"तो माझ्या छातीकडे टक लावून पाहायचा..."; नाशिक TCS प्रकरणात महिला टीम लीडरला आला विचित्र अनुभव
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 23, 2026 11:20 IST2026-04-23T11:20:01+5:302026-04-23T11:20:55+5:30
नाशिक टीसीएसमध्ये पीडितेला ज्या परिस्थितीचा सामना करावा लागला, ती अत्यंत दयनीय आणि घृणास्पद होती

"तो माझ्या छातीकडे टक लावून पाहायचा..."; नाशिक TCS प्रकरणात महिला टीम लीडरला आला विचित्र अनुभव
नाशिक - नाशिक TCS अत्याचार आणि धर्मांतर प्रकरणा आणखी एका पीडिताने समोर येऊन खळबळजनक आरोप केले आहेत. ११ वर्ष कंपनीत नोकरी करणाऱ्या या महिला कर्मचाऱ्याला ४ वर्षापर्यंत सातत्याने लैंगिक शोषण, आक्षेपार्ह कमेंट आणि खासगी आयुष्यावरील अश्लील चर्चेचा सामना करावा लागला. अनेक तक्रारीनंतरही आरोपींविरोधात कंपनीने काहीच कारवाई केली नाही असंही पीडितेने म्हटलं.
याआधी TCS प्रकरणात कसं टेलिकॉलर म्हणून काम करणाऱ्या महिलेला ७-८ जणांच्या गँगने टार्गेट केल्याचं समोर आले होते. या आरोपींनी पीडितांचा लैंगिक छळ केला. त्यांना बॅड टच करण्यात आले होते. त्यांच्या खासगी आयुष्यावर आणि धार्मिक प्रथा परंपरेवर आक्षेपार्ह टीप्पणी केल्या. आरोपींनी टीम लीडर म्हणून काम करणाऱ्या महिलांनाही टार्गेट केले. या घटनांबाबत पीडितांनी अनेकदा तक्रारी केल्या होत्या. नाशिक टीसीएसमध्ये पीडितेला ज्या परिस्थितीचा सामना करावा लागला, ती अत्यंत दयनीय आणि घृणास्पद होती. तक्रारी करूनही गुन्हेगारांवर कोणतीही कठोर कारवाई करण्यात आली नाही. या केंद्रात कपडे, शरीर, रूप आणि इतर गोष्टींवर टिप्पणी करणे ही एक सामान्य बाब होती असं तक्रारीत म्हटलं आहे.
पीडितेने काय म्हटलं?
मी मागील ११ वर्षापासून TCS मध्ये काम करत आहे. त्यात ७ वर्षापासून TCS च्या नाशिक ब्रांचमध्ये टीम लीडर आहे. माझ्या लीडरशिपमध्ये ६ जण होते, जे सगळे ऑपरेशन्स हेड अश्विनी चैनानी आणि अन्य अधिकाऱ्यांच्या अंडर काम करतात. माझ्या देखरेखीत २७ असोसिएट काम करत आहेत, ज्यात महिला, पुरुष दोघांचा समावेश आहे. मी ज्या डिपार्टमेंटमध्ये काम करत होती. तिथे आम्ही बँकेचे क्रेडिट कार्ड होल्डर्सला कॉल करायचो. मी मिळून ऑफिसमध्ये ५ अन्य टीम लीडर होते. आमचं काम २ शिफ्टमध्ये असायचे. दानिश शेख, तौसिफ शेख, रजा मेमन, शफी शेख, शाहरूख कुरैशी, आसिफ अंसारी आणि आणखी एक जण आमच्या ऑफिसमध्ये काम करत होते. या लोकांनी एक गट बनवला होता. जाणुनबुजून दुसऱ्या धर्मातील लोकांना त्रास दिला जायचा. अश्लील कमेंट करायचे. महिलांना डोक्यापासून पायापर्यंत विचित्र नजरेने पाहायचे असा आरोप तिने केला.
तसेच २०२२ साली मी एका मिटिंगमध्ये बसली होती. तेव्हा शफी शेख माझ्यासमोर ३ फुटांवर उभा होता. अचानक माझ्या लक्षात आले तो माझ्या छातीकडे टक लावून पाहत हसत होता. मला खूप असहाय्य वाटले. मी लगेच तिथून निघून गेले. हा प्रकार मी अन्य टीम लीडरला सांगितला. ते मला सीनियर मॅनेजरकडे घेऊन गेले. या घटनेची मी तक्रार केली परंतु कारवाईच्या नावाखाली शफी शेखचे केवळ डिपार्टमेंट बदलण्यात आले. तरीही शफी शेखची वागणूक बदलली नाही. तो माझ्या आसपास वावरायचा. माझ्याशी बोलायचा प्रयत्न करायचा. मी त्याच्याकडे दुर्लक्ष करत होते. परंतु तरीही तो सुधारला नाही. माझ्याशिवाय अन्य महिलांनीही त्याच्याविरोधात तक्रार केली होती मात्र कंपनीने ठोस पाऊल उचलले नाही असं पीडितेने म्हटलं.
पोरगं होत नाही, एक नंबर देतो, अजमेरला जा...
फेब्रुवारी २०२६ ची घटना मी कधीही विसरू शकत नाही. त्यावेळी मी खूप त्रस्त होती. माझे मिसकॅरेज झालं होते. त्याचवेळी लंच ब्रेकमध्ये तौसिफ अत्तार माझ्याकडे आला. त्याने माझ्या तब्येतीबाबत विचारले. जेव्हा मी माझी अवस्था सांगितली. तेव्हा त्याने माझ्याकडे विचित्र नजरेने पाहिले. त्यानंतर मला एका मौलवीचा नंबर दिला. जर तू तिथे गेली तर तुला नक्कीच बाळ होईल असं सांगितले. २०२२ ते २०२६ या काळात अनेक घटना घडल्या. बैठकीत, ऑफिसमध्ये, प्रत्येक ठिकाणी मला विचित्र नजरेने पाहण्यात येत होते. माझ्या कपड्यांकडे, शरीराकडे, खासगी आयुष्याबाबत कमेंट केल्या गेल्या. मी शफी शेख, तौसिफ यांच्या तक्रारीही केल्या. पीडितेच्या या तक्रारीवर पोलिसांनी गुन्हा नोंद केला असून सध्या तपास सुरू आहे.