सोळा सज्जांचा भार सहा तलाठ्यांवर

By Admin | Updated: June 15, 2014 00:14 IST2014-06-15T00:13:57+5:302014-06-15T00:14:48+5:30

धारूर: धारूर तालुक्यात सोळा तलाठी सज्जे असताना याचा भार केवळ सहा तलाठ्यांवर आहे.

Sixteen loads of loads weighing six pounds | सोळा सज्जांचा भार सहा तलाठ्यांवर

सोळा सज्जांचा भार सहा तलाठ्यांवर

धारूर: धारूर तालुक्यात सोळा तलाठी सज्जे असताना याचा भार केवळ सहा तलाठ्यांवर आहे. सोळा सज्जांचा बोजा या सहा तलाठ्यांवर आल्याने नागरिकांना एका कामासाठी दहा वेळेस चकरा मारण्याची वेळ आली आहे. प्रशासनाचा हा ढिसाळ कारभार सर्वसामान्यांच्या गैरसोयीचा ठरत आहे.
धारूर तालुका हा ७२ गावांचा असणारा असून या तालुक्यात १६ महसुली सज्जे आहेत. या १६ सज्जांचा महसुली कारभार सांभाळण्यासाठी केवळ सहा तलाठी कार्यरत आहेत. या कार्यरत तलाठ्यांनाच इतर सज्जाचा बोजा सहन करावा लागत आहे. कोळपिंप्री, अंजनडोह, कारी, चोरंबा, कान्नापूर, भोगलवाडी, मोहखेड, रूईधारूर, तेलगाव, अंबेवडगाव या सज्जाची तलाठीपदे मागील काही दिवसांपासून रिक्त आहेत. या परिस्थितीमुळे एका तलाठ्यास दोन ते तीन सज्जे सांभाळावे लागत आहेत.
सध्या नवीन शैक्षणिक वर्ष सुरू होत असून विद्यार्थ्यांना तलाठ्याकडून विविध प्रमाणपत्र लागतात. मात्र तलाठ्याच्या शोधात फिरण्याची वेळ विद्यार्थ्यांवर येत आहे. हे तलाठी वेळेवर मिळत नसल्याने एका कामासाठी विद्यार्थ्यांसह सर्वसामान्यांना कागदपत्र काढण्यासाठी तलाठ्याकडे दहावेळा चकरा मागण्याची वेळ आली आहे. शेतकऱ्यांनाही आपल्या कामासाठी चकरा मारण्याची वेळ आली आहे. ही गैरसोय दूर करण्यासाठी तलाठ्यांची रिक्त पदे तात्काळ भरण्यात यावीत, अशी मागणी नगरसेवक बालासाहेब जाधव यांनी केली आहे.
याबाबत धारूरचे तहसीलदार संदीप कुलकर्णी म्हणाले, तालुक्यातील तलाठ्याची पदे रिक्त आहेत. मात्र नागरिकांची गैरसोय होणार नाही याची दक्षता घेत असून ही पदे भरण्यासाठी वरिष्ठ कार्यालयात पाठपुरावा सुरू आहे. लवकरच ही पदे भरण्यात येतील. विद्यार्थ्यांची व शेतकऱ्यांची कुठलीही कामे खोळंबणार नाहीत. याबाबत आपण सर्व तलाठ्यांना सूचना दिल्या आहेत. तक्रार असल्यास संपर्क साधावा. (वार्ताहर)

Web Title: Sixteen loads of loads weighing six pounds