आंब्याला तापमानाचा फटका ! नांदगाव खंडेश्वर तालुक्यात आंबिया बहराची गळ
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 19, 2026 19:36 IST2026-04-19T19:35:39+5:302026-04-19T19:36:32+5:30
Amravati : तालुक्यात शेकडो हेक्टर क्षेत्रातील संत्रा आंबिया बहराची प्रचंड प्रमाणात गळ झाल्याने शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले. या तालुक्यात ८४० हेक्टर क्षेत्रात सुमारे अकराशेवर शेतकऱ्यांचे संत्रा पीक आहे.

Mangoes hit by temperature! Mangoes in bloom in Nandgaon Khandeshwar taluka
लोकमत न्यूज नेटवर्क
नांदगाव खंडेश्वर : तालुक्यात शेकडो हेक्टर क्षेत्रातील संत्रा आंबिया बहराची प्रचंड प्रमाणात गळ झाल्याने शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले. या तालुक्यात ८४० हेक्टर क्षेत्रात सुमारे अकराशेवर शेतकऱ्यांचे संत्रा पीक आहे. हवामानातील बदल, अतिउष्ण वारे, ४४ अंशाच्या पुढे गेलेले तापमान या सर्व बाबीचा संत्रा पिकावर विपरीत परिणाम होऊन आंबिया संत्रा बहराची प्रचंड गळ झाली आहे.
संत्रा पिकाच्या मशागतीसाठी शेतकऱ्यांना भरपूर खर्च करावा लागतो. पण, निसर्गाच्या अवकृपेने उत्पादन खर्चही यंदा निघणार नाही. आंबिया बहराच्या संत्र्याची यावर्षी झाडावर चांगल्या प्रमाणात फूट झाली होती. हा संत्रा ऑक्टोबर महिन्यात तोडणीसाठी येत असल्याने त्याला चांगला दर मिळतो. पण, बोराच्या व तुरीच्या आकाराची संत्रा फळे काळी होऊन गळाली. तालुक्यातील संत्रा आंबिया बहाराची झालेली गळ याबाबत कृषी विभागाने पाहणी करून त्यांना योग्य मार्गदर्शन करावे व नुकसानाचे पंचनामे करून शासनाने संत्रा उत्पादक शेतकऱ्यांना मदत द्यावी, अशी मागणी आहे.
"माझ्या कुटुंबातील खातेदारांकडे सुमारे १२ एकर क्षेत्रात संत्रा पीक आहे. त्या संत्रा पिकावर तीन फवारणीही केली. पण, झाडावर असलेला बोराच्या आकाराचा व तुरीच्या दाण्याएवढी संत्रा फळे काळी होऊन गळाली आहे."
- अमोल शिरभाते, नांदगाव खंडेश्वर
"माझ्या अडीच एकर शेतात संत्रा झाडे आहे. वातावरणातील बदल, प्रचंड उष्णतामान व उष्ण वारे यामुळे आंबिया बहराच्या संत्राफळाची प्रचंड प्रमाणात गळ झाली."
- अनिल सरोदे, शेतकरी, नांदसावंगी