प्रदीप भाकरे
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : स्थानिक खोलापुरी गेट परिसरातील चार कोवळ्या जीवांसाठी रविवारची 'डबा पार्टी' आयुष्याची शेवटची पार्टी ठरली. इन्स्टाग्रामवरून शोधलेल्या घातखेडा तलावाच्या निर्जन जंगल परिसरात फिरायला गेलेल्या दहा मुलांपैकी चौघांचा पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाला. ज्या तलावाचा परिसर पायलने इन्स्टाग्रामवरून आनंदासाठी निवडला होता, तोच तलाव तिच्यासह अन्य तिघांसाठी मृत्यूचा सापळा ठरला.
खोलापुरी गेट परिसरातील दहा मुले मुली रविवारी दुपारी नरेंद्र सहदेव जोशी यांच्या ऑटोने डबा पार्टीसाठी घातखेडा तलावावर गेले होते. यात नरेंद्र जोशी यांच्या कन्या सोनाली व भूमिका हिच्यासह मुलगा मानव उर्फ आदित्य हा देखील होता. दुपारी १:३० च्या सुमारास सर्वांनी तलावाच्या काठी आनंदाने जेवण केले. जेवणानंतर सेल्फी आणि ग्रुप फोटोचा आनंद लुटला गेला. कोणालाही कल्पना नव्हती की, हे त्यापैकी चौघांचे शेवटचे फोटो असतील. दुपारी २:१० च्या सुमारास नंदिनी बाळू काकणे (२१) वगळता इतर नऊ जण पाण्यात उतरले. यावेळी १२ वर्षीय आदित्य जोशी हा तलावातील गाळात फसला. त्याला वाचवण्यासाठी त्याची बहीण सोनाली - (१६), नातेवाईक पायल पंडित (२१) आणि यश काकणे (१३) धावून गेले. मात्र, पाण्याचा आणि गाळाचा अंदाज न आल्याने हे चौघेही एकापाठोपाठ एक पाण्यात बुडाले. फ्रेजरपुरा पोलिसांनी या - प्रकरणी आकस्मिक मृत्यूची नोंद केली.
एकाच कुटुंबातील दोन चिमण्या पाखरांचा अंत
या दुर्घटनेत नरेंद्र जोशी यांच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. दोन मुलींनंतर झालेला एकुलता एक मुलगा आदित्य आणि मोठी मुलगी सोनाली या दोघांचाही या घटनेत मृत्यू झाला. दोन्ही मुले दगावल्याने जोशी कुटुंब पूर्णपणे कोलमडून गेले आहे. विशेष म्हणजे मुलगी भूमिकाहीदेखील सोबत होती.
पायलनेच शोधले होते लोकेशन
या घटनेतील सर्वात विदारक वास्तव म्हणजे, पायल पंडित हिनेच इन्स्टाग्रामवर सर्च करून अमरावती मार्डी रोडवरील गोडे कॉलेजसमोरील 'घातखेडा तलाव' हे सुमारे १५ किमी अंतरावरील ठिकाण डबा पार्टीसाठी निश्चित केले होते. ज्या सोशल मीडियाच्या माध्यमातून तिने आनंदाचे क्षण शोधले, त्याच ठिकाणाने तिचा आणि तिच्या मित्रांचा बळी घेतल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
इर्विनमध्ये नातेवाईकांचा आक्रोश
खोलापुरी गेट भागातील ही मुले असल्याने संपूर्ण परिसरात स्मशानशांतता पसरली आहे. इर्विन रुग्णालयात शवविच्छेदनासाठी मृतदेह आणले असता, नातेवाईकांनी केलेला आक्रोश हृदय पिळवटून टाकणारा होता. तलावात जाऊ नका, अशी विनवणी नंदिनी वारंवार करत होती, मात्र नियतीला काही वेगळेच मान्य होते. कार्तिक मकेश्वरने काठीचा आधार दिल्याने आचल थोडक्यात बचावली.
नंदिनीच्या डोळ्यादेखत त्या चौघांवर काळाचा घाला
या घटनेची प्रत्यक्षदर्शी नंदिनी काकणे हिने हा थरार आपल्या डोळ्यांनी पाहिला. तिने आरडाओरड केली, मात्र परिसरात कोणीही नसल्याने ती मदतीसाठी धावत घातखेडा गावात गेली. ग्रामस्थ घटनास्थळी पोहोचेपर्यंत उशीर झाला होता. स्थानिक रहिवाशांनी तातडीने पाण्यात उडी घेऊन शोध घेतला, मात्र बाहेर काढले तेव्हा या चारही जणांचा श्वास थांबला होता. पायलनेच हे ठिकाण इन्स्टावरून शोधले, तेच तिच्यासाठी शेवटचे ठरले, असे नंदिनी ही ओक्साबोक्सी रडत सांगत होती. घटनास्थळ पंचनाम्यासाठी पोलिसांनी तिला तलावाच्या काठावर नेले. त्यावेळी ती 'नाही, मी तेथे येऊ शकणार नाही', असे म्हणत शुन्यात हरविली होती. तिच्यात बयानाचा त्राण उरला नव्हता.
हे दहा जण गेले होते डबा पार्टीला
आचल गजानन काकणे (१६), मानव उर्फ आदित्य नरेंद्र जोशी (१२), सोनाली नरेंद्र जोशी (१६), पायल बबलू पंडित (२१), सलोनी निलेश मोहोड (१७), नंदिनी बाळू काकणे (२१), आदित्य पिंटू मकेश्वर (१७), कार्तिक पिंटू मकेश्वर (१३), भूमिका नरेंद्र जोशी (१६) व यश गजानन काकणे (१३, सर्व रा. खोलापुरी गेट, अमरावती)
Web Summary : A picnic at Ghatkheda lake, discovered on Instagram, turned tragic. Four out of ten young people drowned. One person got stuck in the mud, and three others died while trying to save them. The incident occurred near Amravati; families are devastated.
Web Summary : इंस्टाग्राम पर मिली जगह पर पिकनिक मनाना महंगा पड़ा। घातखेड़ा झील में दस युवाओं में से चार डूब गए। एक व्यक्ति कीचड़ में फंसा, और तीन उसे बचाने में डूब गए। अमरावती के पास हुई घटना से परिवारों में मातम छा गया।