नालासोपारा (मंगेश कराळे) :- विरारमधील रमाबाई अपार्टमेंट इमारत दुर्घटनेप्रकरणाच तपास गुन्हे शाखा ३ कडे सोपविण्यात आला आहे. याप्रकऱणी नीतल साने (४८) या बांधकाम व्यावसायिकाला अटक करण्यात आली होती. त्यानंतर या प्रकरणाचा तपास गुन्हे शाखा ३ कडे सोपविण्यात आला आहे. पोलिसांनी या प्रकरणात आणखी ४ जणांना अटक केली. त्यात दोन महिलांचा समावेश आहे. आरोपी हे विकासक आणि जागा मालक आहेत.
मंगळवारी विरारच्या नारिंगी येथे रमाबाई अपार्टमेंट ही इमारत कोसळली १७ जणांचा मृत्यू झाला तर ११ जण जखमी झाले. याप्रकरणी विरार पोलिसांनी इमारत बांधणारा विकासक नीतल साने (४८) याला अटक केली होती. शुक्रवारी याप्रकरणाचा तपास गुन्हे शाखा ३ कडे सोपविण्यात आला. जागा मालक परशुराम दळवी आणि विकासक नितल साने यांच्यात करारनामा झाला होता.
दरम्यान परशुराम दळवी याचे निधन झाले होते. त्यानंतर त्याच्या दोन मुली आणि जावयांनी पुढील बांधकामाची प्रक्रिया केली. २००८ ते २०११ या कालावधीत बांधकाम झाले. ही इमारत बेकायदेशीरपणे बांधण्यात आली होती. २०२० मध्ये पालिकेने दुरूस्तीची नोटीस बजावली होती. मात्र विकासक आणि जागा मालक यांनी काहीच उपायोजना केली नव्हती.
शुक्रवारी गुन्हे शाखेने शुभांगी भोईर (३८), संध्या पाटील (३५) तसेच जावई सुरेंद्र भोईऱ (४६) आणि मंगेश पाटील (३५) यांना अटक केली आहे. त्यांना वसई न्यायालयात हजर केले असता १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी देण्यात आली तर विकासक नीतल साने याला पुन्हा न्यायालयात हजर केले असता ६ दिवसांची वाढीव पोलीस कोठडी देण्यात आली, अशी माहिती गुन्हे शाखा दोनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शाहूराज रणावरे यांनी दिली.