Maharashtra Election 2019 : बहीण-भाऊ, काका-पुतण्यात होणार लढत

By ऑनलाइन लोकमत | Published: October 8, 2019 05:10 AM2019-10-08T05:10:58+5:302019-10-08T05:15:02+5:30

बीड जिल्ह्यात विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात तरी महायुतीनेच बाजी मारली आहे.

Maharashtra Election 2019: Siblings fight in beed | Maharashtra Election 2019 : बहीण-भाऊ, काका-पुतण्यात होणार लढत

Maharashtra Election 2019 : बहीण-भाऊ, काका-पुतण्यात होणार लढत

Next

- सतीश जोशी

बीड जिल्ह्यात विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात तरी महायुतीनेच बाजी मारली आहे. एकूण सहापैकी बीडची जागा शिवसेनेकडून रोहयो मंत्री जयदत्त क्षीरसागर तर उर्वरित पाच जागा भाजप लढवित आहे. परळीत ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे आणि विधान परिषद विरोधी पक्ष नेते धनंजय मुंडे या चुलत बहिण-भावात तुल्यबळ लढत होत आहे. बीडमध्ये काका जयदत्त क्षीरसागर यांच्या विरोधात त्यांचे पुतणे संदीप क्षीरसागर यांनी राष्टÑवादी काँग्रेसकडून उमेदवारी दाखल केली आहे. एमआयएमकडून शेख शफिक आणि वंचित बहुजन आघाडीकडून अशोक हिंगे यांनी उमेदवारी दाखल केली आहे.
२०१४ मध्ये परळीत भाजपच्या पंकजा मुंडे यांनी राष्टÑवादी काँग्रेसचे धनंजय मुंडे यांचा जवळपास २५ हजार मताधिक्यांनी पराभव केला होता. २००९ मध्ये पंकजा ३६ हजार मतांनी विजयी झाल्या होत्या. त्यावेळी उमेदवारी मिळाली नसली तरी धनंजय मुंडे हे भाजपतच सोबत होते. लोकसभा निवडणूक असो की विधानसभा, परळीत २००९ पासून भाजपचे मताधिक्य ४२ हजारांहून घसरत २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत मोदी लाटेतही १८ हजारांवर आले होते. माजलगाव आणि केज (राखिव) मध्ये भाजपने विद्यमान आमदारांना नारळ दिला. माजलगावमध्ये रमेश आडसकरांना भाजपाने उमेदवारी दिली आहे. रा.काँ.कडून माजी मंत्री प्रकाश सोळंके, केजमध्ये भाजपचे नमिता मुंदडा तर राष्टÑवादी काँग्रेसचे पृथ्वीराज साठे तर आष्टीत भाजपचे आ.भीमराव धोंडे तर राष्टÑवादी काँग्रेसचे बाळासाहेब आजबे उमेदवार आहेत.

रंगतदार लढती
२०१४ मध्ये परळीत पंकजा आणि धनंजय यांच्यात लढत झाली. गोपीनाथराव मुंडे यांच्या अपघाती मृत्यूमुळे भावनिक वातावरण होते. शिवसेना आणि राष्टÑवादी काँग्रेसने उमेदवार दिला नव्हता. यावर्षीही या लढतीकडे संपूर्ण राज्याचे लक्ष आहे.
गेवराईत शिवसेनेचे बदामराव पंडित यांनी भाजपा उमेदवार आ.लक्ष्मण पवार यांच्या विरोधात बंडखोरी केली आहे. या ठिकाणी राष्टÑवादीकडून माजी जि.प. अध्यक्ष विजयसिंह पंडित लढत आहेत. बदामराव हे माजी राज्यमंत्री असून विजयसिंह पंडित यांचे चुलत काका आहेत.
बीडमध्ये शिवसेनेचे जयदत्त क्षीरसागर आणि राष्टÑवादी काँग्रेसचे संदीप क्षीरसागर अशी काका-पुतण्यात लढत होत आहे. २०१४ मध्ये मोदी लाटेत बीडची जागा राखत भाजपाच्या तिकिटावर निवडणूक लढविणाऱ्या शिवसंग्रामचे आ.विनायक मेटे यांचा त्यांनी सहा हजार मतांनी पराभव केला होता.

प्रचारातील प्रमुख मुद्दे
१) महायुतीकडून जिल्ह्यात केलेल्या विकास कामांची उजळणी
२) परळी-बीड-अहमदनगर रेल्वेमार्ग, वॉटरग्रीड प्रकल्पावर महायुतीचा भर
३) विम्यापासून शेतकरी वंचित, औद्योगिक विकास नाही : आघाडीचा आरोप
४) कलम ३७०, पाकिस्तानला शिकवला धडा, यावर महायुतीचा भर

 

Web Title: Maharashtra Election 2019: Siblings fight in beed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.