पाणीयोजना असूनही नागरिकांना मिळतेय अशुद्ध पाणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 25, 2021 04:21 IST2021-09-25T04:21:11+5:302021-09-25T04:21:11+5:30
टाकळीमियाँ गावासाठी शुद्ध पिण्याच्या पाण्याचा पुरवठा व्हावा म्हणून जलस्वराज योजनेतून ९ कोटी २७ लाख रुपये खर्च करून पाणीयोजना ...

पाणीयोजना असूनही नागरिकांना मिळतेय अशुद्ध पाणी
टाकळीमियाँ गावासाठी शुद्ध पिण्याच्या पाण्याचा पुरवठा व्हावा म्हणून जलस्वराज योजनेतून ९ कोटी २७ लाख रुपये खर्च करून पाणीयोजना पूर्ण करण्यात आली. फेब्रुवारी २०२१ मध्ये योजना पूर्ण झाली. ही योजना टाकळीमियाँ ग्रामपंचायतीने ताब्यात घेऊन सहा महिने झाले. या गावाला संपूर्ण दूषित पाणीपुरवठा होत आहे. त्यामुळे गावातील नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्नदेखील मोठ्या प्रमाणात भेडसावत आहे. गावाला दूषित पाणीपुरवठा होत असून आरोग्य विभागाकडून प्रयोगशाळेत पाठविलेले नमुने शुद्ध असल्याचा अहवाल आल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. योजनेची दुरुस्ती करावी, अशी मागणी सरपंच विश्वनाथ निकम, सुरेश भानुदास करपे, अकबर सय्यद, आण्णासाहेब सगळगिरे, बाळासाहेब माने, जनार्दन गोसावी यांनी केली आहे.
..............
मुसळवाडी तलावातून पाणी शुद्धीकरण्यासाठी टाकळीमियाँ पाणीपुरवठा जलशुद्धीकरण केंद्रात येते. येणारे पाणी हे अतिशय दूषित आहे. त्यातूनच संपूर्ण गावाला दूषित पाणी पुरवठा होतो. ग्रामपंचायतीला हे पाणी शुद्ध करण्यासाठी मासिक तीन लाख रुपये खर्च येतो. तरीही समस्या कायम आहे. याठिकाणी तत्काळ संपूर्ण तलावाला कुंपण भिंत व तलावातील गाळ काढणे अंत्यत गरजेचे आहे.
- सुरेश निमसे, ग्रामस्थ
...........
टाकळीमियाँ गावातील पिण्याचे पाण्याचे नमुने आपण दर महिन्याला प्रयोगशाळेत पाठवत असतो. या महिन्याचा अहवाल अद्याप प्राप्त झाला नाही. परंतु मागील चार महिन्यांचे अहवाल हा शुद्ध पाणी असल्याचा आलेला आहे.
- डाॅ. कीर्ती मदने, मेडिकल ऑफीसर