Asian Games 2018: हॉकीत ‘खुशी थोडी, जादा गम’

By ऑनलाइन लोकमत | Published: September 2, 2018 08:08 PM2018-09-02T20:08:12+5:302018-09-02T21:23:31+5:30

पुरूष संघाकडून निराशा, महिला चमकल्या पण सुवर्ण हुकले

Asian Games 2018: in Hokey there is 'Happiness Somewhat, more sad' | Asian Games 2018: हॉकीत ‘खुशी थोडी, जादा गम’

Asian Games 2018: हॉकीत ‘खुशी थोडी, जादा गम’

Next

जकार्ता

- ललित झांबरे

आशियाडमध्ये हॉकीतभारताची कामगिरी ‘थोडी खुशी, जादा गम’ अशीच राहिली. आनंद एवढाच की महिलाहॉकी संघ तब्बल २० वर्षानंतर अंतिम फेरीत पोहचला आणि आपण रौप्यपदक जिंकले. मात्र, ही एक बाब सोडली तर निराशाच निराशा! 

गतवेळच्या विजेत्या पुरूष संघाकडून सुवर्णपदकाची अपेक्षा होती, मात्र साखळी फेरीत गोलांची बरसात केल्यावर नेमक्या महत्वाच्या उपांत्य सामन्यात हा संघ ढेपाळला आणि मलेशियाकडून त्यांना पेनल्टी शूटआऊटमध्ये ७-६ असा पराभव पत्करावा लागला. या आशियाडमधील सात सामन्यांतला भारताचा हा एकमेव पराभव, पण त्याने आपल्याला थेट कास्यपदकावर समाधान मानायला भाग पाडले. आशियाडच्या इतिहासात ३ सुवर्ण आणि ९ रौप्यपदकांची कमाई केलेल्या भारतीय संघ १९८६ व २०१० नंतर तिसºयांदा कांस्यपदकावर मर्यादीत राहिला. यामुळे आॅलिम्पिकसाठी थेट पात्रता मिळविण्याचीही संधी आपण गमावली. कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानला २-१ अशी मात देत आपण कांस्यपदक जिंकले हाच काय तो दिलासा!

पुरूषांप्रमाणेच आपल्या महिला संघानेही साखळीत गोलांची बरसात केली, मात्र अंतिम सामन्यातील जपानकडून २-१ अशा पराभवाने त्यांनीसुद्धा ऑलिम्पिकसाठी थेट पात्रतेची संधी गमावली. पण अंतिम सामन्यात महिला संघाने जपानला दिलेली झुंज कौतुकास्पद होती. २५ व्या मिनिटाला १-१ बरोबरी केल्यानंतर पुन्हा ४४ व्या मिनिटाला माघारल्यानंतर चौथ्या आणि अंतिम क्वार्टरमध्ये त्यांनी बरोबरी साधण्याचे शर्थीचे प्रयत्न केले. पण जपानी संघाने चेंडूवरचा ताबा काही सुटू दिला नाही. त्यामुळे राणी रामपालच्या संघाला रौप्यपदकावरच समाधान मानावे लागले.

आपल्या पुरूष संघाची सुरूवात तर भन्नाट झाली. साखळी सामन्यांमध्ये इंडोनेशियाचा १७-०, हाँगकाँगचा विक्रमी २६-०, सुवर्ण विजेता ठरलेल्या जपानचाही ८-० आणि श्रीलंकेचा २०-० असा धुव्वा उडवत त्यांनी सर्वच प्रतिस्पर्ध्याच्या छातेत धडकी भरवली. केवळ कोरियाकडूनच त्यांना साखळीत संघर्ष झाला. पण पाचही साखळी सामने जिंकताना ७६ गोलांच्या बरसातीच्या या कामगिरीवर एका सामन्यातील खराब खेळाने पाणी फेरले. 

उपांत्य सामन्यात उशिराने मलेशियाला गोल करण्याचीसंधी देत त्यांनी पायावर धोंडा पाडून घेतला. कारण या गोलाने लढत २-२ अशी बरोबरीवर आणली आणि शूट आऊटच्या लॉटरीमध्ये ६-७ अशी विजयाने आपली साथ सोडली. गतविजेते सुवर्ण व रौप्यपदकाच्या स्पर्धेतून क्षणात बाद झाले. 

या सामन्यातील भारतीय संघाच्या खेळाने सर्वांनाच निराश केले. साखळी सामन्यांतील सहज धडाकेबाज विजयांनी आलेल्या अतिआत्मविश्वासाने घात केला. या सामन्यात भारताच्या खेळात नियोजनबद्ध डावपेचांचा पूर्णपणे अभाव दिसला. 

मलेशियाने त्यांची शैली असलेल्या जोरदार प्रति आक्रमणाचे तंत्र वापरून या सामन्यातील आपले दोन्ही गोल केले तर भारताने आपले भारतीय शैलीचे तंत्र बदलण्याचे धाडस दाखवले नाही. आपण चेंडू ताब्यात राखण्यात आणि समांतर पासेस देण्यात व्यस्त राहिलो आणि कितीतरी चुका केल्या, त्याची किंमत आपल्याला चुकवावी लागली, असे या पराभवाचे विश्लेषण करण्यात आले आहे. 

 त्यावर हॉकी इंडिया व भारतीय ऑलिम्पिक संघटनेच्या पदाधिकाºयांनी स्पष्ट नाराजी व्यक्त करत प्रशिक्षक  हरेंद्र सिंग व त्यांच्या स्टाफला आता कामगिरी करून दाखविण्याची आगामी विश्वचषक ही शेवटचीे संधी असल्याचा इशारा दिला आहे. त्यात कामगिरी चांगली न झाल्यास प्रशिक्षकासह अनेकांना घरी जावे लागेल असा इशाराच देण्यात आला आहे. याचवेळी पुरूष संघातील खेळाडूंचे खेळापेक्षा सोशल मिडीया व इतर बाबींकडेच अधिक लक्ष असल्याचे आणि संघाला शिस्तीची गरज असल्याचे मत हॉकी इंडियाच्या पदाधिकाºयांनी मांडले आहे. महिला हॉकी संघ, अ‍ॅथलीट, बॅडमिंटनपटू, नेमबाजाप्रमाणे पुरूष हॉक़ी संघाचे लक्ष पूर्णपणे आपल्या ध्येयावर केंद्रीत नव्हते असे निरिक्षण त्यांनी नोंदवले आहे.

Web Title: Asian Games 2018: in Hokey there is 'Happiness Somewhat, more sad'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.