अमरावती विभागाचा दहावीचा निकाल ९०.५० टक्के, राज्यात सहाव्या स्थानी; बुलढाणा विभागात अव्वल
By उज्वल भालेकर | Updated: May 8, 2026 12:39 IST2026-05-08T12:37:22+5:302026-05-08T12:39:15+5:30
Amravati : माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ इयत्ता दहावी परीक्षेचा निकाल शुक्रवार दि.८ मे रोजी जाहिर करण्यात आला आहे. यामध्ये अमरावती विभागाचा निकाल ९०.५० टक्के लागला आहे.

Amravati division's 10th result is 90.50 percent, sixth in the state; top in Buldhana division
अमरावती : माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ इयत्ता दहावी परीक्षेचा निकाल शुक्रवार दि.८ मे रोजी जाहिर करण्यात आला आहे. यामध्ये अमरावती विभागाचा निकाल ९०.५० टक्के लागला आहे. राज्यात यंदा अमरावती विभाग सहाव्या स्थानी राहिला आहे. तर उत्तीर्णतेच्या टक्केवारीत अमरावती विभागातून बुलढाणा जिल्हा अव्वल स्थानी आहे. गेल्या वर्षी अमरावती विभागाचा निकाल ९२. ९५ टक्के लागला होता. यंदा २.४५ टक्क्याने निकाल घटला आहे.
विभागातील टक्केवारीत विभागात बुलढाणा जिल्ह्याने अव्वल स्थान मिळवले असून या जिल्ह्याचा निकाल ९३.९५ टक्के लागला आहे. अकोला ९०.७४, अमरावती ९०.०६, यवतमाळ ८८.३८ टक्के तर वाशिम जिल्ह्याचा ८८.०४ टक्के इतका लागला आहे. दहावीच्या परीक्षेसाठी अमरावती विभागातून एकूण १ लाख ६१ हजार ७१९ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. प्रत्यक्षात १ लाख ६० हजार ३७ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. यात एकूण १ लाख ४४ हजार ८३५ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. उत्तीर्णतेची एटक्केवारी ९०.९५ टक्के इतकी आहे. गतवर्षीच्या तुलनेत यंदा निकालाची टक्केवारी घसरली आहे. राज्यात अमरावती विभाग हा सहाव्या क्रमांकावर राहिला आहे. गतवर्षी देखील अमरावती विभाग सहाव्या स्थानी होता.
विभागात यंदाही मुलींचीच बाजी
दरवर्षीप्रमाणे यंदाही दहावीच्या निकालात अमरावती विभागातून मुलींनी बाजी मारली आहे. विभागातून एकूण ७४ हजार ६६८ मुलींनी परीक्षा दिली. त्यापैकी ७० हजार २५७ मुली उत्तीर्ण झाल्या असून निकालाची टक्केवारी ही ९४.०९ टक्के इतकी आहे. विभागातून ८५ हजार ३६९ मुलांनी परीक्षा दिली. त्यापैकी ७४ हजार ५७८ उत्तीर्ण झाले असून टक्केवारी ही ८७.३५ टक्के इतकी आहे.