एक्झिबिशन सेंटरसाठी ठेकेदारच मिळेना!

By Admin | Updated: December 18, 2014 23:41 IST2014-12-18T23:40:54+5:302014-12-18T23:41:17+5:30

शहराच्या लौकिकात भर घालणाऱ्या वाशी येथील एक्झिबिशन सेंटरच्या देखभालीसाठी एकही ठेकेदार पुढे येत नसल्याने ही जबाबदारी सध्या सिडकोलाच पार पाडावी लागत आहे

For the exhibition center, no contractor! | एक्झिबिशन सेंटरसाठी ठेकेदारच मिळेना!

एक्झिबिशन सेंटरसाठी ठेकेदारच मिळेना!

नवी मुंबई : शहराच्या लौकिकात भर घालणाऱ्या वाशी येथील एक्झिबिशन सेंटरच्या देखभालीसाठी एकही ठेकेदार पुढे येत नसल्याने ही जबाबदारी सध्या सिडकोलाच पार पाडावी लागत आहे. सिडकोकडून या सेंटरची म्हणावी तशी देखरेख होत नाही. त्यामुळे अत्याधुनिक दर्जाच्या या वास्तूला घरघर लागण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
सिडकोच्या वतीने वाशी रेल्वे स्थानकाजवळ ७.४ हेक्टर जागेवर हे अत्याधुनिक एक्झिबिशन सेंटर उभारण्यात आले आहे. ग्रीन बिल्डिंग म्हणून ही वास्तू ओळखली जाते. यात दोन मोठी प्रदर्शन केंद्रे, मीटिंग रूम, कॅफे, फूड कोर्ट आदी अत्याधुनिक सुविधा आहेत. शिवाय एकाच वेळी ४५० वाहने पार्क करता येतील इतके मोठे वाहनतळ आहे. या एक्झिबिशन सेंटरच्या देखभालीसाठी ठेकेदाराची नियुक्ती करण्याचा निर्णय सिडकोने घेतला आहे. त्यासाठी रीतसर निविदा मागविण्यात आल्या होत्या. मात्र त्याला अपेक्षित प्रतिसाद न मिळाल्याने आता पुन्हा दुसऱ्यांदा सुधारित निविदा काढण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या निविदा प्रक्रियेची कार्यवाही सुरू करण्यात आली आहे. ठेकेदार संस्थेची निवड होईपर्यंत या वास्तूची देखभाल सिडकोच्या माध्यमातूनच केली जाईल, असे मुख्य जनसंपर्क अधिकारी मोहन निनावे यांनी स्पष्ट केले आहे.
सिडकोचा एक महत्त्वाकांक्षी प्रकल्प म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या वास्तूचे जुलैमध्ये तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले होते. मात्र उद्घाटनानंतर गेल्या साडेचार महिन्यांत या वास्तूत केवळ दोनच कार्यक्रम पार पडले आहेत. आयोजकांना आकर्षित करण्यात सिडकोला अपयश येत असल्याने, शहरातील आंतरराष्ट्रीय दर्जाची ही वास्तू वापराविना पडून असल्याचे बोलले जात आहे. (प्रतिनिधी)

Web Title: For the exhibition center, no contractor!