मोठा दिलासा; ५६ दिवसांनंतर पॉझिटिव्हिटी रेट १०च्या खाली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 30, 2021 04:26 IST2021-05-30T04:26:48+5:302021-05-30T04:26:48+5:30

बीड : जिल्ह्यात तब्बल ५६ दिवसांनंतर रुग्णसंख्येचा पॉझिटिव्हिटी रेट १०च्या खाली आला आहे. विशेष म्हणजे, दीड हजारांचा टप्पा ओलांडणारी ...

Great relief; After 56 days, the positivity rate is below 10 | मोठा दिलासा; ५६ दिवसांनंतर पॉझिटिव्हिटी रेट १०च्या खाली

मोठा दिलासा; ५६ दिवसांनंतर पॉझिटिव्हिटी रेट १०च्या खाली

बीड : जिल्ह्यात तब्बल ५६ दिवसांनंतर रुग्णसंख्येचा पॉझिटिव्हिटी रेट १०च्या खाली आला आहे. विशेष म्हणजे, दीड हजारांचा टप्पा ओलांडणारी रुग्णसंख्या मागील १२ दिवसांपासून हजाराच्या खाली आहे. यावरून दुसरी लाट ओसरत असल्याचे स्पष्ट होत आहे. त्यामुळे जिल्हवासीयांना मोठा दिलासा मिळाला आहे.

जिल्ह्यात एप्रिलच्या पहिल्या आठवड्यापासून कोरोनाबाधितांची संख्या वाढण्यास सुरुवात झाली. ३ एप्रिल रोजी ८३१ चाचण्या केल्या होत्या. त्यात ९७ रुग्ण पॉझिटिव्ह आले होते. याचा टक्का ११.८१ एवढा होता. तेव्हापासून जिल्ह्यात पॉझिटिव्हिटी रेट हा दोन अंकी आहे, तसेच २९ एप्रिल रोजी आतापर्यंतची १,५१६ एवढी रुग्णसंख्या सर्वोच्च नोंदविण्यात आली होती. ४ मे रोजी तर हा पॉझिटिव्हिटी रेट तब्बल ३४ वर गेला होता. त्यामुळे चिंता व्यक्त होत होती. या दरम्यान चाचण्यांची संख्याही ४ ते ५ हजार प्रति दिन होत होती. १८ मेपासून जिल्हावासीयांना दिलासा मिळण्यास सुरुवात झाली. अनेक दिवसांनंतर पहिल्यांदाच रुग्णसंख्या हजाराच्या खाली आली होती. शनिवारी तर तब्बल ५६ दिवसांनंतर पॉझिटिव्हिटी रेट हा १०च्या खाली आला होता. शनिवारी ५ हजार ६७९ चाचण्या केल्या होत्या. यात ५३६ रुग्ण बाधित आढळले होते. याचा पॉझिटिव्हिटी रेट हा ९.४३ एवढा होता. त्यामुळे जिल्हावासीयांना दिलासा मिळाला आहे.

तरीही काळजी घ्या

आठवड्यापासून दुसरी लाट ओसरत असली, तरी नागरिकांनी बिनधास्त फिरणे बंद करावे. मास्क, सॅनिटायझर, सोशल डिस्टन्स आदी नियमांचे पालन करावे. प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे पालन करुन प्रशासनास सहकार्य करावे. प्रत्येेकाने स्वत:सह कुटुंबाची काळजी घ्यावी, असे आवाहन मुख्य कार्यकारी अधिकारी अजित कुंभार, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.आर.बी.पवार यांनी केले आहे.

कोट

दोन आकडी संख्येवरून पॉझिटिव्हिटी रेट हा एका आकड्यावर आल्याने काहीसा दिलासा मिळाला आहे. रुग्णसंख्या कमी होत असली, तरी नागरिकांनी गाफील राहू नये. आम्ही तर उपाययोजना आणि नियोजन करतच आहोत, परंतु नागरिकांनीही सहकार्य करणे आवश्यक आहे. यामुळे सर्वांनाच तिसऱ्या लाटेपासून बचाव करता येईल.

डॉ.आर.बी.पवार, जिल्हा आरोग्य अधिकारी, बीड

Web Title: Great relief; After 56 days, the positivity rate is below 10