न्यायाधीशांचा पावरफुल आदेश, पण सिस्टीम पडली भारी! फक्त एका तासात त्यांचीच हकालपट्टी; पाकिस्तानात मोठा राडा
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 29, 2026 12:05 IST2026-04-29T12:01:26+5:302026-04-29T12:05:49+5:30
पाकिस्तानी सरकारने सातत्याने सरकारच्या विरोधात निकाल देणाऱ्या तीन न्यायाधीशांच्या बदल्या केल्या आहेत. मंगळवारी, इस्लामाबाद उच्च न्यायालयाच्या एका न्यायाधीशाने पंतप्रधान शाहबाज शरीफ यांना समन्स बजावले होते.

न्यायाधीशांचा पावरफुल आदेश, पण सिस्टीम पडली भारी! फक्त एका तासात त्यांचीच हकालपट्टी; पाकिस्तानात मोठा राडा
पाकिस्तानमध्ये एका खटल्याची जोरदार चर्चा सुरू आहे. या खटल्याच्या सुनावणीदरम्यान पंतप्रधान शाहबाज शरीफ यांना न्यायाधीशांनी समन्स बजावले. यामुळे इस्लामाबाद उच्च न्यायालयाच्या एका न्यायाधीशांना पदावरून हटवण्यात आले आहे. या न्यायाधीशांचे नाव मोहसिन अख्तर कियानी आहे. सरकारच्या या निर्णयाची पाकिस्तानी राजकीय वर्तुळात चर्चा होत आहे. पाकिस्तानी सरकारच्या कायदा विभागाने याला एक नियमित बदली म्हटले आहे.
मस्साजोगमध्ये धक्कादायक निकाल, सरपंचपदाच्या पोटनिवडणुकीत संतोष देशमुख यांच्या पत्नीचा पराभव
मिळालेल्या माहितीनुसार, पाकिस्तान दूरसंचार प्राधिकरणाच्या वित्तीय सदस्यांच्या नियुक्तीसंदर्भात मंगळवारी इस्लामाबाद उच्च न्यायालयात सुनावणी सुरू होती. न्यायाधीश कियानी यांनी सरकारी वकिलांना सांगितले की, जर १८ मे पर्यंत या प्रकरणाचा अंतिम निर्णय झाला नाही, तर ते पंतप्रधानांना बोलावतील.
कयानी यांनी सरकारच्या कार्यपद्धतीवरही प्रश्न उपस्थित केले. ते म्हणाले की, या प्रकरणाला बराच काळ विलंब झाला असून सरकारचा हेतू चांगला नाही. मात्र, सरकारी वकिलाने सांगितले की, एका सदस्याची नियुक्ती आधीच करण्यात आली आहे.
एका तासानंतर न्यायाधीशांना पदावरून हटवले
सुनावणी संपल्यानंतर एका तासातच न्यायाधीश कयानी यांना इस्लामाबाद उच्च न्यायालयातून हटवण्यात आले. कयानी यांची आता लाहोर उच्च न्यायालयात बदली करण्यात आली आहे. विशेष म्हणजे, न्यायिक आयोगाच्या अनेक सदस्यांनी कयानी यांच्या बदलीला विरोध केला होता. बहुमताने एक ठराव मंजूर झाला आणि त्यांना इस्लामाबाद उच्च न्यायालयातून हटवण्यात आले.
पाकिस्तान सरकारच्या माहितीनुसार, कयानी यांच्या व्यतिरिक्त न्यायमूर्ती बाबर सत्तार यांचीही बदली करण्यात आली आहे. त्यांची लाहोरहून पेशावर उच्च न्यायालयात बदली करण्यात आली आहे. न्यायमूर्ती रफत इम्तियाज यांचीही सिंध उच्च न्यायालयात नियुक्ती करण्यात आली आहे. इस्लामाबाद उच्च न्यायालयात कयानी यांच्या जागी अजूनही कोणाचीही नियुक्ती करण्यात आलेली नाही.
इतर दोन न्यायाधीशांनीही त्यांच्या निर्णयांमध्ये सरकारवर टीका केली होती, त्यामुळेच या न्यायाधीशांचीही बदली करण्यात आली आहे.