Priyansh Arya Six Fan injured bleeding video: IPL 2026 मध्ये पंजाब किंग्स (PBKS) आणि राजस्थान रॉयल्स (RR) यांच्यातील सामन्यात एक धक्कादायक आणि काळजाचा ठोका चुकवणारी घटना घडली. पंजाबचा युवा फलंदाज प्रियांश आर्या याने मारलेला एक षटकार थेट स्टँडमध्ये बसलेल्या एका चाहत्याच्या तोंडावर लागला. त्यामुळे तो गंभीर जखमी झाला आणि रक्ताची धार वाहू लागली. या घटनेचा व्हिडीओ तुफान व्हायरल झाला आहे.
चाहता रक्तबंबाळ झाल्याची घटना कशी घडली?
पंजाबच्या फलंदाजीदरम्यान प्रियांश आर्याने राजस्थानच्या गोलंदाजाविरुद्ध एक उंच षटकार मारला. हा चेंडू थेट सीमारेषेबाहेर बसलेल्या एका वृद्ध चाहत्याच्या चेहऱ्यावर आदळला. चेंडू इतक्या वेगाने आला होता की तो त्यांच्या डोळ्याच्या आणि नाकाच्या मधल्या भागात लागला आणि काही क्षणातच त्याचा चेहरा रक्ताने माखला.स्टेडियममध्ये उपस्थित असलेल्या मेडिकल टीमने तातडीने धाव घेत त्या चाहत्यावर प्रथमोपचार केले. रक्ताचा प्रवाह थांबवण्यासाठी त्याच्या जखमेवर मलमपट्टी करण्यात आली. आयपीएलच्या प्रोटोकॉलनुसार, गरज भासल्यास त्याला पुढील उपचारासाठी रुग्णालयात नेण्याची व्यवस्थाही करण्यात आली.
प्रियांश आर्याची खेळी
या सामन्यात प्रियांशने ११ चेंडूत २९ धावांची आक्रमक खेळी केली, ज्यामध्ये ५ चौकार आणि १ षटकाराचा समावेश होता. दुर्दैवाने त्याने मारलेला तो एकमेव षटकार या चाहत्यासाठी इजा करणारा ठरला. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर चाहत्यांनी चिंता व्यक्त केली. स्टेडियममध्ये बसताना चेंडूपासून सावध राहणे किती गरजेचे आहे, हे या घटनेने पुन्हा एकदा अधोरेखित केले आहे, असा सूर सोशल मीडियावर दिसून आला. प्रियांश आर्या या हंगामात आपल्या तुफानी फलंदाजीने चर्चेत आहे, मात्र या दुर्दैवी घटनेमुळे सामन्याला एक गालबोट लागले आहे.