अंबरनाथ मलंगगडाच्या डोंगर रांगेतील तावली डोंगर खचतोय!

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 9, 2020 20:43 IST2020-08-09T20:38:51+5:302020-08-09T20:43:49+5:30

मलंग गडाचा डोंगर रांगेतील उंच हा डोंगर असून त्या डोंगराला सध्या तडा गेला आहे. 

Tawali mountain in the mountain range of Ambernath Malanggad is consuming! | अंबरनाथ मलंगगडाच्या डोंगर रांगेतील तावली डोंगर खचतोय!

अंबरनाथ मलंगगडाच्या डोंगर रांगेतील तावली डोंगर खचतोय!

अंबरनाथ : अंबरनाथ तालुक्यातला तीन टोकांचा डोंगर म्हणून प्रसिद्ध असलेला तावलीचा डोंगर खचायला सुरुवात झाली आहे. या डोंगराचं एक टोक ढासळलं असून यामुळे मोठ्या प्रमाणात दगड-धोंडे, मोठमोठे खडक खाली आले आहेत. डोंबिवलीपासून बदलापूरपर्यंतच्या भागातून हा तीन टोकांचा तावलीचा डोंगर दिसतो. मलंग गडाचा डोंगर रांगेतील उंच हा डोंगर असून त्या डोंगराला सध्या तडा गेला आहे. 

या तीन टोकांपैकी मधल्या टोकावर काही दिवसांपूर्वी वीज कोसळली, आणि तेव्हापासून हा भाग खचायला सुरुवात झाली. सध्या या डोंगराचा लक्षणीय भाग ढासळला असून मधल्या भागात एक मोठा पट्टा तयार झाला आहे. या भागातून मोठ्या प्रमाणात दगड, धोंडे, मोठे खडक सातत्याने खाली येत आहेत. या डोंगरातून उगम पावणारा ओढा हा अंबरनाथ शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या चिखलोली धरणाचा प्रमुख जलस्रोत आहे. मात्र सध्या हा ओढा सुद्धा बुजण्याच्या मार्गावर आहे. 

शिवाय, हेच दगडधोंडे चिखलोली धरणाच्या पात्रात जात असल्यानं चिखलोली धरणाच्या भिंतीवर दाब वाढण्याचीही भीती व्यक्त होत आहे. मात्र असं असलं, तरी महसूल विभाग, वनविभाग, लघुपाटबंधारे विभाग यापैकी कुणीही अद्याप याकडे लक्ष दिलेलं नाही. अंबरनाथमधील निसर्गमित्र सुधाकर झोरे हे यासाठी पाठपुरावा करतायत. शिवाय स्थानिक आमदार बालाजी किणीकर यांनीही याबाबत पत्रव्यवहार केलाय. मात्र तरीही अजून तरी शासकीय यंत्रणेला जाग आलेली नाही आहे.

Web Title: Tawali mountain in the mountain range of Ambernath Malanggad is consuming!

टॅग्स :thaneठाणे