Mahashivratri 2026 Vrat Niyam: महाशिवरात्रीला शिवपूजन करताना चुका होऊ देऊ नका; ‘या’ गोष्टी आवश्यक, आताच तयारीला लागा!
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 10, 2026 18:35 IST2026-02-10T18:32:38+5:302026-02-10T18:35:32+5:30
Maha Shivratri 2026 Shiv Pujan Sahitya Vrat Niyam: महाशिवरात्रीला शिवपूजन करताना तसेच शिव मंदिरात गेल्यावर काही गोष्टींची आवर्जून काळजी घ्यावी, असे म्हटले जात आहे.

Mahashivratri 2026 Vrat Niyam: महाशिवरात्रीला शिवपूजन करताना चुका होऊ देऊ नका; ‘या’ गोष्टी आवश्यक, आताच तयारीला लागा!
Maha Shivratri 2026 Do's and Don'ts: रविवार, १५ फेब्रुवारी २०२६ रोजी महाशिवरात्री आहे. महाशिवरात्रीला भारतीय संस्कृती आणि परंपरांमध्ये अनन्य साधारण असे महत्त्व आहे. शंकर हा महायोगी, अतुल पराक्रमी असूनही त्यागी, विरागी असा आहे. तो स्मशानात राहतो. पार्वतीसारख्या लोकोत्तर विश्वसुंदरीबरोबर जगावेगळा संसार करतो. जीवनाच्या दोन्ही बाजूकडे सारख्याच दृष्टीने पाहावे आणि त्यात रस घेण्याची परंपरा अखंडित राहावी, अशा दूरदृष्टीने अशा देवांचे माहात्म्य आपल्या पूर्वजांनी परंपरेने जागृत ठेवले आहे. या दिवशी भाविक शिवमंदिरात जाऊन अभिषेक, पूजा करतात. देशभरात शेकडो शिवमंदिरे असून, या सर्व मंदिरात महाशिवरात्रीनिमित्त धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे विशेष आयोजन केले जाते. महाशिवरात्रीला शिवपूजन करताना काही नियम पाळणे आवश्यक असते. चुका होता कामा नयेत, असे म्हटले जाते.
शिवपुराणात महाशिवरात्रीसंदर्भात एक कथा आढळून येते. ‘श्रीशिवलीलामृत’ हा ग्रंथ प्रसिद्ध आहे. महाशिवरात्रीचे माहात्म्य यात आले आहे. महाशिवरात्री हे शिवभक्तांच्या दृष्टीने अत्यंत पवित्र असे एक व्रत आहे. महाशिवरात्रीच्या रात्री शंकराची पूजा केली असता सर्व प्रकारच्या पापांचा नाश होऊन शिवलोकाची प्राप्ती, शिवाशी तादात्म्य, मोक्ष इ. फळे मिळतात, अशी शिवभक्तांची श्रद्धा असते. प्रत्येक महिन्यातील वद्य चतुर्दशीची रात्र ही शिवरात्र मानली जाते; परंतु माघ वद्य चतुर्दशीची रात्र ही महाशिवरात्र म्हणून विख्यात आहे.
भारतात शिवपूजन आसेतुहिमाचल सर्वत्र रूढ
भारतात शिवपूजन आसेतुहिमाचल सर्वत्र रूढ आहे. शिवोपासना सर्व राज्यांमध्ये केली जाते. अगदी प्राचीन काळी म्हणजे वैदिक काळापासून शिवाचे माहात्म्य वर्णिले गेले आहे. वेगवेगळ्या काळी शिवशंकराला भिन्न नावांनी संबोधिले असले तरी या देवतेचे स्वरूप आणि महत्त्व चिरंतन राहिलेले आहे. महाराष्ट्रात अनेक ठिकाणी शिवशंकर म्हणजे महादेव हे ग्रामदैवत आहे. त्याला त्या त्या ठिकाणी वेगवेगळ्या नावांनी ओळखले जाते. अनेक ठिकाणी महाशिवरात्रीनिमित्त जत्रा भरतात. महाशिवरात्रीला शिवपूजन करताना काही नियम पाळावेत, असे म्हटले जाते.
