शेवगाव : तालुक्यातील खडका ते प्रभुवाडगाव रस्त्याच्या मागणीसाठी गदेवाडीफाटा येथे रस्ता दुरुस्तीच्या मागणीसाठी युवक काँग्रेसच्या वतीने गुरुवारी सकाळी रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. यावेळी पंचायत समिती बांधकाम विभागाचे शाखा अभियंता आर.बी. साळवे यांनी निवेदन स्वीकारले. यावेळी त्यांनी येत्या चार दिवसांत रस्त्याची पाहणी करून अंदाजपत्रक जिल्हा परिषदेकडे पाठवू, असे आश्वासन दिल्यानंतर रास्ता रोको स्थगित करण्यात आला.
काँग्रेसचे शेवगाव तालुकाध्यक्ष अमोल फडके, युवकचे तालुकाध्यक्ष बब्रू वडघने यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आलेल्या आंदोलनात शहराध्यक्ष किशोर कापरे, उपाध्यक्ष सचिन काळे, प्रभूवाडगावचे उपसरपंच दीपक बटुळे, कार्याध्यक्ष सोपान घोरतळे, जगदीश वडघने, भूषण वडघने, योगेश वडघने आदी सहभागी झाले होते.
यावेळी गावकऱ्यांनी घोषणाबाजी करत रस्त्याच्या अवस्थेबाबत तीव्र शब्दात नाराजी व्यक्त करून प्रशासन व लोकप्रतिनिधींचा निषेध नोंदविला. पंचायत समितीच्या बांधकाम विभागाचे अभियंता आर.बी. साळवे यांनी चार दिवसांत रस्त्याची पाहणी करून कामाचे अंदाजपत्रक जिल्हा परिषद विभागाकडे सादर करण्यात येईल, असे आश्वासन दिले. पोलीस निरीक्षक प्रभाकर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.