कमरेचे थर्माकोल सुटले अन् घात झाला! पोहायला शिकणाऱ्या १४ वर्षीय मुलाचा विहिरीत बुडून मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 2, 2026 13:24 IST2026-05-02T13:23:48+5:302026-05-02T13:24:37+5:30
पैठणच्या बचाव पथकाने बाहेर काढले पार्थिव; केज तालुक्यातील पिंपळगावमध्ये चिमुरड्यावर साश्रू नयनांनी अंत्यसंस्कार.

कमरेचे थर्माकोल सुटले अन् घात झाला! पोहायला शिकणाऱ्या १४ वर्षीय मुलाचा विहिरीत बुडून मृत्यू
केज (जि. बीड): तालुक्यातील पिंपळगाव येथील जिल्हा परिषद शाळेत इयत्ता आठवीत शिकणारा विराज विशाल शिनगारे (वय १४) या विद्यार्थ्याचा विहिरीत बुडून दुर्दैवी मृत्यू झाला. गुरुवारी दुपारी आपल्या मित्रांसोबत सांगवी शिवारातील एका विहिरीवर पोहायला शिकण्यासाठी गेला असता ही दुर्घटना घडली. कमरेला बांधलेले थर्माकोल अचानक सुटल्याने विराजचा ३५ फूट खोल पाण्यात बुडून जीव गेला.
थर्माकोल सुटले अन काळाने गाठले
मिळालेल्या माहितीनुसार, विराज गुरुवारी दुपारी सांगवी शिवारातील बाळासाहेब केदार यांच्या शेतातील विहिरीवर मित्रांसह गेला होता. पोहायला शिकण्यासाठी त्याने कमरेला थर्माकोलचा आधार बांधला होता. मात्र, विहिरीत उडी मारल्यानंतर काही वेळातच हे थर्माकोल निसटले. पोहता येत नसल्याने विराज थेट खोल पाण्यात ओढला गेला. सोबत असलेल्या मित्रांनी आरडाओरडा केला, मात्र खोल पाणी असल्याने कोणालाही मदत करता आली नाही.
पैठणच्या बचाव पथकाला पाचारण
घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक स्वप्नील उनवणे आणि पोलीस पथकाने घटनास्थळी धाव घेतली. स्थानिक पातळीवर शोधमोहीम अयशस्वी ठरल्यानंतर पैठण येथील विशेष बचाव पथकाला पाचारण करण्यात आले. या पथकाने गुरुवारी सायंकाळी साडेसहा वाजता विराजचा मृतदेह बाहेर काढला. शुक्रवारी दुपारी पिंपळगाव येथे अत्यंत शोकाकुल वातावरणात त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.