Coal production jam for two months | दोन महिन्यांपासून कोळसा उत्पादन ठप्प
दोन महिन्यांपासून कोळसा उत्पादन ठप्प

ठळक मुद्देसततच्या पावसाचा परिणाम : रस्त्यांचा उडाला बोजवारा, खाणीत जाणारे रस्ते बंद

लोकमत न्यूज नेटवर्क
वणी : या भागात सतत पडणारा पाऊस आणि वेकोलि प्रशासनाच्या नियोजनशून्यतेमुळे गेल्या दोन महिन्यांपासून जवळपास तीन खाणीतील कोळसा उत्पादन ठप्प पडले आहे. खाणीकडे जाणाऱ्या रस्त्यांचा बोजवारा उडाला असला तरी वेकोलिकडून या रस्त्याच्या दुरूस्तीसाठी कोणतीही उपाययोजना केली जात नसल्याने खाणीत काम करण्यासाठी जाणारे कामगार वाहन चालक त्रस्त झाले आहेत.
वणी उत्तर क्षेत्रात उकणी, जुनाड, कोलारपिंपरी व घोन्सा या खुल्या कोळसा खाणी आहेत, तर भांदेवाडा येथे भूमिगत कोळसा खाण आहे. पिंपळगाव व कुंभारखणी या दोन खाणी यापूर्वीच बंद पडल्या आहेत. उकणी, जुनाड व कोलारपिपरी या तीन खाणीतून कोळसा उत्पादन सुरू होते. मात्र गेल्या दोन महिन्यांपासून या भागात पावसाची रिपरिप सुरू असल्याने कोळशाचे उत्पादन ठप्प झाले आहे. परिणामी यापूर्वी उत्पादीत झालेल्या कोळशाच्या भरवशावरच पुरवठा सुरू आहे. विशेष म्हणजे यांपैकी उकणी कोळसा खाणीतील कोळशाचे उत्पादन कधीच ठप्प झाले नव्हते. पावसाळा सुरू होण्यापूर्वीच रस्त्यांची दुरूस्ती केली जायची. त्यामुळे कोळसा खाणीत जाणारा मार्ग पावसाळ्यातही सुरूच रहायचा. मात्र यावेळी वेकोलि प्रशासनाने रस्ता दुरूस्तीचे नियोजनच न केल्याने या कोळसा खाणीतून होणारी वाहतूक प्रभावित झाली आहे.
उकणी कोळसा खाणीत नियमानुसार ४० फुटांचे रस्ते असायला हवे. मात्र ते नसल्याने केवळ २० फुटांच्या रस्त्यावरून कोळशाची वाहतूक सुरू आहे. विशेष म्हणून वणी उत्तर क्षेत्रातील ही सर्वांत मोठी कोळसा खाण आहे. कोळसा उत्खननासाठी वापरण्यात येणारे यंत्र लावण्यासाठी जागाच नसल्याने ही सर्व यंत्रे एकाच ठिकाणी उभी ठेऊन कोळसा उत्खननाचा प्रयत्न करून वेळ मारून नेण्यात येत आहे. उत्पादनावर परिणाम झाल्याने खाणीला लाखो रुपयांचा फटका बसत आहे. या कोळसा खाणीत यंत्रणा सुसज्ज असली तरी त्याचा योग्य वापर होत नसल्याने व त्यासाठी नियोजन केले जात नसल्याने उत्पादनावर परिणाम होत आहे.

जुनाडाचा रस्ता गेला वाहून
गेल्या दोन महिन्यांपासून सातत्याने पाऊस सुरू असून या पावसामुळे जुनाडा कोळसा खाणीत जाणारा रस्ताच वाहून गेला आहे. त्यामुळे ही खाण सध्यस्थितीत बंद आहे. येथील कर्मचाऱ्यांना अस्थायी स्वरूपात उकणी कोळसा खाणीत स्थानांतरीत करण्यात आले आहे. मात्र अद्यापही रस्ता दुरूस्ती सुरू झाली नाही.


Web Title: Coal production jam for two months
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.