पत्नीला घरात ठेवायचा कुलूप लावून; चारित्र्याच्या संशयातून स्टीलच्या कड्याने केला खून
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 6, 2026 20:04 IST2026-05-06T19:58:34+5:302026-05-06T20:04:37+5:30
Amravati : संशयाचे भूत मनावर स्वार झाले की, माणूस किती क्रूर होऊ शकतो, याचा थरार चांदूर बाजार तालुक्यातील जवळा शहापूर येथे सोमवारी सायंकाळी पाहायला मिळाला.

Wife locked in house; Murdered with steel ring out of suspicion of character
लोकमत न्यूज नेटवर्क
चांदूर बाजार : संशयाचे भूत मनावर स्वार झाले की, माणूस किती क्रूर होऊ शकतो, याचा थरार चांदूर बाजार तालुक्यातील जवळा शहापूर येथे सोमवारी सायंकाळी पाहायला मिळाला. पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेऊन एका नराधम पतीने २४ वर्षीय पत्नीची निघृण हत्या केली. प्रियांशी हृषिकेश आठवले असे मृत महिलेचे नाव असून, पोलिसांनी आरोपी पतीला मध्यरात्रीच अटक केली आहे.
पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी हृषिकेश उर्फ सनी श्रीकृष्ण आठवले (२६, रा.जवळा शहापूर) हा पत्नी प्रियांशीच्या चारित्र्यावर सतत संशय घेत होता. याच कारणावरून ४ मे रोजी सायंकाळी ५:३५ च्या सुमारास त्यांच्यात पुन्हा वाद झाला. रागाच्या भरात हृषिकेशने आपल्या हातातील जड अशा स्टीलच्या कड्याने प्रियांशीच्या कपाळावर, चेहऱ्यावर आणि छातीवर सपासप वार केले. एवढ्यावरच न थांबता, त्याने तिला लाथाबुक्क्यांनीही बेदम मारहाण केली. या गंभीर हल्ल्यात प्रियांशीचा राहत्या घरात जागीच मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच पोलिस पाटील प्रवीण पाथरे यांनी तत्काळ तक्रार नोंदविली.
पती म्हणाला, मला माहिती नाही
पोलिस पाटील प्रवीण पाथरे यांनी आधी घटनास्थळ गाठले तेव्हा मृत प्रियांशी ऋषिकेश आठवले हिच्या कपाळावर जखम होती. दोन्ही डोळे बंद आणि सुजलेले होते. ओठाला मार होता. पोटावर व छातीवर तसेच दोन्ही हात व दोन्ही पायांना खरचटलेले होते. शरीरावर मुका मार लागल्याने चामडी ठिकठिकाणी लालसर झालेली दिसत होती. याबाबत घराबाहेर ओट्यावर बसलेल्या ऋषिकेशला विचारणा केली असता, त्याने पत्नीच्या मृत्यूबाबत काही माहीत नाही, असे स्पष्ट केले.
चंद्रपूरला जुळले प्रेमसंबंध आणि लग्न
ऋषिकेश हा अंदाजे एक ते दीड वर्षापूर्वी चंद्रपूर येथे मिस्त्री कामाला गेला होता. तेथेच त्याचे प्रियांशीसोबत प्रेमसंबंध जुळले व तो तिला घेऊन गावात आला. ते पती-पत्नीसारखे राहत होते.
घरात ठेवायचा कुलूप लावून
ऋषिकेश हा प्रियांशीला नेहमी मारहाण करायचा. तिच्या चारित्र्यावर संशय घेत असल्याने घराबाहेर वा कामाला जायचे असले, तर तो तिला घरात कोंडून व बाहेरून कुलूप लावून जात होता. याच संशयातून महिनाभरापूर्वी कडाक्याचे भांडण करून ऋषिकेशने तिला घराबाहेर काढले होते.
वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून पाहणी
उपविभागीय पोलिस अधिकारी शुभम कुमार आणि सहायक पोलिस अधीक्षक सागर भामरे यांच्या मार्गदर्शनाखाली चांदूर बाजार पोलिसांनी ही कारवाई केली. अवघ्या काही तासांत आरोपीला अटक केल्याने पोलिसांच्या तत्परतेचे कौतुक होत असले, तरी या घटनेमुळे जवळा शहापूर परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. या प्रकरणाचा पुढील तपास चांदूर बाजार पोलिस करत आहेत.
पोलिसांची वेगवान कारवाई
घटनेचे गांभीर्य ओळखून पोलिसांनी तातडीने तपासाची चक्रे फिरवली. रात्री ११:३७ वाजता गुन्हा दाखल झाल्यानंतर अवघ्या काही मिनिटांतच, म्हणजे मध्यरात्री १२:१८ वाजता पोलिसांनी आरोपी हृषिकेशला बेड्या ठोकल्या. घटनास्थळी फॉरेन्सिक व्हॅन पाचारण करण्यात आली असून, रक्ताने माखलेला पुरावा आणि घटनास्थळाचा पंचनामा करण्यात आला आहे.