अतिवृष्टीमुळे बहुतांशी शिवारातील पिके पिवळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 25, 2021 04:27 IST2021-07-25T04:27:37+5:302021-07-25T04:27:37+5:30

अंबाजोगाई : तालुक्यात गेल्या आठवडाभरापासून होत असलेल्या पावसाने खरीप हंगाम धोक्यात आला असून अतिवृष्टीमुळे बहुतांशी शिवारातील पिके पिवळी पडू ...

Due to heavy rains, most of the crops in the suburbs turn yellow | अतिवृष्टीमुळे बहुतांशी शिवारातील पिके पिवळी

अतिवृष्टीमुळे बहुतांशी शिवारातील पिके पिवळी

अंबाजोगाई : तालुक्यात गेल्या आठवडाभरापासून होत असलेल्या पावसाने खरीप हंगाम धोक्यात आला असून अतिवृष्टीमुळे बहुतांशी शिवारातील पिके पिवळी पडू लागली आहेत. त्यामुळे शेतकरी वर्ग हवालदिल झाला आहे.

यावर्षीच्या खरीप हंगामासाठी ५२ हजार हेक्टर शेतीमध्ये पेरणी झाली. यात गेल्या वर्षीप्रमाणेच सोयाबीन पिकाची पेरणी अधिक प्रमाणात करण्यात आली आहे. पेरलेले मोड वर येतात न येतात तोच मुसळधार पाऊस कोसळत असल्याने खरीप हंगामाची स्थिती पूर्ण बिघडून गेली आहे. सततच्या पावसामुळे कोळपणी, वखरणी, फवारणी आदी आंतरमशागतीची कामेही बंद पडली आहेत. अशा परिस्थितीत पिकांसाठी मारक ठरणाऱ्या तणांची वाढ मोठ्या प्रमाणात होत आहे. पावसाने उघडीप दिल्यानंतर बऱ्याच शेतकऱ्यांनी उशिरा पेरणी केली होती. त्यामुळे ही पिके लहान असल्याने मुसळधार पावसाचा मारा सहन करू शकली नाहीत. त्यामुळे जवळपास तालुक्यातील अर्धा अधिक खरीप हंगाम पाण्याखाली गेला. यावर्षीचा हंगाम तरी शेतकरी वर्गाला तारण्याची चिन्हे दिसत होती.

आपत्कालीन व्यवस्थापनाची कोणतीही यंत्रणा या भागात दिसून आली नाही. तालुक्यातील ममदापूर, पाटोदा, कोळकानडी, नांदडी, देवळा, मुडेगाव, दैठणा, राडी या भागातील अनेक रस्ते अतिवृष्टीमुळे खराब झाले आहेत. तर पाटोदा परिसरातील पुलावरून पाणी वाहत होते. त्यामुळे वाहतूक मोठ्या प्रमाणात विस्कळीत झाली होती.

ऊस आडवा पडल्याने मोठे नुकसान

अंबाजोगाई तालुक्यात सतत पडणाऱ्या वादळी पावसामुळे ऊसाच्या पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. वाऱ्यामुळे ऊस शेतातच आडवा पडला आहे.

पीक विम्याकडे शेतकऱ्यांनी फिरवली पाठ

गेल्या वर्षी अतिवृष्टीमुळे खरीप पिकाचे नुकसान होऊनही शेतकऱ्यांना त्यांच्या नुकसान भरपाईपोटी पीक विम्याची रक्कम मिळाली नाही. त्यामुळे शेतकऱ्यांचा भ्रमनिरास झाला. परिणामी यावर्षी पीक विमा भरण्यासाठी शेतकऱ्यांनी अल्पसा प्रतिसाद दिल्याचे दिसून येत आहे. सेतू सुविधा केंद्राकडे दिवसातून फक्त ८ ते १० शेतकरीच येत असल्याचे निदर्शनास येत आहे.

गटारांनी साठले पाणी, साथीचे रोग फैलावण्याचा धोका

सतत पडणाऱ्या पावसामुळे या परिसरातील गावांत मुख्य रस्ते आणि वस्तीलगतच्या परिसरात गटारे साचली आहेत. या गटारांमुळे डासांची उत्पत्ती वाढून मलेरिया, डेंग्यूसारखे आजार पसरण्याची भीती आहे. ही बाब लक्षात घेत संबंधित ग्रामपंचायतींनी गटारे साचणाऱ्या ठिकाणी मुरूम टाकून ती बुजवावीत, तसेच गावांत धूर फवारणी करून डासांच्या उत्पत्तीवर नियंत्रण ठेवावे, अशी मागणी ग्रामस्थांकडून केली जात आहे.

पुलांची उंची वाढवून नाल्यांचे खोलीकरण करावे

ममदापूर, कोळकानडी परिसरात नदीच्या पात्रात विविध ठिकाणी पुलांची निर्मिती करण्यात यावी. शिवाय परिसरातील मोठ्या नाल्यांवरही पूल उभारण्यात यावेत. अनेक वर्षांपूर्वी उभारलेल्या या पुलाभोवतालच्या जमिनीवर गाळ, कचरा साचून जमिनीचा थर वाढत गेला, तर नदीपात्र आणि नालेही गाळ साठल्याने लहान झाले आहेत. त्यामुळे पुलांची उंची वाढवावी व नाल्यांचे खोलीकरण करण्याची मागणी होत आहे.

Web Title: Due to heavy rains, most of the crops in the suburbs turn yellow