अमरावतीमधील गुरुकुंज मोझरी येथील पवित्र कुंडात अजित पवारांच्या अस्थींचे विधीवत विसर्जन
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 3, 2026 08:30 IST2026-02-03T08:30:09+5:302026-02-03T08:30:47+5:30
अजितदादांच्या अंत्यसंस्कारानंतर मुंबईस्थित राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यालयात विधीवत पूजन केल्यानंतर संपूर्ण राज्यभर अस्थिकलश रवाना करण्यात आला.

अमरावतीमधील गुरुकुंज मोझरी येथील पवित्र कुंडात अजित पवारांच्या अस्थींचे विधीवत विसर्जन
मनीष तसरे, अमरावती: मंगळवारी पहाटेच्या सुमारास गुरुकुंज मोझरी येथील पवित्र कुंडात श्रीगुरुदेव मंडळाच्या परंपरेनुसार दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पवित्र अस्थींचे विधीवत विसर्जन करण्यात आले.
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अकाली निधनाने सर्वत्र शोक व्यक्त होत आहे. अजितदादांच्या अंत्यसंस्कारानंतर मुंबई स्थित राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यालयात विधीवत पूजन केल्यानंतर संपूर्ण राज्यभर अस्थिकलश रवाना करण्यात आला. अमरावती विभागातील पाच जिल्हे व एक वर्धा जिल्हा अशा ठिकाणी दिवंगत लोकनेते अजित पवार यांचा अस्थिकलश पोहोचविण्याची जबाबदारी पक्षाचे महासचिव (संघटन) आ. संजय खोडके यांच्यावर सोपविण्यात आली.
त्याअनुषंगाने मंगळवारी गुरुकुंज मोझरी येथे श्रीगुरुदेव मंडळाच्या परंपरेनुसार राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या समाधीसमोर सर्वतीर्थ कुंडामध्ये अस्थिकलशाचे विधिवत पूजन करून अस्थी विसर्जित करण्यात आल्या. महाराष्ट्राचे दिवंगत लोकनेते अजित पवार यांना सामूहिक श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. यावेळी आमदार सुलभा खोडके व आमदार संजय खोडके यांच्या सह जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेस परिवार,सर्वपक्षीय नेते व कार्यकर्ते तसेच गुरुदेव सेवा मंडळाचे जनार्दनपंत बोथे यांच्या सह गुरुदेव भक्त उपस्थित होते.