खरीप हंगामासाठी ठाणे जिल्हा सज्ज; शेतकऱ्यांना वेळेत दर्जेदार खत-बियाण्यांची हमी!

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 25, 2026 00:02 IST2026-04-25T00:00:57+5:302026-04-25T00:02:27+5:30

आगामी खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर ठाणे जिल्हा प्रशासनाने तयारीला गती देत शेतकरीहिताला प्राधान्य दिले आहे.

Thane district ready for Kharif season; Farmers assured of quality fertilizers and seeds on time! | खरीप हंगामासाठी ठाणे जिल्हा सज्ज; शेतकऱ्यांना वेळेत दर्जेदार खत-बियाण्यांची हमी!

खरीप हंगामासाठी ठाणे जिल्हा सज्ज; शेतकऱ्यांना वेळेत दर्जेदार खत-बियाण्यांची हमी!

ठाणे : आगामी खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर ठाणे जिल्हा प्रशासनाने तयारीला गती देत शेतकरीहिताला प्राधान्य दिले आहे. जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांनी कृषी विभागाची सखोल आढावा बैठक घेऊन शेतकऱ्यांना दर्जेदार बियाणे, खते व कीटकनाशके वेळेत उपलब्ध करून देण्यासाठी ठोस मार्गदर्शन केले. वितरण व्यवस्था अधिक सक्षम करण्यासोबतच कोणतीही टंचाई निर्माण होऊ नये यासाठी प्रशासनाने सक्रिय पावले उचलली आहेत.

जिल्हास्तरीय कृषी निविष्ठा सनियंत्रण समितीच्या बैठकीत खरीप हंगामाच्या नियोजनाचा बारकाईने आढावा घेण्यात आला. जागतिक परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर संभाव्य अडचणी लक्षात घेऊन प्रशासनाने आधीच दक्षता घेतली असून शेतकऱ्यांना कोणताही त्रास होणार नाही याची काळजी घेतली जात आहे.

जिल्ह्यासाठी एकूण ११ हजार ५५० मेट्रिक टन खतांचे आवंटन मंजूर करण्यात आले असून त्यात युरिया ९७००, डीएपी २००, एसएसपी १००, एमओपी ५० आणि संयुक्त खते १५०० मेट्रिक टनांचा समावेश आहे. याशिवाय तालुकानिहाय ८५० मेट्रिक टन युरियाचा संरक्षित (बफर) साठा ठेवण्याचे नियोजन करण्यात आले आहे. शहापूर, मुरबाड, भिवंडी आणि अंबरनाथ या तालुक्यांमध्ये हा साठा उपलब्ध राहणार आहे, ज्यामुळे गरज भासल्यास तत्काळ पुरवठा करता येणार आहे.

खतांचा पुरवठा सुरळीत राहावा आणि शेतकऱ्यांना योग्य दरात उपलब्ध व्हावा यासाठी प्रशासनाने विशेष लक्ष केंद्रित केले आहे. काळाबाजार, साठेबाजी किंवा जादा दराने विक्री यांसारख्या प्रकारांना आळा घालण्यासाठी यंत्रणा अधिक सजग करण्यात आली आहे. तसेच युरियाचा अकृषिक वापर रोखण्यासाठीही विशेष पथके सतर्क ठेवण्यात येणार आहेत.
जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रणजीत यादव यांनीही कृषी विभागाला अधिक समन्वयाने काम करण्याच्या सूचना दिल्या. बियाण्यांच्या बाबतीत शेतकऱ्यांनी विविध पर्यायी वाणांचा स्वीकार करावा, असे आवाहन करण्यात आले. अधीक्षक कृषी अधिकारी रामेश्वर पाचे यांनी जिल्ह्यातील खत साठा, बफर नियोजन आणि बियाणे पुरवठा याबाबत सविस्तर माहिती दिली.

या सर्व उपाययोजनांमुळे ठाणे जिल्ह्यातील शेतकऱ्यांना आगामी खरीप हंगामात वेळेत आणि पुरेशा प्रमाणात कृषी निविष्ठा उपलब्ध होऊन उत्पादनवाढीस चालना मिळणार आहे.

Web Title : ठाणे खरीफ सीजन के लिए तैयार: किसानों को गुणवत्तापूर्ण आपूर्ति का आश्वासन!

Web Summary : ठाणे प्रशासन ने खरीफ सीजन के लिए गुणवत्तापूर्ण बीज, उर्वरक की समय पर आपूर्ति सुनिश्चित की। पर्याप्त स्टॉक की योजना, कालाबाजारी रोकथाम उपाय किए गए। किसानों से विभिन्न बीज विकल्प अपनाने का आग्रह किया।

Web Title : Thane Ready for Kharif Season: Farmers Assured Quality Supplies!

Web Summary : Thane administration ensures timely supply of quality seeds, fertilizers for Kharif season. Adequate stock planned, black marketing prevention measures in place. Farmers urged to adopt varied seed options.

टॅग्स :Farmerशेतकरी