Beed: प्रेयसीने घरी बोलावलं, तो गेला अन् नातेवाईकांनी पकडले; तीन दिवसांतच तरुणाचा घेतला जीव
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 20, 2025 16:20 IST2025-07-20T16:19:51+5:302025-07-20T16:20:25+5:30
Beed Crime news: मुलीसोबत प्रेमसंबंध असल्याच्या कारणावरून तिच्या वडिलांनी आणि नातेवाईकांनी इंजिनिअरिंगचे शिक्षण घेत असलेल्या तरुणाला इतके मारले की त्याचा मृत्यू झाला.

Beed: प्रेयसीने घरी बोलावलं, तो गेला अन् नातेवाईकांनी पकडले; तीन दिवसांतच तरुणाचा घेतला जीव
Beed Crime news Latest: बीड जिल्ह्यात आणखी एक भयंकर घटना घाडली आहे. एका मुलीसोबत प्रेमसंबंध असलेल्या तरुणाची तिच्या वडिलांनी आणि नातेवाईकांनी मिळून हत्या केली. १५ जुलै रोजी तरुणीने त्याला घरी कुणीच नसल्याने भेटायला बोलावले होते. तो गेला, तेव्हा तिथे तरुणीचे नातेवाईक आले आणि त्यांनी त्याला पकडले. त्यादिवशी इतरांनी मध्यस्थी केल्याने वाद मिटला. पण, त्यानंतर तिसऱ्याच दिवशी मुलीचे वडील आणि नातेवाईकांनी त्याला रस्त्यात गाठलं आणि बेदम मारलं. छत्रपती संभाजीनगर येथील एका रुग्णालयात इंजिनिअरिंगचं शिक्षण घेत असलेल्या शिवमने जीव सोडला.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
बीड जिल्ह्यातील गेवराई तालुक्यातील गंगावाडी येथे ही घटना घडली. २१ वर्षीय शिवम चिकणे या तरुणाला प्रेमसंबंधाच्या कारणावरून पाच जणांनी बेदम मारहाण केली. ही घटना १८ जुलै रोजी दुपारी २ वाजण्याच्या सुमारास गंगावाडी ते तळवाडा रस्त्यावर घडली.
या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या शिवमवर छत्रपती संभाजीनगर येथील रुग्णालयात उपचार सुरू होते. शनिवारी दुपारी त्याचा मृत्यू झाला. या प्रकरणात तलवाडा पोलिस ठाण्यात आधी जिवे मारण्याच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल झाला होता. आता यात खुनाचे कलम वाढविले जाणार आहे.
घरी कुणी नसल्याने तरुणीने शिवमला भेटायला बोलावले अन्...
शिवमचे वडील काशीनाम चिकणे यांच्या तक्रारीनुसार, मुलगा शिवम हा माजलगाव येथे अभियांत्रिकीचे शिक्षण घेत होता. शिवमचे गावातीलच एका मुलीसोबत प्रेमसंबंध होते.
१५ जुलै रोजी प्रेयसी एकटी असताना तिने शिवमला घरी बोलावले होते. त्यावेळी तिचे दोन नातेवाईक शिवम गणेश यादव आणि सत्यम मांगले हे तिथे आले व त्यांच्यात किरकोळ वाद झाला होता. गावकऱ्यांनी तो सोडवलाही होता.
शिवमची गाडी अडवली अन् काठ्यांनी मारहाण
१८ जुलै रोजी दुपारी १२:३० वाजता काशीनाम चिकणे शेतात असताना त्यांना मुलाला मारहाण झाल्याची माहिती मिळाली. ते तत्काळ गेवराई येथील खासगी रुग्णालयात पोहोचले असता, शिवम बेशुद्धावस्थेत आढळला.
ज्ञानदेव चिकणे यांनी दिलेल्या माहितीनुसार, दुपारी २ वाजता शिवम दुचाकीवरून जात असताना, शिवम गणेश यादव याने त्याची गाडी अडवून शिवीगाळ केली. त्यावेळी गणेश सुखदेव यादव, राजाभाऊ उत्तम यादव आणि ईश्वर गोवर्धन यादव हेही तिथे आले.
उपचारादरम्यान शिवमचा मृत्यू
शिवम यादव, सत्यम मांगले आणि राजाभाऊ यादव यांनी लाठ्या-काठ्यांनी, तर गणेश सुखदेव यादव आणि ईश्वर गोवर्धन यादव यांनी हाता-बुक्क्यांनी मारहाण केली होती. जखमी शिवमवर रुग्णालयात उपचार सुरू होते, परंतु शनिवारी दुपारी त्याचा मृत्यू झाला.
मुलीच्या वडिलाला अटक
मुलीच्या वडिलाला तलवाडा पोलिसांनी अटक केली आहे, तसेच घटनास्थळी वरिष्ठ अधिकाऱ्यांनी भेट देऊन पंचनामाही केला.
या प्रकरणात अगोदरच जिवे मारण्याचा प्रयत्न केल्याच्या कलमांखाली गुन्हा नोंद आहे. मुलाचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याने आता यात खुनाचे कलम वाढवणार असल्याचे उपनिरीक्षक स्वप्निल कोळी यांनी सांगितले.