आर्थिक, सामाजिक समतेशिवाय लोकशाहीला पूर्णत्व नाही; माजी सरन्यायाधीश भूषण गवई

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 4, 2026 11:22 IST2026-05-04T11:20:47+5:302026-05-04T11:22:53+5:30

यवतमाळ येथे श्रद्धेय जवाहरलालजी दर्डा यांच्या पुतळ्याचे अनावरण

Democracy is incomplete without economic and social equality; Former Chief Justice Bhushan Gavai | आर्थिक, सामाजिक समतेशिवाय लोकशाहीला पूर्णत्व नाही; माजी सरन्यायाधीश भूषण गवई

आर्थिक, सामाजिक समतेशिवाय लोकशाहीला पूर्णत्व नाही; माजी सरन्यायाधीश भूषण गवई

यवतमाळ : एक व्यक्ती, एक मत, एक मूल्य याद्वारे घटनाकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी देशात राजकीय लोकशाही निर्माण केली. त्यांना सामाजिक व आर्थिक न्यायही अपेक्षित होता. आज आर्थिक सत्ता मुठभरांच्या हाती एकवटली आहे, अशा स्थितीत लोकशाहीच्या पूर्णत्त्वासाठी आर्थिक व सामाजिक समतेसाठी प्रयत्नांची गरज असल्याचे प्रतिपादन भारताचे माजी सरन्यायाधीश भूषण गवई यांनी केले.

विद्या प्रसारक मंडळाद्वारे संचालित स्वातंत्र्य सेनानी जवाहरलाल दर्डा कॉलेज ऑफ लॉ येथे जवाहरलालजी दर्डा उपाख्य बाबूजी यांच्या पुतळ्याचे शनिवार भूषण गवई यांच्या हस्ते अनावरण झाले, याप्रसंगी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी विद्या प्रसारक मंडळाचे अध्यक्ष तथा लोकमत एडिटोरियल बोर्डचे चेअरमन डॉ. विजय दर्डा होेते.

वकिली हा व्यवसाय नाही तर समाजसेवा आहे. शेवटच्या माणसाला न्याय देण्याचे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे स्वप्न होते. ते पूर्णत्त्वास नेण्यासाठी वकिलांनी प्रयत्न करावेत, असे आवाहन न्यायमूर्ती अनिल किलोर यांनी केले.

पुतळ्याचे अनावरण हा तर सन्मानाचा क्षण

माझे वडील रा. सु. गवई उर्फ दादासाहेब आणि जवाहरलालजी दर्डा उपाख्य बाबूजी सहकारी, सन्मित्र होते. आज माझ्या हस्ते पुतळ्याचे अनावरण होत आहे. हा सन्मानाचा क्षण असल्याचे भूषण गवई म्हणाले.  डॉ. विजय दर्डा यांचेही त्यांनी विशेष कौतुक केले. वर्धा-यवतमाळ-नांदेड रेल्वे मार्गाचे सुरू असलेले काम ही त्यांच्या पाठपुराव्याचीच देण असून हा रेल्वे मार्ग विदर्भासह मागास मराठवाडा विभागाच्या विकासाला नवसंजीवनी देईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

अन् उभी राहिली वकिलांची नवी पिढी : डॉ. विजय दर्डा

यवतमाळसारख्या ग्रामीण भागात दूरदृष्टी ठेवून उभे राहिलेल्या स्वातंत्र्य सेनानी जवाहरलाल दर्डा कॉलेज ऑफ लॉ या महाविद्यालयामुळे या भागात उच्च शिक्षित वकिलांची नवी पिढी उभी राहिली, याचा सार्थ अभिमान असल्याचे संस्थेचे अध्यक्ष डॉ. विजय दर्डा यांनी सांगितले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दाखविलेल्या मार्गाने चालणारे व वंचित, उपेक्षितांसाठी काम करणारे भूषण गवई यांच्या हस्ते श्रद्धेय बाबूजींच्या पुतळ्याचे अनावरण झाले, याचा मन:स्वी आनंद असल्याचे सांगत गवई यांच्या काळात विविध न्यायालयात न्यायाधीशांची सर्वाधिक नियुक्ती झाली, ही बाब अभिमानास्पद असल्याचे ते म्हणाले.

