शिवसैनिकाचा खून राजकीय वैमनस्यातून

By Admin | Updated: May 24, 2014 23:57 IST2014-05-24T23:57:53+5:302014-05-24T23:57:53+5:30

शिवसेनेचे उपतालुका प्रमुख दादू मिश्रा यांचा खून राजकीय सुडातून झाला असल्याचा आरोप शिवसेनेचे आमदार संजय राठोड यांनी केला आहे. तसेच या संदर्भात शिवसेनेच्यावतीने अपर पोलीस

Shivsainika's murder will be seen in political vandalism | शिवसैनिकाचा खून राजकीय वैमनस्यातून

शिवसैनिकाचा खून राजकीय वैमनस्यातून

यवतमाळ : शिवसेनेचे उपतालुका प्रमुख दादू मिश्रा यांचा खून राजकीय सुडातून झाला असल्याचा आरोप शिवसेनेचे आमदार संजय राठोड यांनी केला आहे. तसेच या संदर्भात शिवसेनेच्यावतीने अपर पोलीस अधीक्षक जानकीराम डाखोरे यांना शनिवारी निवेदन देण्यात आले. त्यामध्ये अनेक शंकाकुशंका व्यक्त करण्यात आला असून सूत्रधाराला गजाआड करण्याची मागणी करण्यात आली आहे.

उमरसरा परिसरातील तीन फोटो चौकात रामनारायण उर्फ दादू मिश्रा रा. उमरसरा या शिवसेना उपतालुका प्रमुखाचा शुक्रवारी सायंकाळी ५.३0 वाजता निर्घृण खून करण्यात आला. या घटनेचा निषेध नोंदवित शिवसेनेचे जिल्हा प्रमुख आमदार संजय राठोड यांच्या नेतृत्वात येथील जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयावर शनिवारी दुपारी मोर्चा धडकला. या वेळी अपर पोलीस अधीक्षक जानकीराम डाखोरे यांची भेट घेऊन आमदार संजय राठोड आणि शिवसेना पदाधिकार्‍यांनी चर्चा केली. त्यामध्ये दादू मिश्रा यांनी उमरसरा ग्रामपंचायती अंतर्गत केल्या जात असलेल्या एका बांधकामाची तक्रार जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकार्‍यांकडे केली होती. याचा वचपा काढण्यासाठी दादू मिश्रा यांचा निर्घृण खून करण्यात आला, असा आरोप शिवसेना पदाधिकार्‍यांनी केला. तसेच या कामाचा कोणत्या व्यक्तीशी संबंध आहे, कुठल्या कंत्राटदाराने ही कामे केली आहेत, तक्रारीने कुणाचे नुकसान होणार होते, त्यांच्या पाठिशी कोण आहे, त्यांना पाठिशी घालणारेच या घटनेचे सूत्रधार असल्याचेही निवेदनात म्हटले आहे. शिवाय दादू मिश्रा यांनी उमरसरा भागात शिवसेनेचे कार्य प्रभावीपणे केले होते. त्यामुळे काही राजकीय पक्षांना त्यांचा राजकीयदृष्ट्या त्रास होत होता. त्यातून ही घटना घडली असावी, असा संशयही व्यक्त करण्यात आला. दादू मिश्रा यांच्या मारेकर्‍यांना तत्काळ अटक करून सूत्रधाराला गजाआड करावे, अशी मागणीही या वेळी शिवसेना पदाधिकार्‍यांनी केली. तसेच मारेकरी आणि सूत्रधारांना अटक न झाल्यास शिवसेना तीव्र स्वरुपाचे आंदोलन छेडेल, असा इशाराही देण्यात आला. निवेदन देतेवेळी आमदार संजय राठोड, निवासी उपजिल्हा प्रमुख प्रवीण पांडे, उपजिल्हा प्रमुख गजानन डोमाळे, राजेंद्र गायकवाड, माजी पंचायत समिती सदस्य संजय रंगे, किशोर इंगोले, गणेश बयास यांच्यासह शिवसेना पदाधिकारी व शिवसैनिक उपस्थित होते. (स्थानिक प्रतिनिधी)

Web Title: Shivsainika's murder will be seen in political vandalism