आई मजुरीला अन् वडील आजारी, हीच संधी साधून ६५ वर्षीय नराधमाने चिमुकलीला घरात ओढले
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 13, 2026 12:42 IST2026-05-13T12:40:15+5:302026-05-13T12:42:28+5:30
खाऊचे आमिष दाखवून चिमुकलीला घरात ओढले; ६५ वर्षाच्या वृद्धाविरुद्ध 'पोक्सो' अंतर्गत गुन्हा दाखल, केज पोलिसांकडून आरोपीला बेड्या.

आई मजुरीला अन् वडील आजारी, हीच संधी साधून ६५ वर्षीय नराधमाने चिमुकलीला घरात ओढले
केज: तालुक्यातील काळेगाव घाट येथे मंगळवारी सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास एक धक्कादायक घटना घडली. घराशेजारीच राहणाऱ्या शाहू काशिनाथ दुनघव (वय ६५) याने एका साडेतीन वर्षांच्या चिमुकलीला घरात बोलावून, दरवाजाची कडी आतून लावून घेत तिच्यावर लैंगिक अत्याचार करण्याचा प्रयत्न केला. या घटनेमुळे संपूर्ण जिल्ह्यातून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.
असा उघड झाला प्रकार
घटनेच्या वेळी पीडित बालिकेची आई मजुरीसाठी शेतात गेली होती, तर वडील आजारी असल्याने घरात झोपलेले होते. चिमुकली आणि तिचा पाच वर्षांचा भाऊ घराबाहेर खेळत असताना, आरोपीने भावाला खाऊ आणण्याच्या बहाण्याने दुकानात पाठवले आणि बालिकेला स्वतःच्या घरात ओढले. भाऊ दुकानातून परत आल्यावर बहीण दिसली नाही, म्हणून त्याने वडिलांना सांगितले. वडिलांनी शोध घेतला असता आरोपीचे घर आतून बंद आढळले. दरवाजा उघडायला लावल्यानंतर पीडित बालिका आणि आरोपी संशयास्पद अवस्थेत आढळून आले.
पोलीस कारवाई
आई शेतावरून परतल्यानंतर पीडित मुलीने घडलेला प्रकार सांगितला. नातेवाईकांनी तातडीने केज पोलीस ठाणे गाठून फिर्याद दिली. पोलिसांनी आरोपी शाहू काशिनाथ दुनघव याच्याविरुद्ध बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्यान्वये (पोक्सो) गुन्हा दाखल केला आहे. पोलीस निरीक्षक स्वप्नील उनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक बनसोडे आणि पिंक पथकाचे प्रमुख प्रकाश शेळके पुढील तपास करत आहेत.