अधिक मास २०२६: अधिक महिन्यात विवाहित मुलीने आईची ओटी का भरावी? सविस्तर वाचा
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 19, 2026 10:04 IST2026-05-19T10:03:29+5:302026-05-19T10:04:23+5:30
अधिक मास २०२६: अधिक मासात मुली आपल्या आईची ओटी भरू शकते पण सासूची नाही; का? ते जाणून घ्या!

अधिक मास २०२६: अधिक महिन्यात विवाहित मुलीने आईची ओटी का भरावी? सविस्तर वाचा
यंदा १७ मे ते १५ जून २०२६ या काळात 'अधिक ज्येष्ठ मास(Adhik Maas 2026) म्हणजेच पवित्र पुरुषोत्तम मास साजरा केला जात आहे. हिंदू संस्कृतीत अधिक मासाला दानधर्म आणि कृतज्ञता व्यक्त करण्याचा काळ मानले गेले आहे. या पवित्र महिन्याशी जोडलेली एक अतिशय सुंदर आणि भावनिक परंपरा म्हणजे विवाहित मुलीने आपल्या आईची ओटी भरणे!
हे ही वाचा : अधिक मास २०२६: पुरुषसूक्त की विष्णुसहस्रनाम? अधिक मासात कोणते स्तोत्र ऐकणे ठरेल अधिक लाभदायी?
अनेकदा लोकांच्या मनात प्रश्न पडतो की, अधिक मासात मुलगी आपल्या जन्मदात्या आईची ओटी भरू शकते, पण सासूची का नाही? या परंपरेमागे नेमके काय शास्त्र आणि भावना दडली आहे, यावर आधारित हा सविस्तर माहिती जाणून घ्या.
आपल्या संस्कृतीत 'ओटी भरणे' हा केवळ एक धार्मिक विधी नसून तो स्त्रीच्या मातृत्वाचा, तिच्या सर्जनशीलतेचा आणि अखंड सौभाग्याचा गौरव करणारा एक अत्यंत महत्त्वाचा संस्कार आहे.
१. 'ओटी' भरणे म्हणजे नेमके काय? (शास्त्रीय अर्थ)
अशोक लिंबेकर यांनी विश्वकोशात दिलेल्या माहितीनुसार, 'ओटी' म्हणजे नाभीच्या खालचे पोट, जिथे स्त्रीचे गर्भाशय असते. ज्याप्रमाणे मातीमध्ये नवनिर्मितीचे अफाट सामर्थ्य असते, त्याचप्रमाणे स्त्रीच्या गर्भाशयात वंशवृद्धीचे सामर्थ्य असते. विवाहित स्त्रीचे मातृत्व फुलावे, फळावे आणि तिला उत्तम संततीप्राप्त व्हावी, याच आशीर्वादाचे प्रतीकात्मक स्वरूप म्हणजे 'ओटी भरणे' होय. यासाठी तांदूळ, श्रीफळ, हळकुंड, खण आणि पाच प्रकारची फळे यांसारख्या मांगल्य व सौभाग्याचे प्रतीक असलेल्या वस्तू वापरल्या जातात.
२. अधिक मासात आईचीच ओटी का भरली जाते?
लग्नकार्यात 'कन्यादान' हा अत्यंत भावनिक विधी असतो. आई-वडील आपल्या काळजाच्या तुकड्याला, लाडक्या लेकीला सुयोग्य हाती सोपवून तिच्या पतीकडे तिची जबाबदारी सोपवतात. आई-वडिलांच्या याच त्यागामुळे मुलीला तिचे हक्काचे सासर मिळते.
हे ही वाचा : Astro Tips: पैसे आणि समृद्धीसाठी पर्समध्ये ठेवा 'या' ५ शुभ गोष्टी; लाभेल लक्ष्मीचा वरदहस्त!
कृतज्ञतेची भावना: अधिक मासात आईची ओटी भरून मुलगी तिने आपल्या पदरात टाकलेल्या संस्कारांबद्दल आणि सौभाग्याबद्दल कृतज्ञता (Gratitude) व्यक्त करते.
पुढच्या जन्मीची आस: "पुढच्या जन्मीही मला तुझ्याच पोटी जन्म मिळावा," ही हळुवार भावना या विधीमागे असते. येथे गर्भधारणा हा हेतू नसून, केवळ आईबद्दलचे प्रेम आणि आदर व्यक्त करणे हा मुख्य उद्देश असतो.
३. सासूची ओटी का भरली जात नाही?
धार्मिक आणि कौटुंबिक नियमांनुसार, मुलगी लग्नानंतर जेव्हा पहिल्यांदा सासरी येते, तेव्हा सासू आपल्या सुनेची ओटी भरून स्वतःचा मुलगा राजीखुशीने तिच्या पदरात टाकते.
नियम काय सांगतो? सासू ही नेहमी सुनेला आशीर्वाद देणाऱ्या स्थानी असते. सासूकडून मिळालेली ती 'आशीर्वादरूपी ओटी' सुनेला सासूला परत करता येत नाही. सासू ही आधीच त्या घराची लक्ष्मी आणि पूर्णान्न असते, त्यामुळे सुनेने सासूची ओटी भरणे शास्त्राला धरून मानले जात नाही.
४. विधवा मातांच्या बाबतीत काय नियम आहे?
शास्त्रात असे सांगितले आहे की, विधवा स्त्रियांची ओटी भरली जात नाही. कारण पतीशिवाय गर्भधारणा शक्य नसते आणि हा विधी नवनिर्मितीशी जोडलेला आहे.
आदर आणि नमस्कार श्रेष्ठ: जर एखाद्या मुलीची आई विधवा असेल, तर याचा अर्थ तिचे आशीर्वाद कमी होतात असा मुळीच नाही. अधिक मासात आई विधवा असेल तर तिची खणा-नारळाने ओटी न भरता, तिला आदरपूर्वक नमस्कार करून तिचे आशीर्वाद घ्यावेत.
हे ही वाचा : Adhik Maas 2026: अधिक मासाला 'धोंड्याचा' मास म्हणण्यामागे काय आहे नेमके कारण?
पर्यायी उपाय: आईची ओटी भरणे शक्य नसल्यास, घरातील किंवा परिचयातील इतर कोणत्याही सुवासिनीची (सवाष्ण स्त्रीची) ओटी भरावी. यामुळेही सौभाग्याचे उत्तम आशीर्वाद लाभतात.
यंदा १७ मे ते १५ जून २०२६ या अधिक मासाच्या काळात, विवाहित महिलांनी आपला मासिक धर्म (Periods) नसताना आपल्या सवडीनुसार कोणत्याही शुभ दिवशी आईची ओटी भरावी.