वाहन उद्योग केव्हाही बंद पडू शकतो...! चीनने रेअर अर्थ मेटल रोखले, प्रकरण मोदींपर्यंत पोहोचले

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 29, 2025 15:35 IST2025-05-29T15:34:31+5:302025-05-29T15:35:30+5:30

दुर्मिळ अर्थ मेटल्सच्या उत्पादनात चीनचा वाटा हा ६९ टक्के तर पुरवठ्यात ९० टक्के आहे. निओडायमियम, प्रासियोडायमियम, डिस्प्रोसियम आणि टर्बियम यांचा वापर इंधनाचे इंजिन आणि ईव्हीची मोटर बनविण्यासाठी केला जातो.

The automobile industry will shut down...! China blocked rare earth metals supply, the matter reached PM Modi | वाहन उद्योग केव्हाही बंद पडू शकतो...! चीनने रेअर अर्थ मेटल रोखले, प्रकरण मोदींपर्यंत पोहोचले

वाहन उद्योग केव्हाही बंद पडू शकतो...! चीनने रेअर अर्थ मेटल रोखले, प्रकरण मोदींपर्यंत पोहोचले

भारतातील ऑटोमोबाईल इंडस्ट्रीला मोठा धक्का बसला आहे. पेट्रोल, डिझेलसह इलेक्ट्रीक इंजिनसाठी लागणारे रेअर अर्थ मेटलचा पुरवठा चीनने रोखला आहे. यामुळे वाहनांचे उत्पादन मंदावण्याचा धोका निर्माण झाला आहे. यामुळे ऑटोमोबाईल कंपन्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे मदतीसाठी धाव घेतली आहे. 

दुर्मिळ अर्थ मेटल्सच्या उत्पादनात चीनचा वाटा हा ६९ टक्के तर पुरवठ्यात ९० टक्के आहे. निओडायमियम, प्रासियोडायमियम, डिस्प्रोसियम आणि टर्बियम यांचा वापर इंधनाचे इंजिन आणि ईव्हीची मोटर बनविण्यासाठी केला जातो. या दुर्मिळ चुंबकाच्या निर्यातीवरच चीनने प्रतिबंध लादले आहेत. याचा फटका भारतीय ऑटो इंडस्ट्रीला बसण्यास सुरुवात झाली आहे. 

पेट्रोल-डिझेल गाड्यांसाठीच्या इंजिनांमध्ये या वस्तूंपासून बनविलेला चुंबक हा १४० ग्रॅम आहे. मोटर-बॅटरी कॉम्बो असलेले इलेक्ट्रिक वाहन बनवण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या या घटकांचे वजन सुमारे ५५० ग्रॅम आहे. म्हणजेच एक ईव्ही वाहन बनविण्यासाठी कंपन्यांना अर्धा किलोपेक्षा जास्त चुंबकीय पदार्थ लागतात. याचा तुटवडा झाल्यास ईव्ही उद्योगाला मोठा धक्का बसणार आहे. याचबरोबर या चुंबकाचा वापर पॉवर विंडो आणि ऑडिओ स्पीकर बनवण्यासाठी केला जाऊ शकतो. 

भारत हा जगातील तिसरा सर्वात मोठा ऑटोमोबाईल बाजार आहे. हुंडई, मारुती सुझुकी, फोक्सवॅगनसह इतर अनेक कंपन्या भारतात कार निर्मिती करतात आणि जगाला पुरवितात. चीनचे हे निर्बंध असेच कायम राहिले तर येत्या काही दिवसांत ऑटो उद्योग ठप्प होणार आहे. सियामने या प्रकरणात हस्तक्षेप केला असून पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या देखील कानावर हे प्रकरण घालण्यात आले आहे. 

मे महिन्याच्या अखेरीस किंवा जूनच्या सुरुवातीला वाहन उद्योगाचे उत्पादन पूर्णपणे थांबण्याची शक्यता सियामने व्यक्त केली आहे. १९ मे रोजी मारुती सुझुकी, महिंद्रा अँड महिंद्रा आणि टाटा मोटर्सच्या अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत सियामने ही चिंता व्यक्त केली होती. 

Web Title: The automobile industry will shut down...! China blocked rare earth metals supply, the matter reached PM Modi