लॉकडाऊन धुडकावत बिअरबार, ढाबे बहरलेलेच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 13, 2020 05:00 AM2020-07-13T05:00:00+5:302020-07-13T05:00:46+5:30

जिल्ह्यात लॉकडाऊन असल्याने व्यापारी-व्यावसायिकांना आपली दुकाने सकाळी ९ ते सायंकाळी ७ या वेळातच सुरू ठेवण्याची मुभा आहे. हॉटेल्स व खाद्य पदार्थाच्या दुकानांमध्ये बसून खाण्याची परवानगी नाही, तेथे केवळ पार्सल सुविधेला परवानगी देण्यात आली आहे. परंतु ही पार्सल सुविधाच या व्यावसायिकांसाठी मोठी पर्वणी ठरली आहे. कारण या सुविधेआड त्यांचा सर्व व्यवसाय पूर्वीप्रमाणे सुरू आहे.

Beer bars pounding the lockdown | लॉकडाऊन धुडकावत बिअरबार, ढाबे बहरलेलेच

लॉकडाऊन धुडकावत बिअरबार, ढाबे बहरलेलेच

Next
ठळक मुद्देपार्सल सुविधेचा आडोसा : वाहनांची गर्दी ठरतेय भक्कम पुरावा, कारवाई टाळण्यासाठी वेगळ्यामार्गाने एन्ट्री

लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : जिल्ह्यात ३१ जुलैपर्यंत लॉकडाऊन आहे. त्यानंतरही यवतमाळ शहरातून बाहेर जाणाऱ्या सर्व मार्गांवरील बहुतांश बीअरबार व ढाबे राजरोसपणे सुरू आहे. या ढाब्यांसमोरील व आजूबाजूला होणारी वाहनांची गर्दी हाच त्याचा भक्कम पुरावा ठरते आहे. विशेष असे समोर ‘केवळ पार्सल सुविधा उपलब्ध’ असे फलक लावलेले असते आणि त्याआड आतमध्ये पूर्वीप्रमाणेच ग्राहकांची मैफिल जमलेली असते. त्यातही दारव्हा रोडवरील यापूर्वी अवैध दारू विक्रीने प्रकाशझोतात आलेल्या काही बीअरबारमध्ये हा प्रकार अधिक प्रमाणात सुरू असल्याचे सांगितले जाते.
जिल्ह्यात लॉकडाऊन असल्याने व्यापारी-व्यावसायिकांना आपली दुकाने सकाळी ९ ते सायंकाळी ७ या वेळातच सुरू ठेवण्याची मुभा आहे. हॉटेल्स व खाद्य पदार्थाच्या दुकानांमध्ये बसून खाण्याची परवानगी नाही, तेथे केवळ पार्सल सुविधेला परवानगी देण्यात आली आहे. परंतु ही पार्सल सुविधाच या व्यावसायिकांसाठी मोठी पर्वणी ठरली आहे. कारण या सुविधेआड त्यांचा सर्व व्यवसाय पूर्वीप्रमाणे सुरू आहे. काही मिष्ठान्न विक्रेत्यांनी तर केवळ दाखविण्यासाठी समोर टेबलवर बेकरी प्रॉडक्ट ठेवले आहे. प्रत्यक्षात तेथून या बेकरी प्रॉडक्टची विक्रीही होत नाही. कारण यापूर्वी त्यांनी कधी बेकरी प्रॉडक्ट विकलेलेच नाही. मात्र बेकरी प्रॉडक्टच्या आड मिठाई, नमकीन व अन्य खाद्य पदार्थ सर्रास विकले जात आहे.
हॉटेल, ढाबे, बीअरबार यांना केवळ पार्सल सुविधेची परवानगी असली तरी त्याआड सर्रास टेबल लावून पार्ट्या केल्या जात आहेत. काहींनी त्यासाठी खास मागच्या बाजूनी एन्ट्रीही ठेवली आहे. पोलीस व प्रशासनावर कारवाईची वेळ येऊ नये, जनतेला गर्दी दिसू नये म्हणून काहींनी ग्राहकांची वाहने बीअरबारपासून अंतरावर ठेवण्याची शक्कल लढविली आहे.
सर्वच मार्गावर हा प्रकार सुरू असला तरी दारव्हा मार्गावर त्याचे प्रमाण अधिक आहे. शुक्रवारी या मार्गावरील एका बारमध्ये अशीच पार्टी रंगली होती. काही बाहेरच्यांनाही तेथे एन्ट्री दिली गेली. पार्टीतील व्यक्ती कोविडमध्ये राबणारे डॉक्टर व कर्मचारी असल्याचे सर्रास सांगितले गेले. एवढेच नव्हे तर ‘प्रशासन हम पर मेहेरबान है’ असेही ही मंडळी खासगीत सांगते. लॉकडाऊन काळात या मार्गावरील काही बीअरबारमधून दारूची अवैधरीत्या विक्री झाली होती. एक्साईजच्या तपासणीत ही बाब उघड झाली. मोठी कारवाई टाळण्यासाठी काही बारमालकांनी राजकीय मार्गाने ‘४०’ येरझारा मारल्याचे सांगितले जाते. त्यात कुणाच्या वाट्याला १५ तर कुणाच्या वाट्याला सात येरझारा आल्याचीही चर्चा आहे. त्याच येरझारांच्या बळावर दारव्हा मार्गावरील बारमालक ‘शासकीय यंत्रणा जणू आपल्या खिशात आहे’ अशा अविर्भावात वावरत असून बिनधास्त बीअरबारमध्ये ग्राहकी करीत आहे.
बीअरबारवरील गर्दी सामान्य नागरिकांना दिसते, बारमध्ये कोण लोक जातात, किती वेळ थांबतात, कुण्या मार्गाने जातात या सर्वबाबी नागरिकांना दिसतात. परंतु याबाबी कारवाईची जबाबदारी असलेल्या पोलीस, एक्साईज व महसूल यंत्रणेला दिसू नये याबाबत आश्चर्य व्यक्त केले जाते. या तीनही यंत्रणांच्या ‘मिलीभगत’मुळेच पार्सल सेवेच्याआड व बार व ढाब्यांवर मोठ्या प्रमाणात ग्राहकी सुरू आहे.

