खाकी राबवितेय ‘ऑपरेशन कोरोना’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 4, 2020 05:00 AM2020-06-04T05:00:00+5:302020-06-04T05:00:11+5:30

राज्य सरकारकडून जाहीर करण्यात आलेल्या लॉक डाऊन नंतर केंद्र सरकारने २१ दिवसांकरिता संपूर्ण देश लॉक डाऊनची घोषणा केली. लॉक डाऊनच्या कालावधीत कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी तसेच गर्दी टाळण्यासाठी कुठलेही धार्मिक, सांस्कृतीक व सामुहिक कार्यक्रमावर बंदी घालण्यात आली आहे. परंतु, नियमांना बगल देत दिल्लीत एक धार्मिक कार्यक्रम पार पडला.

Khaki implements 'Operation Corona' | खाकी राबवितेय ‘ऑपरेशन कोरोना’

खाकी राबवितेय ‘ऑपरेशन कोरोना’

Next
ठळक मुद्देविविध धार्मिक स्थळांची तपासणी : दडून बसलेल्यांची घेतली जातेय माहिती

लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोरोनाबाबतचा संभाव्य धोका लक्षात घेऊन २१ दिवसांच्या लॉकडाऊनची घोषणा केली आहे. या घोषणेनंतर दिल्ली निजामुद्दीन मरकज येथील तब्लिगी ए-जमातच्या कार्यक्रमातून कोरोनाचा झपाट्याने प्रसार झाल्याचे पुढे आले आहे. त्यानंतर वर्धा जिल्ह्यातील पोलिसांनीही दक्षता म्हणून वर्धा जिल्ह्यातील प्रत्येक धार्मिक स्थळांची तपासणी करण्यास सुरूवात केली आहे. पोलिसांनी या विशेष मोहिमेला ‘ऑपरेशन कोरोना’ असे नाव दिले असून धार्मिक स्थळांमध्ये कुणी दडून तर बसलेले नाही ना याची शहानिशा केली जात आहे.
राज्य सरकारकडून जाहीर करण्यात आलेल्या लॉक डाऊन नंतर केंद्र सरकारने २१ दिवसांकरिता संपूर्ण देश लॉक डाऊनची घोषणा केली. लॉक डाऊनच्या कालावधीत कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी तसेच गर्दी टाळण्यासाठी कुठलेही धार्मिक, सांस्कृतीक व सामुहिक कार्यक्रमावर बंदी घालण्यात आली आहे. परंतु, नियमांना बगल देत दिल्लीत एक धार्मिक कार्यक्रम पार पडला. त्यानंतर या धार्मिक कार्यक्रमात सहभागी झालेले व्यक्ती देशातील विविध भागात नियोजित ठिकाणी पोहोचले. सध्या संपूर्ण शासन व प्रशासनाची झोप उडाली आहे. वर्धा जिल्ह्यात अद्याप एकही कोरोनाचा रुग्ण आढळलेला नसला तरी दक्षता म्हणून पोलिसांकडून जिल्ह्यातील प्रत्येक धार्मिक स्थळांची तपासणी केली जात आहे. पोलिसांनी आतापर्यंत सुमारे १२ धार्मिक स्थळांची पाहणी केली आहे. परंतु, कुणी तेथे चोरपावलांने आश्रय घेतल्याचे निदर्शनास आलेले नाही. कुठल्याही धार्मिक स्थळात कुणी चोरपावलांनी राहत असल्यास त्याची माहिती नजीकच्या पोलीस ठाण्यात द्यावी, माहिती देणाऱ्याचे नाव गोपनीय ठेवण्यात येईल, असे आवाहन पोलिसांच्यावतीने करण्यात आले आहे.

२२ पैकी एकही व्यक्ती ‘त्या’ मेळाव्यात सहभागी झाला नाही
निजामुद्दीनच्या तब्लिकी ए-जमातीच्या मेळाव्यात वर्धा जिल्ह्यातील एकूण २२ व्यक्ती सहभागी झाल्याची प्राथमिक माहिती वर्धा जिल्हा प्रशासनाला प्राप्त झाली होती. मात्र, सदर माहिती मिळाल्यानंतर अधिकची चौकशी केल्यावर ही २२ व्यक्ती मरकजच्या मेळाव्यात सहभागी झालेच नसल्याचे जिल्हा प्रशासनाच्या निदर्शनास आले आहे. २२ पैकी सात व्यक्ती वर्धा जिल्ह्यात १६ ते १९ मार्च दरम्यान परतल्या. यात आर्वी तालुक्यात एक, हिंगणघाट दोन, देवळी एक, कारंजा एक आणि वर्धा तालुक्यातील दोन व्यक्तींचा समावेश आहे. सध्या सदर व्यक्तींमध्ये कोरोनाची कुठलीही लक्षणे आढळलेली नाही. त्याबाबतची माहीतीही जिल्हाधिकारी विवेक भिमनवार यांनी यापूर्वी जाहीर केली आहे, हे विशेष.

मंदिर, मशीद, गुरूद्वारा, चर्च आदी धार्मिक स्थळांमध्ये चोरपावलांनी कुणी आश्रय घेतला आहे काय याची शहानिशा करण्यासाठी वर्धा जिल्ह्यात ‘ऑपरेशन कोरोना’ राबविल्या जात आहे. आतापर्यंत सुमारे १२ धार्मिक स्थळ तपासण्यात आली आहेत. कुठल्याही धार्मिक स्थळांमध्ये चोरीलनीने कुणी राहत असल्यास त्याची माहिती नागरिकांनी पोलिसांना द्यावी. माहिती देणाऱ्याचे नाव गोपनीय ठेवले जाईल. कोरोनाशी लढा देण्यासाठी नागरिकांचेही सहकार्य गरजेचे आहे.
- नीलेश मोरे, अपर पोलीस अधीक्षक, वर्धा.

Web Title: Khaki implements 'Operation Corona'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.