मानखुर्दमध्ये महापालिकेच्या कामादरम्यान भीषण अपघात; क्रेन कोसळून पोलीस हवालदाराचा दुर्दैवी मृत्यू
By मनीषा म्हात्रे | Updated: April 29, 2026 12:21 IST2026-04-29T12:20:31+5:302026-04-29T12:21:59+5:30
Police Constable Death in Mankhurd: मुंबईतील मानखुर्द परिसरात महापालिकेच्या रस्ते कामादरम्यान एक भीषण अपघात घडला. अंगावर क्रेन कोसळल्याने एका पोलीस हवालदाराचा जागीच मृत्यू झाला.

मानखुर्दमध्ये महापालिकेच्या कामादरम्यान भीषण अपघात; क्रेन कोसळून पोलीस हवालदाराचा दुर्दैवी मृत्यू
मुंबईतील मानखुर्द परिसरात महापालिकेच्या रस्ते कामादरम्यान एक भीषण अपघात घडला. अंगावर ड्रिंलीन क्रेन कोसळल्याने एका पोलीस हवालदाराचा जागीच मृत्यू झाला. संतोष गोपाळ चव्हाण, असे या मृत पोलीस कर्मचाऱ्याचे नाव असून, ते नेहरू नगर पोलीस ठाण्यात कार्यरत होते. या घटनेमुळे पोलीस दलात हळहळ व्यक्त केली जात आहे. याप्रकरणी मानखुर्द पोलीस ठाण्याकडून संबंधित ठेकेदाराविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून पोलीस अधिक तपास करत आहेत.
मानखुर्द पोलीस ठाण्याच्या हद्दीत, सायन-पनवेल मार्गाच्या उत्तर वाहिनीवर मुंबई महानगरपालिकेच्या रस्त्याचे काम सुरू आहे. या कामासाठी एक्साव्हेटर ड्रिलिंग क्रेन वापरली जात होती. मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित ठेकेदाराने ही क्रेन भुसभुशीत जमिनीवर उभी केली होती. कामाच्या दरम्यान तोल जाऊन ही अवजड क्रेन अचानक रस्त्यावरून जाणाऱ्या संतोष चव्हाण यांच्या मोटरसायकलवर (क्रमांक एमएच ४३ डब्लू ३२३८) कोसळली. या भीषण अपघातात चव्हाण यांचा जागीच मृत्यू झाला. त्यांनी एकूण २३ वर्षे पोलीस दलात सेवा बजावली.
प्राथमिक तपासानुसार, हा अपघात ठेकेदाराच्या निष्काळजीपणामुळे झाल्याचे समोर येत आहे. क्रेन लावताना जमिनीचा अंदाज न घेणे आणि सुरक्षेचे नियम धाब्यावर बसवणे याला कारणीभूत ठरल्याचे बोलले जात आहे. क्रेन चालक आणि कामाच्या देखरेखीसाठी जबाबदार असलेल्या व्यक्तींची चौकशी केली जात आहे.