केज हादरले! ८ वीत शिकणाऱ्या अल्पवयीन मुलीवर ८ महिने अत्याचार, 'पोक्सो' अंतर्गत गुन्हा
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 16, 2026 18:03 IST2026-04-16T18:03:44+5:302026-04-16T18:03:58+5:30
१ सप्टेंबरपासून सुरू होता अत्याचाराचा सिलसिला! केज तालुक्यातील धक्कादायक प्रकार

केज हादरले! ८ वीत शिकणाऱ्या अल्पवयीन मुलीवर ८ महिने अत्याचार, 'पोक्सो' अंतर्गत गुन्हा
केज (जि. बीड): तालुक्यातील एका गावात सालगडी म्हणून काम करणाऱ्या व्यक्तीच्या १४ वर्षीय अल्पवयीन मुलीवर गेल्या आठ महिन्यांपासून सातत्याने अत्याचार झाल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. आरोपी राहुल भालशंकर (रा. जि. बुलढाणा, ह.मु. केज) याने लग्नाचे आमिष दाखवून आणि वडिलांना जिवंत मारण्याची धमकी देऊन पीडितेचे लैंगिक शोषण केले. याप्रकरणी केज पोलीस ठाण्यात पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
लग्नाचे आमिष अन् धमकीचा धाक
मिळालेल्या माहितीनुसार, पीडित मुलगी इयत्ता ८ वीच्या वर्गात शिक्षण घेत आहे. तिचे वडील आणि आरोपी राहुल हे दोन्ही मूळचे विदर्भातील असून केज परिसरात वेगवेगळ्या शेतकऱ्यांकडे सालगडी म्हणून काम करतात. ओळखीचा फायदा घेत राहुलने १ सप्टेंबर २०२५ रोजी मध्यरात्री पहिल्यांदा अत्याचार केला. हा प्रकार कोणाला सांगितल्यास वडिलांना ठार मारण्याची धमकी दिल्याने पीडिता दहशतीत होती.
पिंक पथकाकडून तपास सुरू
हा अत्याचाराचा सिलसिला १४ एप्रिल २०२६ पर्यंत सुरू होता. अखेर पीडितेने धाडस करून हा सर्व प्रकार सांगितल्यानंतर केज पोलिसांनी मंगळवारी दुपारी गुन्हा नोंदवला. आरोपी फरार असून पोलीस निरीक्षक स्वप्नील उनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली पिंक पथकाचे प्रमुख पोलीस उपनिरीक्षक प्रकाश शेळके या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.