मेहता विरोधातील मोहिमेचे प्रमुख अॅड. रवी व्यास यांनी घेतली माजी आमदार गिल्बर्ट मेंडोन्सा यांची भेट 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 28, 2020 09:49 PM2020-11-28T21:49:15+5:302020-11-28T21:50:00+5:30

Adv. Ravi Vyas : मीरा भाईंदर भाजपामध्ये नगरसेवकांसह पदाधिकाऱ्यांचा मोठा गट माजी आमदार नरेंद्र मेहतांच्या एकूणच कार्यपद्धती व त्यांच्या वादग्रस्त प्रतिमेविरुद्ध एकत्र आला आहे.

The head of the campaign against Mehta, Adv. Ravi Vyas called on former MLA Gilbert Mendonsa | मेहता विरोधातील मोहिमेचे प्रमुख अॅड. रवी व्यास यांनी घेतली माजी आमदार गिल्बर्ट मेंडोन्सा यांची भेट 

मेहता विरोधातील मोहिमेचे प्रमुख अॅड. रवी व्यास यांनी घेतली माजी आमदार गिल्बर्ट मेंडोन्सा यांची भेट 

googlenewsNext

मीरारोड - माजी आमदार नरेंद्र मेहता हटाव आणि भाजपा व शहर बचाव अशी मोहीम छेडणाऱ्या भाजपातील प्रमुख नगरसेवक - पदाधिकाऱ्यांपैकी एक असलेले नगरसेवक अॅड. रवी व्यास यांनी आज शनिवारी शिवसेनेत असलेले माजी आमदार गिल्बर्ट मेंडोन्सा यांची भेट घेतल्याने शहरातील  राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे . 

मीरा भाईंदर भाजपामध्ये नगरसेवकांसह पदाधिकाऱ्यांचा मोठा गट माजी आमदार नरेंद्र मेहतांच्या एकूणच कार्यपद्धती व त्यांच्या वादग्रस्त प्रतिमेविरुद्ध एकत्र आला आहे. पालिकेतील अर्थपूर्ण हस्तक्षेप आणि मेहतांच्या चेहऱ्यावर पुढील पालिका निवडणूक भाजपाला जिंकता येणार नाही अशी भूमिका त्यांच्या विरोधी गटाने घेतली आहे . मेहता हटाव व भाजपा आणि शहर बचाव अश्या प्रकारची मोहीम छेडली असून दुसरीकडे मेहता यांनी देखील पालिका आणि पक्षावर आपली पकड कायम ठेवण्यासाठी हालचाली चालवल्या आहेत. 

मेहतांना थेट माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व आमदार रवींद्र चव्हाण यांचा वरदहस्त असल्याचे मानले जात असून त्यामुळेच विधानसभा निवडणुकीत झालेला दारुण पराभव, बलात्कार सह अनेक गुन्हे व तक्रारी असून देखील त्यांना संरक्षण दिले जात असल्याची चर्चा आहे . दुसरीकडे मेहता विरोधकांनी देखील जोरदार आघाडी उघडत प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आणि पक्षाचे सरचिटणीस श्रीकांत भारती यांच्या कडे तक्रार करत मेहतांच्या कहाण्यांचा पाढाच मांडला होता. 

दोन दिवसांपूर्वी भाजपाचे मीरा भाईंदर प्रभारी आमदार मिहीर कोटेचा यांनी भाजपाच्या नगरसेवकांची आणि जिल्हाध्यक्ष हेमंत म्हात्रे यांची भेट घेतली होती . कोटेचा यांना शहराचे प्रभारी नेमलेले असताना चव्हाण यांचा मेहतांसाठीचा हस्तक्षेप देखील चर्चेचा विषय ठरला आहे. त्यातच शनिवारी भाजपाचे नगरसेवक अॅड. रवी व्यास यांनी समर्थकांसह माजी आमदार गिल्बर्ट मेंडोन्सा यांची त्यांच्या कार्यालयात जाऊन भेट घेतली. 

वास्तविक पूर्वी व्यास हे मेंडोन्सा यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस मधून निवडून आले होते . परंतु नगरसेवक पदाचा राजीनामा देऊन ते भाजपात आले आणि पोटनिवडणुकीत ते पुन्हा निवडून आले . तर  गिल्बर्ट मेंडोन्सा यांच्या मुळे २००७ साली अपक्ष नगरसेवक असलेले नरेंद्र मेहता हे महापौर झाले होते . 

व्यास यांचे समर्थक व समर्थनार्थ असलेले नगरसेवक यांची संख्या पाहता त्यांना दुर्लक्षित करून चालणार नाही असे चित्र सध्या तरी आहे . त्यांनी मेहतांच्या विरोधात आघाडी उघडली असतानाच आज अचानक माजी आमदार मेंडोन्सा यांची भेट घेतल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडवून दिली आहे. मेंडोन्सा हे शहराचे अनेक वर्ष नेतृत्व करत होते. शहरात एक व्यक्ती म्हणून मेंडोन्सा यांना मानणारा मोठा वर्ग आजही आहे . मेंडोन्सा हे सध्या शिवसेनेत आहेत . 

पालिकेत मेहतांचा हस्तक्षेप रोखण्यासाठी अनेक नगरसेवकांनी तक्रारी करून देखील भाजपाकडून ठोस भूमिका घेतली जात नसल्याने अंतर्गत वाद चिघळण्याची शक्यता आहे . त्यातच व्यास यांनी मेंडोन्सा यांची भेट घेतली . व्यास यांनी स्वतः मात्र हि कोणती राजकीय भेट नव्हती असे स्पष्ट करत मेंडोन्सा यांची सदिच्छा भेट होती असे सांगितले . मेंडोन्सा यांच्या प्रकृतीची विचारपूस केली आणि काही जुन्या आठवणींत गप्पा रंगल्याचे ते म्हणाले . गिल्बर्ट मेंडोन्सा यांच्याशी संपर्क केला असता , त्यांनी आपण नंतर बोलू असे सांगितले .
 

Web Title: The head of the campaign against Mehta, Adv. Ravi Vyas called on former MLA Gilbert Mendonsa

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.