माहूरगडावर नवरात्रौत्सवाची जय्यत तयारी

By Admin | Updated: October 3, 2015 02:22 IST2015-10-03T02:22:03+5:302015-10-03T02:22:03+5:30

श्रीक्षेत्र माहूर गडावर १३ ते २२ आॅक्टोबरदरम्यान नवरात्रोत्सव साजरा होणार आहे.

Navratri Navaratri Navaratri Preparation | माहूरगडावर नवरात्रौत्सवाची जय्यत तयारी

माहूरगडावर नवरात्रौत्सवाची जय्यत तयारी

आढावा बैठक : प्रशासक मंडळ व जिल्हाधिकाऱ्यांनी घेतली माहिती
माहूर : श्रीक्षेत्र माहूर गडावर १३ ते २२ आॅक्टोबरदरम्यान नवरात्रोत्सव साजरा होणार आहे. श्री रेणुकादेवी मंदिरावर प्रशासक मंडळाने भाविकांना सोयी-सुविधा पुरविण्यासाठी जय्यत तयारी केली आहे. समितीचे अध्यक्ष न्यायमूर्ती आनंद यावलकर तसेच जिल्हाधिकारी सुरेश काकाणी यांनी गुरुवारी याबाबत आढावा बैठक घेतली.
तहसील कार्यालयात जिल्हाधिकारी सुरेश काकाणी यांच्या अध्यक्षतेखाली तीर्थक्षेत्र विकास प्राधिकरणाची बैठक गुरुवारी झाली. जिल्हाधिकाऱ्यांनी देवदेवेश्वर संस्थान, वस्तू संग्रहालय, पांडवलेणी, सोनापीर दर्गा, मातृतीर्थ तलाव, यात्री निवास, दत्त शिखर संस्थान, अनसूया माता मंदिर, शेख फरीद धबधबा, रेणुकादेवी मंदिर आदी ठिकाणांची प्रत्यक्ष पाहणी केली. सर्वांगीण विकासाकरिता २९ कोटी रुपयांपैकी २४ कोटी रुपये विविध कामांवर खर्च झाल्याचे त्यांनी सांगितले. उर्वरित निधी पुढील दोन टप्प्यात प्राप्त होणार असल्याचे ते म्हणाले. बैठकीस जयवंतराव पाटील कामारीकर, प्रा.राजेंद्र केशवे, मुख्य कार्यकारी अधिकारी अभिमन्यू काळे, जिल्हा नियोजन अधिकारी राठोड, जिल्हा साथरोग वैद्यकीय अधिकारी डॉ.दुर्गादास रोडे, उपविभागीय अधिकारी रोडगे, कार्यकारी अभियंता धारासूरकर, चव्हाण, तहसीलदार डॉ.आशिष बिरादार, उपविभागीय पोलीस अधिकारी चव्हाण, मुख्याधिकारी डोईफोडे आदी उपस्थित होते.
प्रशासकीय समितीचे अध्यक्ष न्यायमूर्ती आनंद यावलकर, उपविभागीय पोलीस अधिकारी, तहसीलदार, डॉ.आशिषकुमार बिरादार, भवानीदास भोपी, विनायक फंदाडे, चंद्रकांत भोपी, सतीश भोपी, श्रीपाद भोपी, संजय कन्नव, आशिष जोशी यांच्यासह कार्यालय अधीक्षक पी.डी. चव्हाण यांनीही स्वच्छ पाणी, महाप्रसाद, सीसीटीव्ही कॅमेरे, सुरक्षा व्यवस्था, आरोग्य सुविधा यासाठी बैठक घेऊन रंगरंगोटीसह तयारी पूर्ण केली आहे. नऊ दिवस चालणाऱ्या धार्मिक कार्यक्रमाचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. १३ रोजी पुजारी भवानीदास रेणुकादास भोपी व शुभम संभाजी भोपी यांच्या हस्ते सकाळी १०.३० वाजता महापूजेस प्रारंभ होईल. मुख्य गाभाऱ्यातील घटस्थापना व परिवार देवता श्री तुळजाभवानी माता, श्री महालक्ष्मी माता, श्री भगवान परशुराम मंदिरातील घटस्थापना होईल. २२ आॅक्टोबर रोजी पुजारी विनायक नारायण फांदाडे व चंद्रकांत देवीदास रिठे यांच्या हस्ते सकाळी ध्वज पूजन, श्री रेणुका मातेची महापूजा व महाआरती होईल. दुपारी शस्त्रपूजन, भगवान परशुरामाची पालखी, सीमोल्लंघन, आरती, महाप्रसाद यासह श्री रेणुकादेवी नवरात्र महोत्सवाची समाप्ती होणार आहे. (वार्ताहर)

भाविकांमध्ये उत्सुकता
माहूरगडावरील रेणुकादेवीचे भक्त यवतमाळ जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात आहेत. दरवर्षी नवरात्रौत्सवात हजारो जिल्हावासी माहूरगडावर जात असतात. अनेक भाविक पदयात्राही काढत असतात. यंदा विविध सुविधांमध्ये वाढ झाल्याने नवरात्रोत्सवाबद्दल माहूरगडावर जाणाऱ्या भाविकांत उत्सुकता आहे.

Web Title: Navratri Navaratri Navaratri Preparation