पुन्हा चालणार वृक्षांवर कुऱ्हाड?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 18, 2019 06:00 AM2019-11-18T06:00:00+5:302019-11-18T06:00:18+5:30

महामार्गावरील वाहतुकीकरिता शहराच्या बाहेरून जाणारे रस्ते आधीच तयार आहेत. त्यामुळे वर्धा शहरात येण्याकरिता चौपदरी रस्ता नको आहे आणि दाटलेली हिरवळ ओरबाडणारा विकासही नको, अशी वर्धेकरांची भावना आहे. शहरातील बॅचलर रोड ते आर्वी नाका चौकाचे रुंदीकरण, मजबुतीकरण करण्यात आले. यावेळीही दुतर्फा असलेल्या विविध प्रजातीच्या शेकडोवर झाडांची कत्तल करण्यात आली.

The ax running on the tree again? | पुन्हा चालणार वृक्षांवर कुऱ्हाड?

पुन्हा चालणार वृक्षांवर कुऱ्हाड?

googlenewsNext
ठळक मुद्देगोपुरी चौक-दत्तपूर टी पॉर्इंट मार्ग : नव्याने केल्यात खाचा, प्रशासनाकडून कत्तलीची पूर्वतयारी

लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : एकीकडे वृक्षलागवडीचा गाजावाजा आणि दुसरीकडे डेरेदार वृक्षांची तोड, असा उफराटा प्रकार सुरू झाला आहे. गोपुरी चौक ते दत्तपूर टी-पॉइंट या मार्गाच्या दुतर्फा असलेल्या वृक्षांवर नव्याने क्रमांक टाकण्यात आले असून वृक्षकटाईच्या खाचाही नव्याने दिसून येत असल्याने पुन्हा वृक्षांवर कुऱ्हाड चालणार असल्याचे संकेत मिळत आहे. या महामार्गावरील डेरेदार वृक्ष तोडण्यात येणार नसल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात येत असताना ही कशाची पूर्वतयारी? असा संतप्त सवाल पर्यावरणप्रेमींकडून केला जात आहे.
महामार्गावरील वाहतुकीकरिता शहराच्या बाहेरून जाणारे रस्ते आधीच तयार आहेत. त्यामुळे वर्धा शहरात येण्याकरिता चौपदरी रस्ता नको आहे आणि दाटलेली हिरवळ ओरबाडणारा विकासही नको, अशी वर्धेकरांची भावना आहे. शहरातील बॅचलर रोड ते आर्वी नाका चौकाचे रुंदीकरण, मजबुतीकरण करण्यात आले. यावेळीही दुतर्फा असलेल्या विविध प्रजातीच्या शेकडोवर झाडांची कत्तल करण्यात आली.
यावेळी वृक्षतोडीला विरोध झाला असता नव्याने वृक्षारोपण करण्यात येईल, असे सार्वजनिक बांधकाम विभाग संबंधित कंत्राटदाराकडून सांगण्यात आले होते. रस्त्याचे बांधकाम पूर्णत्वास गेले. याला एक-दीड वर्षाचा काळ लोटला. मात्र, वृक्षलागवडीचा थांगपत्ता नाही. वृक्ष नसल्याने या मार्गावरील हिरवेपण हरविले आहे. यापूर्वी महामार्गाच्या रुंदीकरण, मजबुतीकरणाकरिता नागपूर मार्गावरील पवनारपासून पुढे बुटीबोरीपर्यंत हजारावर वृक्षांची तोड करण्यात आली. आता गोपुरी चौक ते दत्तपूर टी-पॉइंट दरम्यानच्या डेरेदार वृक्षांच्या कत्तलीचा घाट संबंधित विभागाकडून घातला जात आहे. पूर्वतयारी म्हणून वृक्षांवर खाचाही करण्यात आल्याने पर्यावरणप्रेमींमध्ये असंतोष खदखदत आहे. विकासकामांत शहरातील अनेक मार्गावरील वृक्षांचा बळी घेण्यात आल्याने शहराचे ‘आरे’ होते की काय, अशी चिंता व्यक्त केली जात आहे.

...तर चिपको आंदोलनासाठी सज्ज व्हावे
मार्गाच्या दुतर्फा असलेले डेरेदार वृक्ष न तोडता हा रस्त्याचे नवनिर्माण होत असेल तर कुणाची काहीच हरकत नाही. मात्र, मोठमोठ्या वृक्षांची कत्तल होणार असेल तर पर्यावरण रक्षणासाठी सदैव सज्ज असणाऱ्या वर्धेकरांनी आता चिपको आंदोलनासाठीही सज्ज झाले पाहिजे, असे आवाहन मानद वन्यजीव रक्षक संजय इंगळे तिगावकर यांनी केले आहे.

वृक्षतोडीने ओसाड झालेत हे मार्ग
विकासकामांत वर्धा ते हिंगणघाट, वर्धा ते यवतमाळ, वर्धा ते नागपूर तसेच वर्धा ते राळेगाव, वर्धा ते आर्वी या मार्गांवरील डेरेदार वृक्षांची तोड करण्यात आल्याने ओसाड झाले आहेत. उन्हाळ्यात सावलीचा आधार घेण्यास वृक्ष शोधूनही सापडत नाहीत. जीवघेण्या विकासात पाच ते सात हजारांवर वृक्षांची तोड झाल्याचा अंदाज पर्यावरणप्रेमींनी वर्तविला आहे.

योजनेतील किती रोपे जगली?
दरवर्षी नवनव्या योजनांच्या नावाखाली शासनाकून जिल्ह्याला वृक्षलागवडीचे उद्दिष्ट दिले जाते. यापूर्वी हरितम, शतकोटी तर गतवर्षी ३३ कोटी वृक्षलागवड योजना राबविण्यात आली. जिल्ह्याला वृक्षलागवडीचे मोठे उद्दिष्ट होते. काही विभागाने वृक्षलागवड केली; ती जगलीत की जळाली, हा संशोधनाचा विषय असून काही विभागांनी वृक्षलागवड न करता योजनेला हरताळ फासल्याची वस्तुस्थिती आहे. यंत्रणेने आॅडिट करून संबंधितांवर कारवाई करण्याची मागणी होत आहे.

विविध संघटना आंदोलनाच्या पवित्र्यात
गत पाच वर्षांच्या काळात नियोजनाच्या अभावात सुरू असलेल्या विकासकामांच्या नावाखाली मोठ्या प्रमाणावर वृक्षतोड करण्यात आली. यामुळे शहरातून विविध गावांना जोडणारे मार्ग ओस पडले आहेत. यामुळे पर्यावरणाचा समतोल पूर्णत: ढासळला असल्याचा अहवाल आहे. विकासकामांकरिता नागपूर मार्गालगतची झाडे तोडण्याची तयारी सुरू असल्याने पर्यावरणप्रेमी संघटना आंदोलनाच्या पवित्र्यात आहेत. सोमवारी, १८ नोव्हेंबरला जिल्हा प्रशासनाला निवेदन सादर करणार आहेत.

अधिकाऱ्यांनी केले खिसे ‘गरम’
वर्धा शहरातून चौफेर जाणाऱ्या मार्गालगतच्या डेरेदार वृक्षांची कत्तल करण्यात आली. या कामात सार्वजनिक बांधकाम विभाग, वनविभागाचे अधिकारी आणि संबंधित कंत्राटदाराने कोट्यवधींची माया जमविली. वनविभागाने नाहरकत देण्याकरिता मोठी आर्थिक देवाण-घेवाण केल्याचा आरोपही पर्यावरणप्रेमींनी केला आहे.

Web Title: The ax running on the tree again?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.