दिग्रस तालुक्यात कृषी विभागाची विशेष मोहीम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 27, 2020 05:00 AM2020-09-27T05:00:00+5:302020-09-27T05:00:11+5:30

सोयाबीन सवंगणीनंतर भिजणार नाही. तसेच थ्रेशरचा वापर करताना निम्मा वेग (४५० आरपीएम) किंवा कमी दाबाने मळणी करावी, साठवणुकीचे पोते स्वच्छ व कोरडे असावे, आर्द्रता ९ ते १२ टक्के राहील याची खात्री करावी, पोते भिंतीपासून दूर लाकडी पाटीवर एकावर एक केवळ तीन पोतेच हवेशीर व कोरड्या जागेत ठेवावे, असे आवाहन करण्यात आले.

Special campaign of agriculture department in Digras taluka | दिग्रस तालुक्यात कृषी विभागाची विशेष मोहीम

दिग्रस तालुक्यात कृषी विभागाची विशेष मोहीम

Next
ठळक मुद्देशेतकऱ्यांना मार्गदर्शन, पुढील हंगामासाठी सोयाबीन बियाण्याची निर्मिती, गावोगावी जनजागृती कार्यक्रम

लोकमत न्यूज नेटवर्क
दिग्रस : तालुक्यात कृषी विभागाने पुढील हंगामासाठी सोयाबीन बियाणे राखून ठेवण्याकरिता विशेष मोहीम सुरू केली आहे. पुढील वर्षी सोयाबीन बियाण्याची टंचाई होण्याची शक्यता लक्षात घेऊन कृषी विभागाने ही मोहीम सुरू केली.
सध्या सोयाबीन काढणीला सुरुवात झाली आहे. यावर्षी अनेक शेतकऱ्यांना बियाणे मिळाले नाही. हीच स्थिती पुढील वर्षी कायम राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे पुढील खरीप हंगामात शेतकऱ्यांना घरचेच सोयाबीन बियाणे वापरता यावे, याकरिता तालुका कृषी अधिकारी एस.एस. राजपुत यांच्या मार्गदर्शनात कृषी विभागाने विशेष मोहीम सुरू केली. यात सोयाबीन बियाणे निर्मिती, काढणी आणि साठवणूक करताना घ्यावयाची काळजी याबाबत मोख, गांधीनगर, विठोली, लाखरायाजी येथे शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यात आले.
सोयाबीन सवंगणीनंतर भिजणार नाही. तसेच थ्रेशरचा वापर करताना निम्मा वेग (४५० आरपीएम) किंवा कमी दाबाने मळणी करावी, साठवणुकीचे पोते स्वच्छ व कोरडे असावे, आर्द्रता ९ ते १२ टक्के राहील याची खात्री करावी, पोते भिंतीपासून दूर लाकडी पाटीवर एकावर एक केवळ तीन पोतेच हवेशीर व कोरड्या जागेत ठेवावे, असे आवाहन करण्यात आले. या अभियानात मंडळ कृषी अधिकारी, कृषी सहायक, कृषी पर्यवेक्षक, आत्माचे कर्मचारी, शेतकरी मित्र शेतकऱ्यांना मार्गदर्शन करीत आहे. गावोगावी शेतकऱ्यांना पुढील हंगामासाठी घरचेच सोयाबीन बियाणे राखून ठेवण्याचे आवाहन केले आहे.

रोगट व चुकीची झाडे उपटावी
पुढील हंगामासाठी सोयाबीन बियाणे तयार करताना प्रथमच शेतातील रोगट आणि चुकीची झाडे उपटून काढावी. शेवटच्या फवारणीला आंतरप्रवाही बुरशीनाशकांचा वापर करावा, गरजेनुसार शेतकऱ्यांनी क्षेत्र निश्चित करून तेथीलच पिकाचे बियाणे राखून ठेवावे. याशिवाय पुढील हंगामापर्यंत नेमकी कोणती काळजी घ्यावी याबाबत शेतकऱ्यांमध्ये जनजागृती केली जात आहे. पुढील हंगामात बियाणे उत्पादक कंपन्या बियाणे विक्रीकडे पाठ फिरवतील, असे लक्षात येत आहे. त्यामुळे कृषी विभागाने ही मोहीम सुरू केली आहे.

बियाण्याच्या तुटवड्याची शक्यता
पुढील हंगामात सोयाबीन बियाण्याच्या तुटवड्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी घरचेच सोयाबीन बियाणे राखून ठेवणे आवश्यक झाले आहे. यावर्षी शेतकऱ्यांना चढ्या दराने बियाणे खरेदी करावे लागले. त्यातही निकृष्ट बियाण्यामुळे दुबार पेरणीचे संकट ओढवले होते. यंदा घरीच बियाणे तयार केले जात आहे.

Web Title: Special campaign of agriculture department in Digras taluka

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.