नियोजित वेळेनंतरही विक्री
रेकॉर्डवर बार व ढाब्यांमधून केवळ पार्सल सुविधा सुरू असल्याने अनेक ग्राहकांचा कल वाईनशॉपकडे वाढला आहे. त्यामुळे तेथून होणारी दारूची विक्री वाढली आहे. पर्यायाने बारमधील विक्रीत घट झाली आहे. म्हणून की काय काही बारमालकांनी निर्धारित वेळेनंतरही पार्सल सुविधेआड बारमधून अवैधरीत्या दारू विक्री सुरूच ठेवल्याचे सांगितले जाते. बीअरबारमधील ग्राहकांची गर्दी व अवैध दारू विक्री राज्य उत्पादन शुल्क, पोलीस व महसूल यंत्रणेसाठी खुले आव्हान ठरली आहे.

कोविड यंत्रणेच्या जेवणाचा आडोसा
यवतमाळ शहर व जिल्ह्यात बहुतांश बीअरबारमध्ये हाच फंडा वापरला जातो आहे. दिवसा व रात्रीसुद्धा आतील बाजूने हे बीअरबार ग्राहकांनी फुललेले असतात. कुणी विचारणा केल्यास थेट कोविड-१९ सेवेतील डॉक्टर व अन्य कर्मचाऱ्यांना जेवण्यासाठी सोय करून दिली व त्यासाठी थेट ‘साहेबांचा फोन आला होता’ असेही बिनदिक्कत सांगितले जाते.
 

Web Title: Beer bars pounding the lockdown

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.