उल्हासनगरातील मध्यवर्ती रुग्णालयात मृताच्या नातलगांचा राडा, तोडफोडीच्या निषेधार्थ डॉक्टरांचे 'ब्लॅक डे' आंदोलन
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 7, 2026 16:06 IST2026-05-07T16:06:38+5:302026-05-07T16:06:53+5:30
रुग्णाच्या मृत्यूनंतर फर्निचर, मशिनरींची मोडतोड, महापौरांच्या मध्यस्थीनंतर कामबंद मागे, पण संताप कायम...

उल्हासनगरातील मध्यवर्ती रुग्णालयात मृताच्या नातलगांचा राडा, तोडफोडीच्या निषेधार्थ डॉक्टरांचे 'ब्लॅक डे' आंदोलन
उल्हासनगर : शहरातील मध्यवर्ती रुग्णालयात बुधवारी मध्यरात्री एका रुग्णाच्या मृत्यूनंतर नातेवाईकांनी प्रचंड राडा केला. रुग्णालयाची तोडफोड करत सरकारी मालमत्तेचे नुकसान केले असून या कृत्याचा निषेध म्हणून रुग्णालयातील डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांनी पुकारलेले कामबंद आंदोलन महापौर अश्विनी निकम यांच्या मध्यस्थीनंतर मागे घेण्यात आले. त्यानंतरही कर्मचाऱ्यांनी हाताला काळ्या फिती बांधून आपला तीव्र संताप व्यक्त केला आहे.
उल्हासनगर येथील भगवान निंबोरे या रुग्णाला बुधवारी रात्री ९ च्या सुमारास अर्धवट बेशुद्ध अवस्थेत मध्यवर्ती रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. डॉक्टरांनी तातडीने उपचार सुरू केले. स्वतः महापौर अश्विनी निकम यांनीही बुधवारी रात्री रुग्णालयाला भेट घेऊन रुग्णाच्या तब्येतीची विचारपूस केली होती. मात्र, मध्यरात्री १:३० च्या सुमारास उपचारादरम्यान निंबोरे यांचा मृत्यू झाला. डॉक्टरांवर हलगर्जीपणाचा आरोप करत नातेवाईकांनी थेट रुग्णालयावर हल्ला चढवला. रुग्णालयातील महागड्या मशिनरींची तोडफोड करण्यात आली असून फर्निचर आणि खुर्च्या फेकून देण्यात आल्या. रुग्णालयाच्या खिडक्यांच्या काचा फोडल्यामुळे सर्वत्र काचेचा खच पडला होता. याप्रकाराने घाबरलेले रुग्ण, डॉक्टर, नर्ससह इतर कर्मचाऱ्यात धावपळ उडाली होती. मध्यवर्ती रुग्णालयात तोडफोड सुरू असल्याची माहिती मध्यवर्ती पोलिसांना मिळाल्यावर, त्यांनी रुग्णालयात धाव घेऊन परिस्थिती नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न केला. तोपर्यंत रुग्णालयाचे मोठे नुकसान झाले होते.
डॉक्टर व कर्मचाऱ्यांचा इशारा
मध्यवर्ती रुग्णालयातील डॉक्टर आणि आरोग्य कर्मचारी जीव धोक्यात घालून सेवा देत असताना, त्यांच्यावर होणारे हल्ले खपवून घेतले जाणार नाहीत. आम्ही कामावर परतलो आहोत, पण आमचा निषेध संबंधितावर कारवाई होई पर्यंत सुरूच राहणार असल्याचे मत रुग्णालय कर्मचाऱ्यांनी दिले.
महापौरांची मध्यस्थी, आरोपींच्या अटकेचा इशारा
तोडफोडीच्या घटनेमुळे संतापलेल्या डॉक्टरांनी सकाळीच कामबंद आंदोलनाचे हत्यार उपसले. यामुळे आरोग्य यंत्रणा कोलमडण्याची चिन्हे होती. अखेर महापौर अश्विनी निकम आणि आरोग्य समिती सभापती सविता तोरणे यांनी घटनास्थळी धाव घेत डॉक्टरांची मनधरणी केली. दोषींवर कठोर कारवाई करण्याचे आश्वासन दिल्यानंतर कर्मचाऱ्यांनी आंदोलन मागे घेतले.
पोलिस कारवाई सुरू
मध्यवर्ती पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून, सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे तोडफोड करणाऱ्या नातेवाईकांना अटक करण्याचे सत्र सुरू केले. दरम्यान, मृतदेहाचे विच्छेदन करून तो नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला आहे.
रुग्णालयाला हवे पोलीस संरक्षण
मध्यवर्ती रुग्णालयात क्षमते पेक्षा दुप्पट रुग्णाचा ओघ असून बाह्यरुग्ण विभागात दररोज १५०० पेक्षा जास्त रुग्ण उपचार घेतात. दोन दिवसापूर्वी आधारवाडी जेल मध्ये मृत झालेल्याच्या नातेवाईकानीही रुग्णालयात धिंगाणा घालत एका डॉक्टराच्या गळ्याला चाकू लावलायची घटना घडल्याची आठवण जिल्हा शल्यचिकित्सक डॉ मनोहर बनसोडे यांनी दिली. अश्या प्रकारणे रुग्णालयाला पोलीस संरक्षण देण्याचे लेखी पत्र त्यांनी पोलिसांना दिले.