लोकशाहीची जिवंत साक्ष म्हणजे हा मंच : मंत्री राठोड

पुतळा अनावरणाचा क्षण ऐतिहासिक आहे. लोकशाहीचे चारही स्तंभ आज एका मंचावर आले. ही केवळ उपस्थिती नाही तर लोकशाहीची जिवंत साक्ष असल्याचे प्रतिपादन मृद व जलसंधारण मंत्री संजय राठोड यांनी केले. बाबूजी यांचे जीवन म्हणजे केवळ इतिहास नसून तो देशभक्ती आणि प्रामाणिकतेचा मार्ग असल्याचे ते म्हणाले. बाबूजींचा पुतळा येणाऱ्या पिढीला दिशा देणारा, विचारांचा स्त्रोत ठरणार आहे. बाबूजींनी विदर्भाच्या विकासासाठी आयुष्य वेचले, त्यांच्यामुळेच या भागात शिक्षणासह औद्योगीकरणाला गती मिळाल्याचे सांगत बाबूजींचे कार्य प्रेरणादायी असल्याचे राठोड यांनी सांगितले.

दिवसाची सुरुवात ‘लोकमत’नेच व्हायची

जवाहरलालजी दर्डा उपाख्य बाबूजींनी यवतमाळमध्ये ‘लोकमत’ची मुहूर्तमेढ रोवली. आज ‘लाेकमत’ जनसामान्यांची चळवळ बनले आहे. बाबूजींनंतर तोच वारसा डॉ. विजय दर्डा, माजी शालेय शिक्षणमंत्री राजेंद्र दर्डा यांनी सक्षमतेने जोपासला. सरन्यायाधीश म्हणून दिल्लीत कार्यरत असताना माझ्या दिवसाची सुरुवात ‘लोकमत’ वाचूनच व्हायची, असेही त्यांनी सांगितले.

ज्येष्ठ वकिलांसह माजी विद्यार्थी न्यायाधीशांचा हृदयसन्मान

याप्रसंगी स्वातंत्र्य सेनानी जवाहरलाल दर्डा काॅलेज ऑफ लाॅचे विद्यार्थी असलेले नागपूरचे प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश दिनेश सुराणा, काेल्हापूरच्या प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश कविता अग्रवाल, चंद्रपूरच्या प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश समृध्दी भीष्म, भाेकर (जि. नांदेड) येथील जिल्हा व सत्र न्यायाधीश माेहमंद नासीर माेहमंद सलीम यांचा भूषण गवई यांच्या हस्ते गौरव करण्यात आला. विधी क्षेत्रात दीर्घकाळ सेवा देणारे ज्येष्ठ विधिज्ञ ॲड. ए. पी. दर्डा, ॲड. आर. के. मनक्षे, ॲड. प्रवीण जानी, ॲड. एस. सी. भालेराव, ॲड. पी. व्ही. गाडबैले, ॲड. पी. एस. साबळे, ॲड. जगदीश वाधवानी, ॲड. दीपक ठाकरे यांनाही गौरविण्यात आले.

Web Title : आर्थिक, सामाजिक समानता लोकतंत्र की पूर्णता के लिए आवश्यक: पूर्व मुख्य न्यायाधीश गवई

Web Summary : पूर्व मुख्य न्यायाधीश भूषण गवई ने सच्ची लोकतंत्र के लिए आर्थिक और सामाजिक समानता पर जोर दिया। उन्होंने जवाहरलाल दर्डा की प्रतिमा का अनावरण किया और उनके योगदान की सराहना की। डॉ. विजय दर्डा ने कहा कि यवतमाल के लॉ कॉलेज से वकीलों की एक नई पीढ़ी उभरी। मंत्री राठौड़ ने विदर्भ के विकास पर दर्डा के प्रभाव पर प्रकाश डाला।

Web Title : Economic, social equality essential for democracy's fulfillment: Former Chief Justice Gavai

Web Summary : Former Chief Justice Bhushan Gavai emphasized economic and social equality for true democracy. He unveiled a statue of Jawaharlal Darda, praising his contributions. A new generation of lawyers emerged from Yavatmal's law college, said Dr. Vijay Darda. Minister Rathod highlighted Darda's impact on Vidarbha's development.