ह्युंदाईच्या २,००० कार नेणारे जहाज समुद्रात अडकले; इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय ऑटो सेक्टरला मोठा फटका
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 10, 2026 14:30 IST2026-03-10T14:28:38+5:302026-03-10T14:30:07+5:30
Iran Israel war impact on auto sector: इराण-इस्रायल युद्धामुळे भारताची कार निर्यात धोक्यात. ह्युंदाईच्या २,००० गाड्यांचा ताफा समुद्रात अडकला. वाचा सविस्तर.

ह्युंदाईच्या २,००० कार नेणारे जहाज समुद्रात अडकले; इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय ऑटो सेक्टरला मोठा फटका
मध्य आशियातील विस्कळीत झालेल्या सुरक्षा परिस्थितीमुळे भारताच्या वाहन निर्यातीला मोठा धक्का बसला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, आखाती देशांकडे निघालेल्या एका मोठ्या मालवाहू जहाजातील ह्युंदाईच्या सुमारे २,००० कार सध्या समुद्रातच अडकून पडल्या आहेत. इराण आणि अमेरिकेमधील वाढत्या तणावामुळे समुद्री मार्ग असुरक्षित झाल्याने हे जहाज पुढे जाण्यास अडथळे येत आहेत.
इराणने होर्मुजची सामुद्रधुनी रोखण्यास सुरुवात केली आहे. यामुळे लाल समुद्रात होणाऱ्या हल्ल्यांमुळे जहाजांना आपला मार्ग बदलावा लागत आहे किंवा त्यांना सुरक्षित ठिकाणी थांबवून ठेवले जात आहे. भारताची अशीच ३० हून अधिक जहाजे या सामुद्रधुनीत अडकली आहेत. ही जहाजे बाहेर काढण्याचे प्रयत्न भारत सरकारने सुरु केले आहेत. परंतू, जी मालवाहू जहाजे या वाटेवर आहेत ती जहाजे देखील समुद्रातच थांबविण्यात आली आहेत. यापैकीच एक ह्युंदाईच्या कार नेणारे मालवाहू जहाज आहे.
युद्धा थांबेपर्यंत कंपनीकडे दोन पर्याय आहेत, एकतर मार्ग बदलून माल पोहोचविणे किंवा समुद्रात अडकलेले जहाज पुन्हा माघारी चेन्नईच्या बंदरावर आणणे. परंतू, मार्ग बदलल्यामुळे जहाजांना मोठा वळसा घालून जावे लागणार आहे, ज्यामुळे इंधन आणि विम्याचा खर्च मोठ्या प्रमाणात वाढणार आहे. यापेक्षा हे जहाजच परत बोलविणे सोईचे ठरणार आहे.
डिलिव्हरीला विलंब
आखाती देशांमध्ये भारताकडून मोठ्या प्रमाणावर ह्युंदाई, मारुती सुझुकी आणि टाटा मोटर्सच्या गाड्या निर्यात केल्या जातात. या युद्धामुळे मार्च महिन्यातील निर्यातीचे टार्गेट पूर्ण होणे आता कठीण दिसत आहे.
ऑटोमोबाईल उद्योगावर परिणाम
ह्युंदाई इंडियासाठी आखाती देश ही मोठी बाजारपेठ आहे. जर हे युद्ध लांबले, तर चेन्नई बंदरातून होणारी निर्यात पूर्णपणे ठप्प होऊ शकते, ज्यामुळे कंपन्यांच्या महसुलात मोठी घट होण्याची भीती आहे.