लग्नाला जाणाऱ्या तिघा भावंडांवर काळाचा घाला, आईचा आधार हरपला, पर्हे गावी लग्नाघरी दु:खाचा डोंगर कोसळला
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 14, 2026 11:17 IST2026-04-14T11:16:54+5:302026-04-14T11:17:08+5:30
Kalyan Accident: वडिलांच्या निधनानंतर आई अंजना यांनी घरकाम करून मुलांना मोठे केले. मुलांनीही कष्टाने शिक्षण घेतले. नोकरी करून आईला आधार देण्याचे स्वप्न ते पाहत होते. मात्र, नियतीच्या मनात काही वेगळेच होते.

लग्नाला जाणाऱ्या तिघा भावंडांवर काळाचा घाला, आईचा आधार हरपला, पर्हे गावी लग्नाघरी दु:खाचा डोंगर कोसळला
- सचिन सागरे
कल्याण - वडिलांच्या निधनानंतर आई अंजना यांनी घरकाम करून मुलांना मोठे केले. मुलांनीही कष्टाने शिक्षण घेतले. नोकरी करून आईला आधार देण्याचे स्वप्न ते पाहत होते. मात्र, नियतीच्या मनात काही वेगळेच होते. कल्याण-मुरबाड रोडवर झालेल्या अपघातात मूळचे मुरबाड तालुक्यातील असलेले आणि रोजीरोटीसाठी दिवा येथे राहणाऱ्या मोहपे कुटुंबातील दोन बहिणी आणि भावाचा करुण अंत झाला. त्यांच्या आईला आता कोणाचाही आधार नाही. ज्यांना लहानाचे मोठे केले, तेच तिला सोडून गेले.
दिवा येथील मोहपे कुटुंबातील नेहा (वय २२), मानसी (२०) आणि प्रथमेश (१७) ही तीन भावंडे गावाकडील सोमवारचा हळदी समारंभ आणि त्यानंतरच्या लग्नासाठी पर्हे (कांदली) येथे जात होते. प्रथमेशने नुकतीच दहावीची परीक्षा दिली होती. सुटीचा आनंद, गावाची ओढ त्याला लागली होती. तिघा भावंडांचा हा अखेरचा प्रवास ठरला. आपल्या लेकरांचा असा दुर्दैवी अंत झाल्याचे दु:ख त्यांच्या आईला पचविता येणार नाही. त्यामुळे त्यांना कळविले नसल्याची माहिती नातेवाइकांनी दुपारी दिली. त्यांचे नातेवाईक रुग्णालयात आले होते.
- प्रकाश जाधव
मुरबाड : पर्हे गावी हळदी समारंभ आणि लग्नासाठी येणाऱ्या मोहपे कुटुंबातील तिघा भावंडांचे अपघातात निधन झाल्याने लग्नाघरी नातेवाइकांवर दु:खाचा डोंगर कोसळला. पर्हे गावावरही शोककळा पसरली. घरात असलेल्या शुभकार्यावर एक प्रकारे विघ्न आल्याची भावना ग्रामस्थांनी व्यक्त केली.
पर्हे गावात काकाच्या मुलाच्या लग्नासाठी आईने मुलांना पुढे पाठवले होते. तीनही भावंडे एकत्र बसून गप्पा मारत येत होती. काळाने घाला घातल्याने तिघांचा अपघाती मृत्यू झाला, असे त्यांचे नातेवाईक नितीन आणि विकास मोहपे यांनी ‘लोकमत’ला सांगितले. टॅक्सीत ६ प्रवाशांची परवानगी असताना ११ प्रवासी कसे घेतले? आरटीओ काय करतात? अशा प्रश्नांची सरबत्ती त्यांनी केली.