स्वतःचे कोचिंग सेंटर सुपरहिट करण्यासाठी कुलकर्णीने लीक केला NEETचा पेपर; पण विद्यार्थ्याने एक चूक केली अन्..
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 16, 2026 12:07 IST2026-05-16T12:04:26+5:302026-05-16T12:07:18+5:30
NEET-UG 2026 पेपर लीक प्रकरणाचा मास्टरमाइंड केमिस्ट्री लेक्चरर पी. व्ही. कुलकर्णी निघाला. स्वतःचे कोचिंग सेंटर हिट करण्यासाठी त्याने पेपर लीक केला.

स्वतःचे कोचिंग सेंटर सुपरहिट करण्यासाठी कुलकर्णीने लीक केला NEETचा पेपर; पण विद्यार्थ्याने एक चूक केली अन्..
देशभरात खळबळ उडवून देणाऱ्या 'नीट-यूजी २०२६' पेपर लीक प्रकरणाचा सीबीआयने अखेर पर्दाफाश केला आहे. या संपूर्ण घोटाळ्याचा मास्टरमाइंड कोणताही मोठा संघटित सिंडिकेट नसून, एक नामांकित केमिस्ट्री लेक्चरर पी. व्ही. कुलकर्णी असल्याचे तपासात उघड झाले आहे. स्वतःचे कोचिंग सेंटर अव्वल बनवण्याच्या आणि श्रीमंत होण्याच्या हव्यासापोटी कुलकर्णीने देशपातळीवरील परीक्षेची आब्रु वेशीवर टांगली. मात्र, ज्या विद्यार्थ्यांच्या जिवावर तो हा खेळ खेळत होता, त्याच कोचिंगमधील एका विद्यार्थ्याच्या खोडसाळ कृत्य आणि पैशांच्या हव्यासाने कुलकर्णीचा हा मास्टरप्लॅन थेट सीबीआयच्या दारापर्यंत पोहोचवला.
मूळचा लातूरचा असलेल्या पी. व्ही. कुलकर्णी याने पुण्यात राहून हा सगळा काळाबाजार रचला होता. या प्रकरणी प्रदीर्घ चौकशीनंतर सीबीआयने कुलकर्णीला बेड्या ठोकल्या आहेत.
पुण्यात घरातच भरायचा 'स्पेशल क्लास', लाखो रुपयांची वसुली
सीबीआय सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, प्राध्यापक पी. व्ही. कुलकर्णी याने आपली सहकारी मनीषा वाघमारे हिच्या मदतीने पुण्यातल्या स्वतःच्या घरावरच एक 'स्पेशल कोचिंग क्लास' सुरू केला होता. या गुप्त क्लासमध्ये निवडक विद्यार्थ्यांनाच प्रवेश दिला जायचा. कुलकर्णीने या विद्यार्थ्यांना नीट परीक्षेमध्ये येणारे मूळ प्रश्न, त्यांचे पर्याय आणि योग्य उत्तरे सविस्तर लिहून दिली होती. हे प्रश्न हुबेहूब पाठ करून घेण्यासाठी कुलकर्णीने विद्यार्थ्यांकडून आणि त्यांच्या पालकांकडून लाखो रुपयांची अव्वाच्या सव्वा फी वसूल केली होती.
विद्यार्थ्याच्या एका चुकीने कुलकर्णीचा प्लॅन फ्लॉप!
आपली कोचिंग इन्स्टिट्यूट सुपरहिट होणार या आनंदात कुलकर्णी होता. पण, त्याच्याच क्लासमधील एका विद्यार्थ्याने स्वतःचे झालेले पैशांचे नुकसान भरून काढण्यासाठी एक भयंकर डोके लावले. त्याने कुलकर्णीने दिलेला तो गोपनीय पेपर सोशल मीडियाच्या माध्यमातून इतर कोचिंग क्लासेस चालवणाऱ्यांना आणि मित्रांना पाठवून दिला. बघता बघता हा पेपर व्हॉट्सॲप आणि इतर सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर शेकडो लोकांपर्यंत पोहोचला. सुरुवातीला अनेकांनी या पेपरला गांभीर्याने घेतले नाही. मात्र, ३ मे २०२६ रोजी जेव्हा प्रत्यक्ष 'नीट-यूजी'ची परीक्षा झाली, तेव्हा विद्यार्थ्यांनी वहीत लिहून ठेवलेले प्रश्न आणि मूळ प्रश्नपत्रिका १०० टक्के मॅच झाली. त्यानंतर देशात पेपर लीकचा संशय बळावला.
देशभर सीबीआयच्या धाडी, ७ आरोपी गजाआड
हा गंभीर प्रकार उघडकीस आल्यानंतर १२ मे २०२६ रोजी शिक्षण मंत्रालयाच्या उच्च शिक्षण विभागाने सीबीआयकडे अधिकृत तक्रार नोंदवली. गुन्हा दाखल होताच सीबीआयच्या विशेष पथकांनी देशभरात छापेमारी सुरू केली. गेल्या २४ तासांत जयपूर, गुरुग्राम, नाशिक आणि अहमदाबाद येथून तब्बल ७ आरोपींना अटक करण्यात आली आहे. या सर्वांना ७ दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली असून, आणखी दोन आरोपींना ट्रान्झिट रिमांडवर दिल्लीत आणले जात आहे.
मोबाईल, गॅजेट्स जप्त; आता आर्थिक चौकशी सुरू
छापेमारीदरम्यान सीबीआयने आरोपींचे मोबाईल फोन, लॅपटॉप आणि अनेक महत्त्वाची कागदपत्रे जप्त केली आहेत. हे सर्व तांत्रिक पुरावे फॉरेन्सिक तपासासाठी पाठवण्यात आले आहेत. सीबीआय सूत्रांनुसार, पेपर लीकचा मुख्य स्त्रोत आणि विद्यार्थ्यांना जोडणारे दलाल आता जाळ्यात आले आहेत. विद्यार्थ्यांकडून कोट्यवधी रुपये उकळण्यात आल्याचा संशय असून, पैशांची अफरातफर शोधण्यासाठी सीबीआयने आता या प्रकरणाची आर्थिक चौकशीही तीव्र केली आहे.