वर्ध्यात बहरली विदेशी ‘ड्रॅगन फ्रुट’ची शेती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 2, 2020 05:00 AM2020-08-02T05:00:00+5:302020-08-02T05:00:43+5:30

शुभम राजेश्वर दांडेकर, रा. सेलू असे या युवा शेतकऱ्याचे नाव आहे. त्याच्याकडे पवनार शिवारात दोन एकर शेती आहे. येथे त्याने गेल्यावर्षी ऑगस्ट महिन्यात ‘ड्रॅगन फ्रुट’ या विदेशी फळझाडांची लागवड केली. एका एजंन्सीच्या माध्यमातून मध्यअमेरिका व वियतनाम या देशातून त्याने २ हजार ८०० रोपटे मागविली. अडीच लाख रुपये खर्चून आणलेल्या या रोपट्यांनी दीड एकरामध्ये १२ बाय ७ अशा अंतरावर लागवड केली.

Exotic ‘Dragon Fruit’ farming flourishes in Wardha | वर्ध्यात बहरली विदेशी ‘ड्रॅगन फ्रुट’ची शेती

वर्ध्यात बहरली विदेशी ‘ड्रॅगन फ्रुट’ची शेती

Next
ठळक मुद्देयुवा शेतकऱ्याची जिद्द फळाला; कमी पाण्यात येणारे औषधी गुणधर्म असलेले फळ

आनंद इंगोले।
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : पारंपरिक शेतीतून मिळणारे उत्पन्न आणि लागणारा खर्च याचा वर्षाअंती हिशोब काढला तर शेतकऱ्याच्या हातात काहीच शिल्लक राहत नाही. त्यामुळे शेतकऱ्यांपुढे कर्जाचा डोंगर उभा होऊन त्यातून सावरताना नाकीनऊ येतात. ही परिस्थिती टाळण्यासाठी सेलूतील युवकाने पारंपारिक शेतीला फाटा देत सेंद्रीय पद्धतीने चक्क विदेशी ‘ड्रॅगन फ्रुट’ ची लागवड केली. प्रारंभी त्याला काहींनी वेड्यात काढले पण; वर्षभरानंतरच उत्पादन सुरु झाल्याने या युवकाच्या जिद्दीपुढे टिकाकारांना तोंडावर हात ठेवण्याची वेळ आली.
शुभम राजेश्वर दांडेकर, रा. सेलू असे या युवा शेतकऱ्याचे नाव आहे. त्याच्याकडे पवनार शिवारात दोन एकर शेती आहे. येथे त्याने गेल्यावर्षी ऑगस्ट महिन्यात ‘ड्रॅगन फ्रुट’ या विदेशी फळझाडांची लागवड केली. एका एजंन्सीच्या माध्यमातून मध्यअमेरिका व वियतनाम या देशातून त्याने २ हजार ८०० रोपटे मागविली. अडीच लाख रुपये खर्चून आणलेल्या या रोपट्यांनी दीड एकरामध्ये १२ बाय ७ अशा अंतरावर लागवड केली. या झाडांच्या वाढीकरिता स्तंभाची (पोल) उभारणी करण्यात आली. एका पोलजवळ चार झाडांची व्यवस्था करुन त्याचे वर्षभर सेंद्रीय पद्धतीने नियोजन केल्याने वर्षभरात फळधारणा होऊन उत्पन्नही सुरु झाले. सध्या कोरोनाकाळात फळाला मोठी मागणी असून नागपूर व वर्धा येथील बाजारपेठेत शेतातूनच विक्री होत आहे.

फळाचे गुणधर्म तरी काय?
हे ‘ड्रॅगन फ्रुट’ निवडूंग वेल आहे. त्यामुळे कोणत्याही जनावरापासून या पिकाला धोका नाही. याचे उगमस्थान मध्यअमेरीका असून आता उष्ण प्रदेशातही उत्पादन घेतले जाते. झाडीची वेल छत्रीसारखी वाढत असल्याने त्याला द्राक्षासारखा आधार द्यावा लागतो. त्यामुळे शेतामध्ये स्तंभ (पोल) उभारावे लागतात. झाडाचे आयुर्मान २८ ते ३० वर्ष असल्याने दीर्घकालीन उत्पादन मिळते. जुलै ते डिसेंबर या कालावधीत एका झाडाला ५० ते १०० फळ लागतात. यात प्रथिने, स्निग्धपदार्थ, कॅल्शियम, फॉस्फरस, जीवनसत्व बी व क असे अन्नघटक असल्याने मधुमेह, कोलेस्टेरॉल, संधिवात, दमा, कर्करोग, डेंग्यू आदी आजारावर गुणकारी आहेत.

उन्हाळ्यात चिंता नाही
उन्हाळ्यात जलपातळी खोल जात असल्याने सिंचनाचे वांधे होते पण, या पिकांला पाण्याची फारशी गरज नसल्याने उन्हाळ्यात तीन महिने पाण्याशिवाय हे पीक जगू शकतात. उन्हाची तिव्रता वाढल्यास या झाडांवर जाळी टाकवी लागते. या दीड एकरातून पहिल्यावर्षी अडीच लाख, दुसऱ्या वर्षी साडेसहा लाख तर तिसऱ्यावर्षीपासून जवळपास दहा लाखांचे उत्पन्न सहज मिळू शकते, असा विश्वास शुभमने व्यक्त केला आहे.

बेरोजगारीचा प्रश्न दिवसेंदिवस बिकट होणार असून शेतीच आपल्यासाठी कायमस्वरुपी पर्याय ठरणार आहे. त्यामुळे पारंपरिक शेतीला फाटा देत विदेशी ‘ड्रॅगन फ्रुट’ ची लागवड केली आहे. एक वेळा खर्च आणि कमी जागेत जास्त उत्पन्न देणारे हे पीक आहे. काही चुकांमुळे आतापर्यंत १७ लाखांचा खर्च आला पण, वास्तविकत: त्यापेक्षा निम्मे खर्चातच शेती उभी राहू शकते. आजारावर गुणकारी असल्याने आजारी व्यक्तीला ५० रुपयांत तर इतरांना १०० रुपयामध्ये फळविक्री सुरु आहे.
- शुभम दांडेकर, युवा शेतकरी.

Web Title: Exotic ‘Dragon Fruit’ farming flourishes in Wardha

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.