जिल्हाधिकारी व पोलीस अधीक्षकांनी सोमवारी दुपारी नगर-औरंगाबाद रोडवरील आशीर्वाद लॉन्स, सिटी लॉन्स व ताज लॉन्सची तपासणी केली. यावेळी तीनही ठिकाणी लग्नसोहळा व कार्यक्रम सुरू होते. प्रत्येक ठिकाणी ५० पेक्षा जास्त लोकांची उपस्थिती होती. अनेकांनी मास्क घातलेले नव्हते, सोशल सिस्टन्सिंगचा नियमही कुणी पाळताना दिसले नाही. पाहुणे मंडळी एकत्र बसून भोजनाचा आस्वाद घेत होते. यावेळी तीनही लॉन्समधील एकूण १३० जणांना मास्क न घातल्याने दंड करण्यात आला. दंडाची ही रक्कम संबंधित लॉन्स मालकाकडून वसूल केली जाणार आहे. यावेळी जिल्हाधिकारी व पोलीस अधीक्षकांनी लॉन्स मालकांसह उपस्थितांना कोरोनासंदर्भातील नियम पाळण्याची समज दिली. त्यानंतर अहमदनगर महाविद्यालयात भेट देऊन पाहणी केली. यावेळी मास्क न घालणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली. यावेळी जिल्हा विशेष शाखेचे पोलीस निरीक्षक राजेंद्र पाटील, तोफखाना पोलीस ठाण्याचे निरीक्षक सुनील गायकवाड, कोतवाली ठाण्याचे निरीक्षक राकेश मानगावकर आदी उपस्थित होते.
--------------------------
तीन दिवसांत २१०० जणांवर कारवाई
कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी पोलीस प्रशासनाने कडक कारवाईस प्रारंभ केला आहे. गेल्या तीन दिवसांत जिल्ह्यात कोरोनासंदर्भातील नियम तोडल्याप्रकरणी २ हजार १०० केस दाखल करण्यात आल्या आहेत, तसेच नियम पाळण्याबाबत २५० खासगी आस्थापनांना नोटीस बजावली आहे. येणाऱ्या काळात आणखी कडक कारवाई करण्याचा इशारा प्रशासनाने दिला आहे.
-----------------------------
आधी सूचना, आता थेट कारवाई
कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजनांचे पालन करा, असे प्रशासनाकडून वारंवार आवाहन करण्यात येत आहे.
शहरात बहुतांशी जण मात्र ही सूचना गांभीर्याने घेत नसल्याने प्रशासनाने आता थेट कारवाईला सुरुवात केली आहे. कार्यक्रमात गर्दी करणारे व मास्क न वापरणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई केली जात आहे.
फोटो २२ कारवाई १,२
ओळी-