पुसद वनविभाग होतोय वाळवंट

By Admin | Updated: September 25, 2014 23:34 IST2014-09-25T23:34:32+5:302014-09-25T23:34:32+5:30

आंध्रप्रदेशातील सराईत सागवान तस्करांनी स्थानिक गुन्हेगारांना हाताशी धरून सागवानाची बेसुमार कत्तल चालविली आहे. पुसद वन विभागांतर्गत अलिकडच्या काळात उघडकीस आलेल्या घटनांवरून घनदाट

Pusad forests | पुसद वनविभाग होतोय वाळवंट

पुसद वनविभाग होतोय वाळवंट

अशोक काकडे - पुसद
आंध्रप्रदेशातील सराईत सागवान तस्करांनी स्थानिक गुन्हेगारांना हाताशी धरून सागवानाची बेसुमार कत्तल चालविली आहे. पुसद वन विभागांतर्गत अलिकडच्या काळात उघडकीस आलेल्या घटनांवरून घनदाट जंगल वाळवंट होण्याची भीती होत आहे. दोन दिवसापूर्वी उघडकीस आलेल्या सागवान तस्करीने तर यावर शिक्कामोर्तबच केले आहे.
पुसद उपविभागातील पुसद, उमरखेड, महागाव या परिसरात मौल्यवान सागवान मोठ्या प्रमाणात आहे. या सागवानावर आंध्रप्रदेशातील सागवान तस्करांची गेल्या कित्येक वर्षांपासून वक्रदृष्टी आहे. वाहनांद्वारे येऊन चक्क मशीनच्या सहाय्याने सागवानाची कत्तल करतात आणि रातोरात आंध्रप्रदेशात सागवान पोहोचविला जातो. या प्रकाराला स्थानिक सराईत तस्करांच्या टोळ्याही सहकार्य करीत असल्याची माहिती आहे. वारंवार घडणाऱ्या सागवान तस्करीमुळे वनविभागाची लक्तरे वेशीवर टांगली जातात. वन अधिकाऱ्यांची बैठक चिखली येथे सुरू असताना आंध्रप्रदेशातील सागवान तस्कर मात्र जंगलात सागवान तोडत होते. सुदैवाने मोठी टोळी वनविभागाच्या हाती लागली. यापूर्वीही अनेक घटना उघडकीस आल्या आहेत. वर्षभरापूर्वी पुसद वनपरिक्षेत्रातून सागवान घेऊन जाणारी टाटा सुमो वन विभागाच्या हाती लागली होती. या वाहनात १.०८२ घनमीटर सागवान होते. जुलै महिन्यात महागाव, उमरखेड मार्गावरील नांदगव्हाण वनकुटीजवळ नऊ ते दहा सागवान वृक्षांची अवैध कत्तल करण्यात आली. त्यासोबतच दर्यापूर- बोरगाव बीटमध्येही कत्तल उघडकीस आली होती. मे महिन्यात खंडाळा राऊंडमध्ये २० ते २२ साग वृक्षाची अवैध कत्तल झाली होती. आॅगस्ट महिन्याच्या १३ तारखेला पुसद वनपरिक्षेत्रांतर्गत खंडाळा सर्कलमधून सागवानाचे २९ नग घेऊन जाणारा मेटॅडोअर पकडण्यात आला होता. या घटना उघडकीस आल्या म्हणून माहीत झाल्या. परंतु दररोज शेकडो वृक्षांची कत्तल केली जाते आणि बिनबोभाट आंध्रप्रदेशात या सागवानाची खेप पोहोचविली जाते. या सर्व प्रकाराला वरिष्ठांसह वनरक्षक आणि वनपालांचा तस्करांशी असलेला संबंधच कारणीभूत असल्याची चर्चा आहे.

Web Title: Pusad forests