न्यायाधीन बंद्यांना जेलमध्ये नो-एन्ट्री

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 7, 2020 05:00 IST2020-06-07T05:00:00+5:302020-06-07T05:00:07+5:30

सुरेंद्र राऊत । लोकमत न्यूज नेटवर्क यवतमाळ : कोरोना विषाणू संसर्गाचा धोका लक्षात घेता जिल्हा मध्यवर्ती कारागृह प्रशासनाने कुठल्याही ...

No-entry to jailed prisoners | न्यायाधीन बंद्यांना जेलमध्ये नो-एन्ट्री

न्यायाधीन बंद्यांना जेलमध्ये नो-एन्ट्री

ठळक मुद्देकोरोनाची भीती । आधी १४ दिवस होस्टेलमध्ये क्वारंटाईन, नंतरच प्रवेश

सुरेंद्र राऊत ।
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : कोरोना विषाणू संसर्गाचा धोका लक्षात घेता जिल्हा मध्यवर्ती कारागृह प्रशासनाने कुठल्याही कैद्याला कारागृहात थेट प्रवेश बंद केला आहे. कोरोनाचा संसर्ग होऊ नये यासाठी विशेष खबरदारी घेतली जात आहे. लॉकडाऊन सुरू झाल्यापासून न्यायालयीन कोठडीत आलेल्या प्रत्येक बंद्याला १४ दिवस बाहेरच क्वारंटाईन केल जाते. त्याची दोन वेळ वैद्यकीय तपासणी करूनच कारागृहात एन्ट्री दिली जाते.
कारागृहातील कैदी व कर्मचारी सुरक्षित रहावे, त्यांना कोरोना विषाणूचा संसर्ग होऊ नये यासाठी उपाययोजना करण्यात आल्या आहे. कामकाजाच्या पद्धतीतही बदल करण्यात आला आहे. कारागृहातील कैद्यांना सुरक्षित ठेवण्यासाठी वैद्यकीय यंत्रणा आणखी सज्ज केली आहे. कोरोना विषाणू संसर्ग असलेल्या रुग्णातही कुठलीही लक्षणे दिसत नाही. त्यामुळे कारागृह प्रशासनाला अधिक सतर्कता बाळगणे गरजेचे ठरत आहे.
लॉकडाऊन सुरू झाल्यापासून शिक्षा झालेले व न्यायालयीन कोठडी सुनावलेले जवळपास ७० बंदी कारागृहात आले. त्यांना स्वतंत्र व्यवस्था असलेल्या होस्टेलमध्ये क्वारंटाईन करून ठेवले. त्या ठिकाणी सुरक्षिततेचा बंदोबस्त लावताना कारागृह प्रशासनाला चांगलीच कसरत करावी लागत आहे. मात्र कोरोनाचा धोका ओळखून अधिकची जोखीम स्वीकारत आलेल्या प्रत्येक बंद्याला क्वारंटाईन केले जात आहे. त्याला ताब्यात घेताना वैद्यकीय तपासणी केली जाते. नंतर १४ दिवसाचा कालावधी पूर्ण झाल्यावरही वैद्यकीय तपासणी करूनच कारागृहात पाठविण्यात येते. आतापर्यंत क्वारंटाईन असलेल्या ७० जणांंपैकी १५ बंद्यांची कारागृहात रवानगी झालेली आहे.

धोका टाळण्यासाठी स्वीकारली जोखीम
जिल्हा कारागृह अधीक्षक कीर्ती चिंतामणी म्हणाल्या, कारागृहात सुरक्षिततेच्या सर्वच सुविधा असतात. त्या तुलनेत क्वारंटाईन सेंटर उभारलेल्या होस्टेलमध्ये सुरक्षा सुविधा नाही. त्यामुळे येथे गार्ड लावताना मोठ्या अडचणी येत आहे. मात्र यापेक्षाही कोरोनाचे संकट अधिक गंभीर असल्याने ही जोखीम स्वीकारून कारागृहातील अधिकारी-कर्मचारी काम करीत आहे. त्यामुळेच आतापर्यंत स्थिती नियंत्रणात असल्याचे सांगितले.

Web Title: No-entry to jailed prisoners