प्रेमसंबंधाचा करुण अंत! मुलीच्या नातेवाईकांच्या मारहाणीमुळे हतबल झालेल्या तरुणाने संपवलं आयुष्य
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 6, 2026 19:44 IST2026-05-06T19:44:11+5:302026-05-06T19:44:11+5:30
अहिल्यानगरमध्ये यात्रेत मुलीसोबत फिरताना आढळल्याने तरुणाला बेदम मारहाण करण्यात आली ज्यानंतर त्याने टोकाचं पाऊल उचललं.

प्रेमसंबंधाचा करुण अंत! मुलीच्या नातेवाईकांच्या मारहाणीमुळे हतबल झालेल्या तरुणाने संपवलं आयुष्य
Ahilyanagar Crime: गावच्या यात्रेत प्रेमसंबंध असणाऱ्या मुलीसोबत फिरणाऱ्या युवकास मुलीचे नातेवाईक आणि इतरांनी शिवीगाळ करीत मारहाण केल्याने संबंधित युवकाने नैराश्यातून कर्जतमध्ये राहत्या खोलीत गळफास घेत आत्महत्या केली. ओंकार सुभाष एकाड (२०) असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव असून, या घटनेत मुलीच्या वडिलांना अटक करण्यात आली असल्याची माहिती कर्जत पोलिसांनी दिली.
कर्जत तालुक्यातील एका मुलीचे ओंकार एकाड याच्यासोबत प्रेमसंबंध होते. २ मे रोजी शिंदा गावच्या यात्रेत ओंकार हा संबंधित तरुणीसोबत फिरताना मुलीचे नातेवाईक आणि इतर ग्रामस्थांना आढळून आला. दोघे सोबत फिरताना आढळल्याने नातेवाईक आणि इतरांना राग आल्याने त्यांनी ओंकारला लाथाबुक्क्याने मारहाण करीत शिवीगाळ केली, तसेच घरी नेत पुन्हा मारहाण आणि धमकावल्याने ओंकार नैराश्यात गेला होता.
सोमवारी संध्याकाळी कर्जत बाजारतळातील निलंगे यांच्या इमारतीत राहणारा ओंकार त्याच्या मित्रास गळफास घेतलेल्या अवस्थेत मिळून आला. त्याने तत्काळ कर्जत पोलिसांत माहिती दिली. पोलिस उपअधीक्षक प्रवीण लोखंडे, पोलिस निरीक्षक सोपान शिरसाट यांनी घटनास्थळी भेट देत, पंचनामा करीत मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी उपजिल्हा रुग्णालयात रवाना केला.
मुलीच्या नातेवाइकांनी आणि इतर ग्रामस्थांनी ओंकारला मारहाण करून शिवीगाळ दमदाटी केल्याने तो नैराश्यात होता. त्याला आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा सुभाष बलभीम एकाड यांच्या फिर्यादीवरून कर्जत पोलिस ठाण्यात दाखल करण्यात आला. या घटनेत मुलीचे सात ते आठ नातेवाईक आणि इतर काही अज्ञात लोकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यात मुलीच्या वडिलांना अटक करण्यात आली. इतर फरार आरोपींच्या अटकेसाठी पोलिस पथके रवाना करण्यात आली असल्याची माहिती पोलिस उपअधीक्षक प्रवीण लोखंडे यांनी दिली.
पोलिस ठाण्यात तणावाचे वातावरण
आमचं लेकरू जीवानिशी गेले आहे. त्यास आत्महत्येस प्रवृत्त करायला लावणाऱ्या सर्व आरोपींना तत्काळ अटक करा, अशी मागणी खांडवीच्या ग्रामस्थांनी लावून धरली. सर्व आरोपींना अटक केल्याशिवाय मृतदेह ताब्यात घेणार नाही, अशी भूमिका ओंकारच्या कुटुंबीयांनी घेतल्याने कर्जत पोलिस ठाण्यात काही काळ तणावाचे वातावरण झाले होते.