Join us
Daily Top 2Weekly Top 5

रशियन कच्च्या तेलावर गुड न्युज! अमेरिकेचा युटर्न; नकार दिल्यानंतर आता केलं 'हे' महत्त्वाचं काम

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 18, 2026 09:59 IST

America On Russian Crude Oil: इराण युद्धामुळे जगात तेलाचा पुरवठा विस्कळीत झाला होता, हे लक्षात घेऊन अमेरिकेनं रशियाकडून तेल खरेदीची परवानगी दिली होती. या सवलतीची मुदत गेल्या शनिवारी संपली होती.

America On Russian Crude Oil: अमेरिकेनं भारत आणि इतर देशांना रशियाकडून तेल आणि इतर पेट्रोलियम उत्पादनं खरेदी करण्यासाठी दिलेली सवलत एका महिन्यासाठी वाढवली आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या प्रशासनाने शुक्रवारी ही घोषणा केली. इराण युद्धामुळे जगात तेलाचा पुरवठा विस्कळीत झाला होता, हे लक्षात घेऊन अमेरिकेनं रशियाकडून तेल खरेदीची परवानगी दिली होती. या सवलतीची मुदत गेल्या शनिवारी संपली होती. विशेष म्हणजे, अमेरिकेचे अर्थमंत्री स्कॉट बेसेंट यांनी अलीकडेच म्हटलं होतं की, रशियन आणि इराणी तेलावर दिलेली सवलत अमेरिका वाढवणार नाही.

१६ मे पर्यंत मुदतवाढ

रॉयटर्सच्या रिपोर्टनुसार, अमेरिकेच्या ट्रेझरी विभागानं जहाजांमध्ये लोड केलेल्या तेलाची खरेदी करण्यासाठी १६ मे पर्यंत परवानगी दिली आहे. यापूर्वी दिलेल्या सवलतीची मुदत ११ एप्रिल रोजी संपली होती. इंटेलिजन्स फर्म 'Kpler' नुसार, मार्चमध्ये भारतानं रशियाकडून दररोज सरासरी १.९८ मिलियन बॅरल कच्चं तेल खरेदी केलं, जे जून २०२३ नंतरचं सर्वाधिक प्रमाण आहे. भारतानं एप्रिलमधील डिलिव्हरीसाठी रशियाकडून सुमारे ६० मिलियन बॅरल तेल खरेदी केलं आहे.

रशियाचा भारताला पूर्ण सहकार्याचा शब्द

भारतातील रशियाचे राजदूत डेनिस अलीपोव यांनी आश्वासन दिलं आहे की, त्यांचा देश भारताला कच्चं तेल, एलपीजी (LPG) आणि एलएनजी (LNG) चा पुरवठा वाढवेल. रशिया भारताला त्याच्या गरजेनुसार तेलाचा पुरवठा करण्यास तयार असल्याचं त्यांनी सांगितलं. अलीपोव यांनी भारताचा उल्लेख 'एक विश्वासार्ह भागीदार' असा केला आहे.

'सेंटर फॉर रिसर्च ऑन एनर्जी अँड क्लीन एअर' (CREA) या युरोपियन थिंक टँकनुसार:मार्चमध्ये भारताची रशियाकडून कच्च्या तेलाची आयात तीन पटीने वाढून ५.८ अब्ज डॉलर्सवर पोहोचली.फेब्रुवारीमध्ये ही आयात १.५४ अब्ज डॉलर्स होती.मार्चमध्ये भारताने रशियाकडून ३७१ दशलक्ष डॉलर्सचा कोळसा आणि १९६ दशलक्ष डॉलर्सची ऑईल उत्पादनं आयात केली.

अमेरिकेचा निर्णय आणि पुरवठ्याची स्थिती

रशियन तेल खरेदीवरील सवलत एका महिन्यासाठी वाढवली. यापूर्वी अर्थमंत्र्यांनी सवलत न वाढवण्याचे संकेत दिले होते, मात्र ट्रम्प प्रशासनाने मुदत वाढवण्याचा निर्णय घेतला. २०२४ मध्ये भारताने रशियाकडून दररोज सरासरी २ मिलियन बॅरल कच्चं तेल खरेदी केलं. गेल्या वर्षी भारताने रशियाकडून सुमारे ४४ अब्ज डॉलर्सचं कच्चं तेल विकत घेतलं होतं. अमेरिकेच्या दबावामुळे गेल्या वर्षाच्या अखेरच्या महिन्यात भारताने रशियाकडून खरेदीत कपात केली होती, तरीही रशिया भारताचा सर्वात मोठा पुरवठादार राहिला. होर्मुज सामुद्रधुनीतून जहाजांची ये-जा बंद झाल्यामुळे निर्माण झालेल्या जागतिक तेल संकटामुळे अमेरिकेने ही सवलत दिली होती.

English
हिंदी सारांश
Web Title : Good News: US Extends Russian Oil Import Waiver for India

Web Summary : America extended the Russian oil import waiver for India until May 16th. Despite earlier reluctance, the US allows continued oil purchases amidst global supply concerns, making Russia a key supplier.
टॅग्स :खनिज तेलरशियाअमेरिका