बेलपत्र हवेच, त्याशिवाय शिवपूजन अपूर्ण
बेलपत्राशिवाय शिवपूजन अपूर्ण मानले जाते. बाकी काही करणे शक्य झाले नाही, तरी एक बेलपत्र मनोभावे शिवाला अवश्य अर्पण करावे, असे केल्याने संपूर्ण पूजेचे पुण्य प्राप्त होऊ शकते, अशी मान्यता आहे. काही मान्यतांनुसार, कोणतीही गोष्ट शंकराला अर्पण करताना काळजी घ्यावी. बेलपत्राशिवाय कोणताही गोष्ट शिवलिंगावर अर्पण करू नये. फूले, नैवेद्य हा शिवलिंगासमोर अर्पण करावा. शिवलिंगावर अर्पण केलेला नेवैद्य ग्रहण केला जात नाही, अशी मान्यता आहे. हा पूजेतील दोष समजला जातो, असे सांगितले जाते.
महाशिवरात्रीला सकाळीच अभिषेक करावा
शास्त्राप्रमाणे शंकरावर सकाळच्या प्रहरीच अभिषेक करावा, असे सांगितले जाते. तर, शिवपूजनावेळी चुकूनही शंखाचा वापर करू नये. शंकराने शंखचूड नामक दैत्याचा वध केला होता आणि शंख हा त्याचा अंश मानला जातो. त्यामुळे शंकराची पूजा करताना शंखाचा वापर टाळावा. महादेवाच्या कोणत्याही मंदिरात अभिषेक करताना वा जल अर्पण करताना काही संकेत पाळावे लागतात. शंकराला सायंकाळी अभिषेक केला जाऊ नये, असे सांगितले जाते.
केवळ बेलपत्रे नाहीत, तर विविध पत्री अर्पण करणे शुभ
शिवपूजन करताना केसर, दुपहरिका, मालती, चम्पा, चमेली, जुई या फुलांचा वापर करू नये. याऐवजी बेलाची पाने, भांगाची पाने, धोत्र्याची पाने, घोंगलाची पाने, निळी कमळे, अशोकाची पाने, आवळीची पाने, कण्हेरीची पाने, कदंबाची पाने, ब्राह्मीची पाने, आघाडाची पाने शिवशंकराला शिवपूजनावेळी वहावीत. शंकराची पूजा करताना अक्षतांचा वापर करावा. मात्र, या अक्षता या निरखून, पारखून घ्याव्यात. भंग पावलेल्या अक्षता पूजनावेळी वापरू नयेत. भंग पावलेला तांदळाचा दाणा हा अपूर्ण आणि अशुद्ध असतो, त्यामुळे त्याचा वापर टाळावा.
महादेवाच्या मंदिरात गेल्यावर प्रदक्षिणा घालताना नियम पाळा
अन्य मंदिरातील प्रदक्षिणा आणि महादेवाच्या मंदिरातील प्रदक्षिणा यामध्ये एक महत्त्वाचा फरक आहे. शंकराच्या मंदिरातील प्रदक्षिणा कधीही वर्तुळाकार पूर्ण करावयाची नसते. शिवलिंगावर अर्पण केलेले पाणी, बाहेर पडणारा मार्ग कधीही ओलांडू नये. शिवलिंगावर अर्पण केलेल्या पाण्यामध्ये प्रचंड ऊर्जा आणि शक्ती सामावलेली असते. त्यामुळे हे जल लांघणे अनुचित असते. त्यामुळे प्रदक्षिणा घालताना लक्ष ठेवावे.
॥ ॐ नमः शिवाय ॥
॥ हर हर महादेव ॥