एक गोळीबार अन् उडाली ‘व्हाइट हाउस’ची झोप; सत्तारचनेत 'डेझिग्नेटेड सर्व्हायव्हर' म्हणजे काय?
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 29, 2026 10:57 IST2026-04-29T10:57:12+5:302026-04-29T10:57:41+5:30
जेव्हा अमेरिकेचा राष्ट्राध्यक्ष आणि मंत्रिमंडळ एकाच जागी जमतात, तेव्हा सत्तेच्या रांगेतील एका मंत्र्याला गुप्त ठिकाणी लपवून ठेवलं जातं

एक गोळीबार अन् उडाली ‘व्हाइट हाउस’ची झोप; सत्तारचनेत 'डेझिग्नेटेड सर्व्हायव्हर' म्हणजे काय?
गेल्या शनिवारी वॉशिंग्टन हिल्टन हॉटेलमध्ये जे घडलं, त्याने व्हाइट हाऊसची झोप उडवली आहे. जर तो माथेफिरू हॉटेलमधील सर्वच बड्या नेत्यांना ठार मारण्यात यशस्वी ठरला असता तर अमेरिकेचे सरकार चालवायला एकही नेता उरला नसता. व्हाइट हाउसच्या नजरेतून अनेक संभाव्य शक्यतांकडे दुर्लक्ष झाल्याचे या निमित्ताने दिसून आले. म्हणून आता गोपनीय ‘प्लॅन बी’वर व्हाइट हाउसची तयारी सुरू आहे.
चिंतेची बाब काय? - शनिवारी वॉशिंग्टन हिल्टन हॉटेलमध्ये पत्रकारांचा कार्यक्रम सुरू होता, तेव्हा ट्रम्प यांच्याबरोबर वरच्या यादीतील ५ पैकी ४ महत्त्वाचे नेते हजर होते! जर तेथे काही अघटित घडले असते, तर अमेरिकेचे संपूर्ण नेतृत्व एका क्षणात संपले असते. याला नेतृत्वहीन करणारा हल्ला (डिकॅपिटेशन स्ट्राइक) म्हणतात.
अमेरिकी सत्तारचनेत 'डेझिग्नेटेड सर्व्हायव्हर' म्हणजे काय?
जेव्हा अमेरिकेचा राष्ट्राध्यक्ष आणि मंत्रिमंडळ एकाच जागी जमतात, तेव्हा सत्तेच्या रांगेतील एका मंत्र्याला गुप्त ठिकाणी लपवून ठेवलं जातं. त्याला 'डेझिग्नेटेड सर्व्हायव्हर' म्हणतात. त्या व्यक्तीला अण्वस्त्रांचे कोड्स आणि सुरक्षेचा ताफा दिला जातो. जर मुख्य कार्यक्रमावर हल्ला झाला, आणि त्या हल्ल्यात वर उल्लेख केलेले महत्त्वाचे नेते ठार झाले तर हा लपवलेला व्यक्ती आपोआप अमेरिकेचा नवा राष्ट्राध्यक्ष बनतो.
गंमत बघा : शनिवारी असा कोणीही 'एक' व्यक्ती ठरवला नव्हता, कारण अनेक मंत्री सुट्टीवर असल्याने ते आधीच वेगवेगळ्या शहरात होते. व्हाइट हाऊसच्या सुरक्षा यंत्रणांना आपण सुरक्षित आहोत असे वाटले. पण हल्लेखोर हॉटेलमध्ये राहात होता. त्याने सुरक्षा यंत्रणांना हूल दिलीच.
सीक्रेट सर्व्हिसच्या नियमात बदल
व्हाइट हाऊसची सुरक्षा यंत्रणा आता एक नवा नियम आणण्याच्या तयारीत आहे
एकत्र प्रवास बंदी : यापुढे राष्ट्राध्यक्ष (ट्रम्प) आणि उपराष्ट्राध्यक्ष (वान्स) एकाच कार्यक्रमात किंवा एकाच विमानात दिसण्याची शक्यता कमी आहे.
नवी जागा : हॉटेलच्या बॉलरूमऐवजी अधिक सुरक्षित सरकारी इमारतींमध्ये असे कार्यक्रम घेण्यासंदर्भात नियम आणला जात आहे.
ट्रम्प यांचे अनेक संभाव्य दौरे : ४ जुलै २०२६ मध्ये अमेरिका आपल्या स्वातंत्र्याचा २५० वा वर्धापन दिन साजरा करत आहे. त्याचबरोबर अमेरिकेत यंदा मध्यावधी निवडणुकाही असल्याने देशभर जिकडे तिकडे मोठे सोहळे, कार्यक्रम, प्रचार सभा होणार आहेत. ट्रम्प यांना जनतेमध्ये जायला आवडते, पण त्यांच्या व अन्य नेत्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीने 'सीक्रेट सर्व्हिस'ला हाय अलर्टवर राहावे लागेल.