत्राचा १०८ वेळा जप करून पूजेची सांगता करावी. महाशिवरात्रीच्या दिवशी शंकर मंदिरात भाविकांची गर्दी होत असल्याने, तसेच मंदिरात जाऊन दर्शन घेणे शक्य नसल्यास शक्यतो घरीच यथासांग पूजा करावी.
२०२६ मधील महाशिवरात्रीचा निशीथकाल कधी? (Nishit Kaal Mahashivratri 2026)
अन्य व्रतांमध्ये पंचांगानुसार, सूर्योदयाची तिथी मानण्याची प्राचीन परंपरा आहे. परंतु, महाशिवरात्री व्रतात निशीथकालाला महत्त्व असून, या दिवशी करायचे शिवपूजन प्रदोष काळानंतर रात्री केले जाते. रात्रीचे समान पंधरा भाग केल्यानंतर त्यांपैकी आठवा भाग तो निशीथकाळ होय. जेव्हा निशीथकाळी कृष्ण चतुर्दशी म्हणजे महिन्याच्या दुसऱ्या पंधरवड्याची चौदावी तिथी असेल तिला शिवरात्री असे म्हणतात. माघ महिन्यात या शिवरात्रीस विशेष महत्त्व असल्याने तिला महाशिवरात्री असे म्हणतात. यंदा २०२६ मध्ये १५ फेब्रुवारीच्या उत्तररात्री १२ वाजून २८ मिनिटे ते ०१ वाजून १८ मिनिटे या कालावधीत निशीथकाल आहे.
॥ ॐ नमः शिवाय ॥
॥ हर हर महादेव ॥