पाय घसरला अन् घात झाला; कपडे धुताना तरुणाचा शेततलावात बुडून अंत, बीड जिल्ह्यातील घटना
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 13, 2026 18:59 IST2026-04-13T18:57:47+5:302026-04-13T18:59:00+5:30
पोहण्यासाठी गेले अन् परतलेच नाही! आष्टीतील तरुणाच्या मृत्यूने कुटुंबावर दुःखाचा डोंगर.

पाय घसरला अन् घात झाला; कपडे धुताना तरुणाचा शेततलावात बुडून अंत, बीड जिल्ह्यातील घटना
- नितीन कांबळे
कडा (बीड): आष्टी तालुक्यातील शेरी बुद्रुक येथील एका १८ वर्षीय तरुणाचा शेततलावात बुडून मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना सोमवारी दुपारी अडीच वाजेच्या सुमारास घडली. रितेश दीपक वाघमारे असे मृत तरुणाचे नाव आहे. मित्रांसोबत पोहण्यासाठी गेलेल्या रितेशला पोहता येत नसल्याने आणि अचानक पाय घसरल्याने हा अपघात घडल्याची माहिती समोर आली आहे.
नेमकी घटना काय?
रितेश वाघमारे हा आपल्या मित्रांसोबत गावातीलच एका शेतकऱ्याच्या शेततलावावर पोहण्यासाठी गेला होता. इतर मित्र पोहून निघून गेल्यानंतर रितेश आणि त्याचा एक सहकारी मित्र तिथेच थांबले होते. कपडे धुवत असताना अचानक रितेशचा पाय घसरला आणि तो खोल पाण्यात गेला. पोहता येत नसल्याने तो पाण्यात बुडाला.
कुटुंबाचा आधार हरपला
घटनेची माहिती मिळताच ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेतली. रितेशचा मृतदेह पाण्याबाहेर काढून शवविच्छेदनासाठी कडा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात आणण्यात आला आहे. अवघ्या १८ वर्षांच्या रितेशच्या अकाली जाण्याने वाघमारे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. त्याच्या पश्चात आई, वडील, आजोबा आणि एक भाऊ असा परिवार आहे.