बेड वाढविण्यासाठी प्रशासनाची तारेवरची कसरत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 14, 2021 05:00 AM2021-04-14T05:00:00+5:302021-04-14T05:00:10+5:30

सेवाग्राम येथील कस्तुरबा रुग्णालय तसेच सावंगी (मेघे) येथील आचार्य विनोबा भावे ग्रामीण रुग्णालय गंभीर कोविड बाधितांसह इतर आजारांच्या रुग्णांवर उपचार सुरू आहेत.  या दोन्ही रुग्णालयांनी इतर आजारांच्या रुग्णांना चांगली रुग्ण सेवा देण्यासह कोविड युनिटमधील आयसीयू तसेच ऑक्सिजन आणि साधारण बेडची संख्या कशी वाढविता येईल यासाठी प्रयत्न करावे.

Administration's stellar exercise to increase beds | बेड वाढविण्यासाठी प्रशासनाची तारेवरची कसरत

बेड वाढविण्यासाठी प्रशासनाची तारेवरची कसरत

Next
ठळक मुद्देसेवाग्रामच्या कस्तुरबा हॉस्पिटलसह सावंगी (मेघे)च्या आचार्य विनोबा भावे रुग्णालयाला प्रशासनाचे पत्र

लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : जिल्ह्यात नवीन कोविड बाधित सापडण्याची गती वाढली आहे. इतकेच नव्हे तर नवीन कोविड बाधितांमध्ये गंभीर रुग्ण जास्त आढळत असल्याने सद्यस्थितीत सेवाग्राम आणि सावंगी येथील रुग्णालयाच्या कोविड युनिटमधील बेड अपुरे पडत आहे. भविष्यातील गरज लक्षात घेऊन जिल्हा प्रशासनाने या दोन्ही रुग्णालयातील कोविड युनिटमध्ये बेड वाढविण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहे. त्यासाठी जिल्हा प्रशासनातील बड्या अधिकाऱ्याच्या स्वाक्षरीनिशी सेवाग्राम येथील कस्तुरबा रुग्णालय तर सावंगी (मेघे) येथील आचार्य विनोबा भावे रुग्णालय प्रशासनाला पत्र पाठविण्यात आले आहे.
सेवाग्राम येथील कस्तुरबा रुग्णालय तसेच सावंगी (मेघे) येथील आचार्य विनोबा भावे ग्रामीण रुग्णालय गंभीर कोविड बाधितांसह इतर आजारांच्या रुग्णांवर उपचार सुरू आहेत.  या दोन्ही रुग्णालयांनी इतर आजारांच्या रुग्णांना चांगली रुग्ण सेवा देण्यासह कोविड युनिटमधील आयसीयू तसेच ऑक्सिजन आणि साधारण बेडची संख्या कशी वाढविता येईल यासाठी प्रयत्न करावे. तसेच वाढविण्यात आलेल्या आयसीयू, ऑक्सिजन, व्हेंटिलेटर तसेच सर्वसाधारण रुग्ण खाटांची माहिती तातडीने जिल्हा प्रशासनाला सादर करावी, अशा आशयाचा मजकूर या पत्रात नमूद करण्यात आला असल्याचे जिल्हा प्रशासनातील सूत्रांनी सांगितले. जिल्हा प्रशासन कोविड रुग्णालयातील रुग्ण खाटा वाढविण्यासाठी प्रयत्न करीत असले तरी कोविड संसर्गाची साखळी खंडित करण्यासाठी प्रत्येक वर्धेकराने जिल्हा प्रशासनाच्या सूचनांचे काटेकोरपणे पालन करणे गरजेचेच आहे.

सेवाग्राम रुग्णालयाला ऑक्सिन टॅंकचा द्यावा लागेल तपशील

भविष्यातील गरज लक्षात घेऊन सेवाग्राम येथील कोविड रुग्णालयात लिक्विड ऑक्सिजनची मोठी टँक सुरू करण्यात यावा, अशा सूचना पालकमंत्री सुनील केदार यांनी दिल्या आहेत. याच सूचनांना केंद्रस्थानी ठेवून सेवाग्राम रुग्णालयात ऑक्सिजन साठवणूक कशा पद्धतीने होते. सध्या किती ऑक्सिजन साठवणूक होत असून मोठी टँक सुरू झाल्यावर किती ऑक्सिजनची साठवणूक करता येईल आदी बाबीचा तपशील रुग्णालय प्रशासनाने सादर करण्याच्या सूचना पत्राद्वारे जिल्हा प्रशासनाने दिल्या आहेत.

ऑक्सिजन पुरवठ्याची केली विचारणा
सेवाग्राम आणि सावंगी (मेघे) येथील काेविड रुग्णालयाला सद्यस्थितीत लिक्विड ऑक्सिजनचा किती पुरवठा होत आहे. भविष्यात रुग्ण संख्या वाढल्यास किती ऑक्सिजनची गरज पडू शकते याबाबतचीही माहिती जिल्हा प्रशासनाने या दोन्ही कोविड हॉस्पिटलला केली आहे. सध्या या दोन्ही कोविड रुग्णालयांकडून लिक्विड ऑक्सिजनची मागणी वाढली असून पुरवठाही नियमित केला जात आहे.

अत्यावश्यक नसलेल्या शस्त्रक्रिया पुढे ढकला
सेवाग्राम तसेच सावंगी (मेघे) येथील रुग्णालयात विविध प्रकारच्या शस्त्रक्रिया केल्या जातात. परंतु, जिल्ह्याची कोविड परिस्थिती लक्षात घेता अत्यावश्यक नसलेल्या शस्त्रक्रिया पुढे ढकलून नॉन कोविड बेड कोविड रुग्णांना देता येईल या दृष्टीने कार्यवाही करावी, अशाही सूचना जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आल्या आहेत. या पत्रानंतर हे दोन्ही रुग्णालय प्रशासन काय कार्यवाही करते याकडे साऱ्यांचे लक्ष लागले आहे.

 

Web Title: Administration's stellar exercise to increase beds

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.